लडकोंपे नजर रखनी पडेगी!
By admin | Published: December 4, 2014 02:49 AM2014-12-04T02:49:22+5:302014-12-04T02:49:22+5:30
हमे भी ये जानना होगा की हमारे बच्चे किसके संगत मे है और वो दिन भर क्या कर रहे है... कल्याणच्या सर्वोदय रेसिडेन्सीमधून बाहेर
मुंबई : हमे भी ये जानना होगा की हमारे बच्चे किसके संगत मे है और वो दिन भर क्या कर रहे है... कल्याणच्या सर्वोदय रेसिडेन्सीमधून बाहेर पडणारा मध्यमवयीन रहिवासी सांगत होता. जिहादी विचारांचा पगडा असलेला आरीफ माजीद याच सोसायटीतला. भारतात परतून अरीबला सहा दिवस झाले. त्याचे गायब होणे, इसीससाठी सीरीयात जाणे आणि परतल्यावर एनआयएने अटक करणे यामुळे निर्माण झालेला तणाव या सोसायटीतल्या वातावरणात जाणवत होता. आरीफसह त्या चार तरुणांचे हे कृत्य आम्हाला पटलेले नाही, अशीच प्रतिक्रिया या सोसायटीसह अन्य मोहल्ल्यातूनही व्यक्त होते आहे.
आरीफ सहीसलामत भारतात परतल्याने अमन तांडेल, फहाद शेख आणि साहीम तानकी यांच्या कुटुंबियांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. हे तिघे आरीफप्रमाणे सहीसलामत परतावेत यासाठी कुटुंबियांसह परिचयातील सर्वांनी प्रार्थनाही सुरू केल्या आहेत. हे चारही तरुण राहत असलेल्या सोसायट्या, मोहल्ल्यांमध्ये फेरफटका मारला असता तेथे तणावपूर्ण शांतता आढळली. विशेषत: अनोळखी व्यक्तींकडे नजरांमध्ये संशय दिसला. आरीफच्या घराचे दार त्याच्या आईने उघडले. उसने हसू आणून तिने सलामदुवाही स्वीकारला. मात्र आरीफचे नाव ऐकून त्याच्याबाबतचे प्रश्न ऐकून तिच्या चेहऱ्यावर तरळलेली काळजी स्पष्टपणे दिसली. आरीफके अब्बू घर पे नही है. वो एनआयए के दफ्तर गये है. घरपे सब औरते है. बोलने वाला कोई भी नही... काही ऐकण्याच्या आत तिने सांगून टाकले. त्यातही आरीफबाबत जाणून घेण्याची धडपड लोकमत प्रतिनिधीने केली तेव्हा तीने हमे कुछ कहना नही है, असे सांगून तोंडावर दार बंद केले.
त्या त्या मोहल्ला, सोसायट्यांच्या आसपास राहणाऱ्यांना या चौघांची कृती चांगलीच ठाऊक आहे. मात्र अनोळखींसमोर कोणीही बोलायला तयार नव्हता. अरे भाय, हम तो यहा नये है, अशी प्रतिक्रिया देऊन चार ते पाच जणांनी परस्पर टाळले. काहींनी तर चक्क यापैकी कोणालाच ओळखत नाही, असे सांगून टाकले. काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या चारही तरुणांनी खूप आधीपासून सीरियात जाण्याची तयारी केली होती. त्यांची माथी इथल्या लोकांनी भडकावली. त्यांच्या मनाचा ठाव जिहादी विचार घेत होते. मात्र त्यांच्या पालकांना यातले काहीएक ठाऊक नव्हते. जेव्हा समजले तेव्हा ते हादरलेच असावेत. तो धडा सर्वांनीच घ्यायला हवा. मुले शिक्षणाच्या किंवा अन्य कोणत्याही निमित्ताने घराबाहेर असतात तेव्हा ते कोणाच्या संगतीत असतात, त्यांचा मित्रपरिवार कोण हे जाणून घ्यायला हवे. (प्रतिनिधी)