बालदिन विशेष : मान्यवरांचे किस्से

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 10:34 AM2016-11-14T10:34:27+5:302016-11-14T10:34:27+5:30

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा दिवस 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. विविध मान्यवरांनी बालदिनानिमित्त शेअर केलेल्या आठवणी..

Children's Day Special: Tales of Honor | बालदिन विशेष : मान्यवरांचे किस्से

बालदिन विशेष : मान्यवरांचे किस्से

Next
भावाने बैलगाडीतून फेकले... - नंदू माधव, चित्रपट अभिनेते
लहानपणी म्हणजे अगदी पाच वर्षाचा असताना मला बैलगाडीचे फार आकर्षण होते. बैलगाडीत बसायला मला फारच आवडायचे. अगदी रिकाम्या-उभ्या बैलगाडीतही मी तासन् तास बसत असे. गेवराईजवळच एका छोट्याशा गावात आमच्या नातेवाईकाचे लग्न होते. लग्नासाठी तेव्हा बैलगाडीतून प्रवास असायचा. आदल्या दिवशी आईकडे मला उद्या बैलगाडी चालवायला द्यायची, तरच मी येणार, असा धोशाच लावला. आईपण हो हो म्हणाली. तिला वाटले, उद्या जाईल विसरून. पण दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नासाठी चार-पाच बैलगाड्या निघाल्या. मी मामेभावाच्या बैलगाडीत बसलो आणि आई पाठीमागून येणाऱ्या बैलगाडीत बसली. मला बैलगाडी चालवायची आहे, असे म्हणत मी मामेभावाकडे हट्ट धरला. गावातून बाहेर पडल्यावर देतो तुला चालवायला, असे म्हणत त्याने मला गाडीत बसवले. गाडी गावाबाहेर निघाल्यावर पुन्हा मी हट्ट धरला. भावाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मी चिडलो आणि रडायला लागलो. अगदी गाडीतच गोंधळ सुरू केला. मामेभाऊ अधिकच चिडला आणि त्याने मला अक्षरश: रस्त्यावर फेकून दिले. नंतर पाठीमागच्या गाडीत आलेल्या आईने मला कडेवर उचलून घेतले. म्हणाली, देते तुला गाडी चालवायला. आता रडू नकोस. खरंच तिने बैलगाडी चालविणाऱ्याच्या मांडीवर मला बसविले आणि हातातील कासऱ्यावर माझा हात ठेवत मला बैलगाडी चालविण्याचे ‘फिलींग’ देत माझा बालहट्ट पूर्ण केला. 
लहानपण गेवराईतच गेले. तालुक्याच्या गावातही मला अनेक गोष्टी मिळाल्या. मला खेळाची आवड होती. आमची एक क्रिकेटची टीमच होती. मित्रांसोबत खेळायचो, भांडायचो, पुन्हा दोस्ती करायचो. क्रिकेटपासून ते अगदी गोट्या आणि आंब्यांच्या कोयांचा खेळही मी खेळत असे. भांडणेही खूप करायचो. रोज क म्हणजे कट्टी आणि सु म्हणजे बट्टी चालत असे. माझा बालपणीचा एक मित्र होता, मिलिंद फुलगिरकर. तो माझ्याशी कधीच क म्हणजे कट्टी करत नसे. आता तो औरंगाबादमध्ये बँकेत अधिकारी आहे. आजही ही आठवण काढली की तो खळखळून हसत असतो. 
शब्दांकन - प्रताप नलावडे
 
 
पोहण्याचे शिकून काय करणार? - सोनाली तोडकर, महिला मल्ल
मी पाचवीच्या वर्गात शिकत असताना टीव्हीत मुली जलतरण स्पर्धेत भाग घेताना पाहिल्या अन् वडिलांकडे पोहण्याचा हट्ट धरला. कधी एकदा पाण्यात पोहते, असे मला झाले होते. पण वडिलांना काही ते आवडले नाही. ‘तू मुलगी आहेस. पोहायचे शिकून काय करणार?’ असे बाबांनी मला सुनावत बालहट्ट पुरविण्यास सपशेल नकार दिला; परंतु मी माझ्या हट्टावर ठाम होते.
असंच एक दिवस मी वडिलांची नजर चुकवून पोहायला गेले अन् काही दिवसातच पोहायला शिकलेही. मला पोहायला येतंय हे समजले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी अजूनही विसरू शकलेले नाही. या घटनेतूनच माझ्यातील खिलाडूवृत्तीचा उगम झाला असावा. दुपारपर्यंत शाळा अन् त्यानंतर आईला हातभार म्हणून शेतातील खुरपणी, कापूस वेचणीला मदत करणे, असा माझा इयत्ता तिसरीपासूनचा नित्यक्रम होता. मजुरीसाठी वडील दुसऱ्यांच्या शेतात काबाडकष्ट करीत असत, तर घरच्या अडीच एकरात आई, आजी व आम्ही बहीण भावंडे राबत असू. 
बीड जिल्ह्यातील मंगरूळ हे कुस्तीगिरांचे गाव. महाराष्ट्र केसरीपर्यंत येथील मल्लांनी मजल मारलेली. पैलवान वाल्मीक तोडकर हे दीपाली व आशिष यांना कुस्तीचे डाव शिकवत. पाहण्यासाठी मीही दीपालीसोबत तालमीत जाऊ लागले. महिन्यानंतर मलाही कुस्तीची आवड निर्माण झाली. टी.व्ही.वरील कुस्त्या पाहून महिलाही मर्दानी खेळ खेळत असल्याचे लक्षात आले आणि करिअरचा हाच मार्ग ठरला
जि.प.शाळा मंगरूळ (ता.आष्टी ) येथील कबड्डी संघाची कर्णधार असताना तालुका स्तरावरील स्पर्धेत माझ्या संघाने यश मिळवले होते. या स्पर्धेतील माझी कामगिरी पाहून शिक्षक धुमाळ यांनी खेळातच करिअर घडविण्याचा सल्ला माझे बाबा महादेव तोडकर यांना दिला होता. 
केवळ छंद म्हणून कुस्ती पाहताना करिअर म्हणून कुस्तीकडे पाहण्यास मी कधी सुरुवात केली हे माझे मलाच कळले नाही. घरच्या परिस्थितीचा विचार करता मी भोसरी येथील विद्यालयातील प्रवेशास विरोध केला; परंतु बाबांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यांनी एक वेळ आठवडी बाजार बाजूला ठेवत मला योग्य तो खुराक पुरविला होता. कुस्तीचे प्रशिक्षण घेत असताना मी पुणे महापौर स्पर्धेत यश मिळवले होते. त्यानंतर मी मागे वळून कधी पाहिलेच नाही. माझा हा प्रवास सिंगापूर येथील राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्यापर्यंत पोहोचला. या विजयामुळे मंगरूळ हे पुरूषांबरोबरच महिला कुस्तीगिरांचेही गाव असल्याचे मी जगाला दाखवून दिले. 
 
शब्दांकन : राजेश खराडे 
 
 
‘बुढ्ढी के बाल’ अन् ‘गारीगार’ ! - डॉ. वीरा राठोड कवी
 
माझं बालपण म्हणजे वाऱ्यावरच्या पाखरासारखं. तेव्हा मला वाटायचं की सारं काही मुठीत आलंय, पण मुठी उघडल्या की रिकाम्या असल्याचा अनुभव यायचा. हरवून गेलेलं बालपण..ते मी शोधत हिंडलो. नदी-नाल्या, ओढे, डोंगरदऱ्यांमध्ये गुरांच्या पाठीमागे, शेतांच्या बांधाबाधांवर... शेतातील पिकात पेरलेल्या तासातासात... हरवले होते बालपण. 
खेकडे, चित्तर, मासे, लावरी, व्हले, पारवे यांच्या शिकारीत बालपण अडकले होते. या पक्ष्यांसारखीच माझीही बालपणात शिकार झाली होती. रानोमाळी, डोंगरदऱ्यांनी पडत, ढेपाळत, उठत बालपण रांगत आलं होतं. एखाद्या डोंगरातील फुटलेल्या झऱ्याला अचानक नदीचा प्रवाह गवसावा, सापडावा तसं मला जगणं सापडलेलं आणि पर्यायाने माझ्यासारख्या अनेकांचं हरवलेलं. भोवतालचे वातावरण असे तसेच असल्याने फार मोठे हट्ट कधीच नव्हते. तांड्यावर कधीतरी ‘बुढ्ढी के बाल’ (याला बंबई मिठाई असेही म्हणत. पण म्हातारीच्या पांढऱ्या केसासारख्या गुलाबी रंगामुळे ‘बुढ्ढी के बाल’.) आणि गारीगारवाला यायचा. सर्वांनाच हे घ्यावे वाटायचे. पण बाप स्वभावानं गरम. काही मागण्याची हिम्मतच नव्हती. आईच्या हातात काहीच असायचे नाही. अशा वेळी पाहुण्या, रावळ्यांनी हातात घातलेल्या दहा-पाच रूपयांमधून एखादा रूपया चिल्लर करून आजी आणून ठेवायची. यातील पाच, दहा पैसे आम्हाला द्यायची. आजी नसली की घरातील पडलेले जुनं लोखंड, प्लास्टिक पाईपाचे तुकडे गारीगार व बुढ्ढी के बाल वाल्यांना द्यायचो. अशा चाराणे, आठाण्यात आमचं बालपण हरवून जायचं. मनाची एवढी कुबेरी होती की चाराणे, आठाण्यात अख्खं बालपण खर्च करून टाकलं. या अनुभवांनी संपन्न केल्यामुळे आज यशाच्या शिखरांना गवसणी घालताना अडचण येत नाही.
सिक्के मिलनेसे पहले
मॅनेजमेंट हो जाता पूरे दिल का
एक पल भी न बचाये रखते थे हम
पुरा दिन खर्च हो जाता
चवन्नी अठन्नी मे
न जाने ऐसे कितने दिन 
हुए है खर्च!
चौकट
‘मै नन्हा सा था
चवन्नी के सिक्के इतना,
दुनिया बहुत छोटी थी
मेरे लिए बडे थे तो बस
चवन्नी आठन्नी के सिक्के,
ऐसी क्या बात थी उन सिक्को में आज नोटों मे नहीं मिलती
सोचा करता हूँ......’
 
शब्दांकन : राम शिनगारे
 
 
मला शेतकरीच व्हायचंय ! - शिवराम घोडके कृषीभूषण
लहानपणापासून म्हणजे मला जेव्हा कळायला लागले तेव्हापासून जांबाच्या बागेचे मला नेहमीच कौतुक वाटायचे. इतर झाडांप्रमाणे दिसणाऱ्या या झाडाला गोड फळ कसे लागते, याची नेहमीच उत्सुकता असायची. वडिलांकडून शेतीची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करायचो; पण ‘एवढ्या चौकशा कशासाठी’, असे म्हणत वडील तुला नोकरदार व्हायचे, शेतकरी नाही, अशा शब्दांत माझी बोळवण करायचे. 
मला शेतकरीच व्हायचंय, असा हट्ट मी पाचवीत असतानाच वडीलांकडे धरला. बारावीनंतर मला कृषीचेच शिक्षण घ्यायचे हेही मी निश्चित केले. त्याला वडिलांनीही पाठिंबा दिला. बीड तालुक्यातील लोळदगाव या छोट्याशा गावात सर्वसाधारण कुटुंबात माझा जन्म झाला. संयुक्त कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. मला ५ बहिणी आहेत. त्यापैकी तिघींचे विवाह झाले असून, दोघी उच्चशिक्षित आहेत. मी एकुलता एक असल्याने साऱ्यांचा माझ्यावर लहानपणापासूनच जीव आहे; पण वडिलांच्या कठोर शिस्तीत मी वाढलो. फाजील लाड कधी झाले नाहीत. 
बारावीनंतर मी कृषी शिक्षणाकडे वळलो. परभणी येथील विद्यापीठात मी पदवी संपादन केली. त्यानंतर गावी येऊन सेंद्रीय शेतीचा प्रयोग राबविला. पहिल्याच वर्षी कापूस व उसाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे उत्साह दुणावला. पुढे कोणाचीही शिफारस नसताना २०१२ मध्ये मला कृषिभूषण हा मानाचा पुरस्कार अगदी वयाच्या पंचविशीतच मिळाला. सेंद्रीय शेतीवरील निष्ठा या पुरस्काराने वाढली. शेतात सेंद्रीय शेती प्रशिक्षण केंद्र सुरू केले. तेथे एका वेळी १०० शेतकऱ्यांना निवासी प्रशिक्षण दिले जाते. सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रसार या माध्यमातून यशस्वीरीत्या केला जात आहे. 
कृषी अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण राज्यात मार्गदर्शन करण्यासाठी मला निमंत्रित केले जाते. त्यामुळे अनुभवात व ज्ञानात अधिकच भर पडते. वडीलही आता माझ्यावर 
खुश आहेत. राज्य शासनाच्या शेतमाल भाव समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधीही मला यानिमित्ताने मिळाली. 
मी सहावीला असेन. आमच्याकडे पेरूची बाग होती. ती गावातीलच उत्तम सोनवणे या व्यापाऱ्याला वडिलांनी विकली. मी पेरू घेईन म्हणून मला ते बागेत येऊ देत नव्हते. मग मी त्यांची नजर चुकवून जायचो अन् पेरू तोडायचो. एक दिवस व्यापाऱ्याने पाहिले. त्याने वडिलांकडे तक्रार केली. त्यानंतर वडिलांनी त्याला काय घ्यायचे ते घेऊ द्यात, त्याचे पैसे मी देत जाईन असे म्हणत परस्पर माझी पाठराखण केली. 
 
शब्दांकन : राजेश खराडे 
 
आई-वडिलांचा उभ्याने प्रवास...  - अंकित बावणे, स्टार फलंदाज
लहानपणी आई-वडील त्यांच्या मित्रांच्या कुटुंबियांसोबत दक्षिण भारताच्या दौऱ्यावर बस करून गेले होते. मीही सोबत होतो. बंगळुरू येथे मी आई-वडिलांकडे बॅट घेण्याचा हट्ट धरला. त्या वेळेस मी चौथी इयत्तेत होतो. नेमका त्याच वेळी बंगळुरूमध्ये काही कारणांमुळे कर्फ्यू लागला होता. त्यामुळे बॅट खरेदी करणे शक्य झाले नाही. परतीच्या प्रवासात कोल्हापूरहून थेट औरंगाबाद गाठायचे, असे सर्वांनी ठरवले. किमान पुण्यात तरी बॅट घ्यायचीच, असा हट्ट मी आई-वडिलांकडे केला. या हट्टामुळे सर्वांनाच नमते घ्यावे लागले आणि बस पुण्याकडे वळविण्यात आली. पुणे येथे मी मला हवी असलेली बॅट घेतली व हट्ट पूर्ण करवून घेतला. त्या वेळेस वडिलांच्या मित्रांनी मी भविष्यात तेंडुलकर होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे आई मला आज सांगते.
दुसरी आठवण आग्ऱ्याची. राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धा होती. मी लहान असल्यामुळे आई-वडिलांना काळजी वाटली आणि त्यांनी रेल्वेने आग्रा गाठले. स्पर्धेचे वेळापत्रक ४ ते ५ दिवसांचे होते. त्यामुळे आई-वडिलांनी रेल्वेचे ५ दिवसांनंतरचे परतीचेही आरक्षण केले. महाराष्ट्राचे आव्हान दोन दिवसांतच संपुष्टात आले. त्यामुळे आता पुढील तीन दिवस काय करणार? उर्वरित दिवसांत आग्रा परिसर पाहण्याचे ठरले. नेमका त्याचवेळी आईला मावशीचा फोन आला. ‘लोकमत’मध्ये गादिया करंडक क्रिकेट स्पर्धा असल्याची बातमी आली आहे आणि या स्पर्धेसाठी अंकितची निवड झाली, अशी माहिती मावशीने आईला दिली. ते मीही ऐकले. स्पर्धा असल्यामुळे तेथे फिरण्यास मन लागणार नव्हते. त्यामुळे आई-वडिलांकडे लगेच औरंगाबादला परतण्याचा हट्ट केला. आई-वडिलांच्या मनात आग्रा फिरायचे होते. पण मी तयार नव्हतो. माझ्या या हट्टापुढे आई-वडिलांना नमते घ्यावे लागले. त्यांना आग्रा ते भुसावळ हा रेल्वे प्रवास भर उन्हाळ्यात क्लास थ्रीमध्ये करावा लागला. एवढेच नाही तर प्रवासात पूर्ण रात्र व दिवस तिघेही उभेच होतो. यामुळे माझे पाय सुजले. आईने तू मैदानावर जाऊ नकोस असे सांगितले; परंतु तरीही मी पहाटेच उठून मैदानात पोहोचलो.
पतियाळा येथील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत माझी खेळण्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे आई-वडिलांना काळजी होती. त्यातच मी पतियाळात तापाने फणफणलो होतो. हे कळताच वडील तात्काळ पतियाळाला पोहोचले. माझी अवस्था पाहून त्यांनी तुझे क्रिकेट खेळणे आता बंद कर असे सांगितले; परंतु मी क्रिकेट खेळण्याचा हट्ट सोडला नाही. या वेळेसही वडिलांना नमते घ्यावे लागले.
 
शब्दांकन- जयंत कुलकर्णी
 
खट्याळ, खोडकर अन् भांडखोर  - बैजू पाटील, वन्यजीव फोटोग्राफर 
घरातील माणसांना खोटे बोलत, मित्रांसोबत वेळ घालविण्यासाठी काहीही करण्याची, थापा मारण्याची सवयच बालपणी जडली होती. मित्रांसोबत गोट्या खेळण्यासाठी दोन मिनिटांत येण्याचे वचन देऊन घराबाहेर पडल्यानंतर तासन्तास खेळण्यात दंग होत. भूक लागल्याचे कळताच मित्रांना थांबवून ठेवत घराकडे पळायचे. चार-पाच मिनिटांत चार-दोन घास पोटात टाकताच पुन्हा खेळायला निघायचे. हाच दिनक्रम होता.
चित्रकला, पेंटिंग, खेळात पहिल्यापासून कल होता. अभ्यास म्हटले की नको. जिद्दीपणा, खोडकर वृत्ती तर नसानसात भिनलेली होती. एका वेळी रिक्षाला पाठीमागून पकडत पळत सुटलो होतो. रिक्षाच्या मागील बारमध्ये हात अडकल्यामुळे सोडताही येईना. पळून पळून थकल्यानंतर थेट गुडघ्यावर पडलो. २५ ते ३० मीटर ओरबडत गेलो. सगळ्या अंगाचे सालटे निघाले. तरीही खोडकरपणा कमी झाला नाही.
जळगाव जिल्ह्यातील मूळ गावी अक्षयतृतीयेला जायचो. आमचे गाव उंचावर होते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने शिव्या देणे, नंतर नाव घेऊन शिव्या देत सर्वांचा उद्धार करत. या गावात गोफणीने दगड मारण्याचीही प्रथा होती. वरून खाली अन् खालून वर असा दगड मारण्याचा क्रम चालायचा. याच वेळी गोफणीच्या दगडाने गावातील एका मुलीचे डोके फुटले. मुलीला लागलेला दगड मी मारलेला नव्हता, मात्र खोडकरपणाच्या ख्यातीमुळे माझ्यावरच शंका घेतली. मला मारण्यासाठी येणार तेच काहींनी मुलीच्या घरच्यांना सांगितले. बैजू तेथे नव्हता. विनाकारण अंगावर आलेली आपबीत टळली. दहावीत असताना फोटोग्राफीचे वेड लागले. कॅमेरा आवश्यक होता. आई-वडिलांकडे हट्ट धरू लागलो. पण आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे नकार मिळाला. काही झाले तरी कॅमेरा घ्यायचाच या हट्टाला पेटून उठलो. वडील ऐकत नव्हते. यामुळे चार दिवस जेवण केले नाही. आठ दिवसांनंतर कॅमेरा घेऊन देणारा मित्र घरी आला. त्याने वडिलांना सर्व फायदे समजावून सांगितले. वडिलांनाही पटले. तेव्हा कॅमेरा मिळाला. याच कॅमेऱ्याने जगाची भ्रमंती केली. 
दिवाळीत सगळी लहान मुले किल्ले बनविण्यात रमून जात. आम्ही मात्र ज्या मुलांनी चांगले किल्ले बनवले ते किल्ले रात्रीतून तोडून टाकण्याचे काम करत. होळीच्या काळात ज्या घरांवर नंबर प्लेट असायच्या त्या काढून होळीमध्ये जाळण्याचा उपक्रम नियमितपणे राबवत. यासाठी तीन-चार मित्रांची सोबत असे.
 
शब्दांकन : राम शिनगारे
 
 
शेळी विकून सायकल घेतली... - शेख रफिक, एव्हरेस्टवीर 
लहानपणापासून डोंगरदऱ्या, टेकड्या चढण्याचा, भटकण्याचा नाद होता. यासाठी अनेक वेळा घरातून, शाळेतून विरोध झाला; पण हट्ट कायम राहिला. यापासून कधीही माघार घेतली नाही. लहानपणी व मोठे झाल्यावरही यात तडजोड केली नाही. म्हणजे बालहट्ट हाच यशाच्या शिखरावर घेऊन गेला, असेच म्हणावे लागेल.
लहानपणी शाळेत असताना एका शालेय कबड्डी स्पर्धेत शरीरयष्टीने लहान असल्यामुळे क्रीडा शिक्षक संघात घेत नव्हते. सुरुवातीला त्यांना विनंत्या केल्या, तरीही ते ऐकत नसल्यामुळे त्यांच्याशी वाद घालत संघात घेण्याचा हट्ट धरला. पण यात यश आले नाही. पुढे हर्सूल येथील न्यू हायस्कूल शाळेत प्रवेश घेतला. सातवीत असताना नॅशनल कॅडेट कोर्समध्ये (एनसीसी) प्रवेश घेण्याची इच्छा होती. यातही माझी लहान शरीरयष्टी अडचणीची ठरली. एनसीसीच्या शिक्षकांनी माझा प्रवेश नाकारला, तेव्हा निराशा आली; पण हट्ट कसा सोडणार? शेवटी वडिलांच्या मदतीने एनसीसीच्या धर्तीवर सुरू झालेल्या महाराष्ट्र कॅडेट कोर्समध्ये (एमसीसी) प्रवेश घेतला. 
सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्याची, खेळण्याची तीव्र इच्छा असायची पण छोटे शरीर नेहमीच अडथळा ठरले. यातून मार्ग काढत कधी हट्टाने, तर कधी वाद घालून ती इच्छा पूर्ण करायचो.
हर्सूलच्या शाळेत गावातून सायकलीवर यावे लागत असे. सुरुवातीला सायकल नसल्यामुळे पायी यावे लागे. मात्र वडिलांकडे सायकल घेण्याचा हट्ट सुरु केला. हा हट्ट काही पूर्ण होत नव्हता. यासाठी घरातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती. माझ्या दररोजच्या मागण्यांना कंटाळलेल्या वडिलांनी शेवटी आमच्या शेळीची दोन पिल्ले विकली. यातून मिळालेल्या पैशानं सायकल घेतली. अशा पध्दतीचा हट्ट प्रत्येक गोष्टीत धरल्यामुळे मला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट मिळवता आली. या स्वभावातूनच उंच उंच उड्डाणे घेण्याची स्वप्ने पाहू लागलो. या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मेहनत करण्याचीही सवय यातून लागली. पहिल्यांदा हिमालयात जाताना पुन्हा माझी छोटी शरीरयष्टी पाहून विरोध झाला, पण विरोधाला न जुमानता गेलो. पहिल्याच प्रयत्नात हिमालयातील शिखर चढल्यामुळे एव्हरेस्टची स्वप्ने पडू लागली. ते सत्यात उतरविण्यासाठी मोठ्या कष्टातून पायवाट काढावी लागली. हा सर्व संघर्षाचा इतिहास आपल्यासमोर आहेच. एकूणच बालपणीचा हट्ट हा भावी आयुष्यातील यशाचा मार्ग बनला. 
 
शब्दांकन : राम शिनगारे
 
 
समाधीतल्या दासोपंतांना भेटायचंय - दासू वैद्य, कवी
तसं अंबाजोगाई हे आमचं मूळ गाव; पण वडिलांच्या शिक्षकी पेशामुळं आम्ही दुसऱ्या गावी राहायचो. सुटीत मात्र अंबाजोगाईला मुक्काम असे. लोखंडी पेट्या, वळकटी, फिरकीचे तांबे घेऊन आमचं बिऱ्हाड अंबाजोगाईत दाखल होई. दुसऱ्या दिवशीपासून देवघर, मुकुंदराज समाधी, योगेश्वरी देवी, दासोपंत समाधी, हत्तीखाना, नागझरी अशी भटकंती सुरू असे. एका संध्याकाळी आम्ही सगळे दासोपंतांच्या समाधीदर्शनाला गेलो होतो. 
त्या संध्याकाळी आम्ही सर्व जण समाधीच्या आरतीसाठी थांबलो होतो. आरती झाली. त्या पुरातन चिरेबंदी समाधीला एका बाजूला एक छिद्र होतं. त्याला भक्तिभावे कान लावला तर आत श्वासोच्छ्वास ऐकू येतो, अशी वदंता होती. ‘जादूचा दिवा’, ‘उडती सतरंजी’, ‘परीकथा’ अशा विश्वात रमणारं माझं वय होतं. मी वडिलांकडं हट्ट धरला की, समाधीतल्या दासोपंतांना मला भेटायचंय. आरती झाल्यावर त्यांची झोपेची वेळ असते, अशी वडिलांनी समजूतही काढली; पण मला भेटायचंच होतं. ‘समाधीतल्या दासोपंतांना मला भेटायचंय. नाही तर मी घरीच येणार नाही,’ असा हट्ट धरला. आईनं समजूत काढली. ‘ते स्वर्गात गेल्यामुळं भेटू शकत नाहीत’ असं मला सांगितलं. मात्र तिचं ते म्हणणं मला पटत नव्हतं. ‘समाधीला कान लावल्यावर आत हालचाल ऐकू येते म्हणजे ते आत आहेत. मग मला का भेटू शकत नाहीत?’ संध्याकाळ गडद होऊ लागली. शेवटी पुजाऱ्यानं ग्रीलला कुलूप लावून समाधीस्थळ बंद केलं. मी मात्र पायरीवरच बसून होतो. आई समजावत होती. अखेर वडील रागानं येताना पाहून मी धूम पळालो अन् थेट कुंडाच्या भिंतीवर चढून बसलो. हिरव्यागार पाण्यानं भरलेलं पुरातन कुंड. वडिलांचा आवाज एकदम मऊ झाला. आई-वडील सारेच घाबरून गेले. समाधीतल्या दासोपंतांना भेटण्याचा हट्ट मी काही सोडला नव्हता. त्या अंधारून येणाऱ्या संध्याकाळी काकुळतीला आलेल्या आईच्या डोळ्यात पाणी चमकताना दिसत होतं. मला काय वाटलं कुणास ठाऊक; मी तात्पुरती माघार घेतली. वडिलांनी नंतर भेट करून देण्याचं आश्वासन दिलं आणि मी कुंडाच्या भिंतीवरून खाली उतरलो. घरी येईपर्यंत कुणीच कुणाशी बोलत नव्हतं.
चौकट
नाथांचे समकालीन असणारे दासोपंत हे संत कवी होते. रोज ढब्बू पैशाच्या शाईचं लेखन करणारे, अशी त्यांची ख्याती होती. शिवाय त्यांनी पासोडीवर (कपड्यावर) केलेल्या लेखनाची सर्वांना उत्सुकता होती, आहे. त्यांच्या साहित्याचा अभ्यास-संशोधन करण्यापेक्षा शिष्यांनी त्यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यातच धन्यता मानली. त्यातून या कवीबद्दल चमत्काराची चर्चा होत असे. हे चमत्कार लहानपणी खरे वाटायचे. 
 
 
रडून रडून चप्पल मिळविली... -  राजकुमार तांगडे, नाट्यलेखक व अभिनेते
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ हे माझे गाव. आज मागे वळून पाहताना आणि बालहट्ट आठवताना खूपच हसू येते. ‘न्याय्य’ हट्टासाठी केलेले लोकशाही मार्गाचे आंदोलनही आठवते. 
हट्ट पूर्ण करण्यासाठी मला रडणे, रुसून बसणे आणि वेळप्रसंगी लोकशाही मार्गाने उपोषण करावे लागत असे. नंतर आई-वडील माझा तो हट्ट पूर्ण करीत असत. मी खूप म्हणण्यापेक्षा प्रचंड हट्टी होतो. मुलांच्या काही गरजा असाव्यात याची जाणीव ग्रामीण भागात नसे. स्वेटर असावे असे मला खूप वाटायचे. हिवाळा आला की मी स्वेटरसाठी रड-रड रडायचो. आश्वासनातच हिवाळा निघून जात असे. मला आठवते मी सहा वर्षांचा असताना चप्पल घेण्यासाठी दोन दिवस रडत होतो. कुटुंबातील सर्व सदस्यांना चपला आणल्या. मला आणलीच नाही. कदाचित मी लहान असल्यामुळे त्यांना गरज वाटली नसावी; पण चप्पल का आणली नाही म्हणून सारखा रडत होतो. हा प्रकार वडिलांच्या लक्षात आला आणि त्यांनी एका पाहुण्यासोबत पाठवून जालन्याहून खास चप्पल आणली. 
माझे वेगळे खेळ असायचे. शेतातच एका छोट्या जागेत मी शेत-शेत खेळायचो. छोटेखानी शेतात पेरणी केली. गहू पेरला. मात्र, शेतात कोळपणीचे काम सुरू असताना माझी खेळ असलेली शेती मोडून टाकली. या प्रकाराने मला खूप त्रास झाला. मी जेवलोच नाही. वडील म्हणाले, दुसरीकडे शेती कर; पण मला काही ते शक्य झाले नाही. असेच एकदा गावातील कुत्री दगावल्याने तिची सहा पिले मी घरात आणली. बेताच्या परिस्थितीमुळे माणसांना दूध मिळणे शक्य नव्हते. तरीही माझ्या हट्टापायी घरातून विरोध झाला नाही. दोन दिवस हट्ट पुरविल्यानंतर तिसऱ्या दिवशी मला पिले दिसलीच नाहीत. त्यामुळे बराच उदास, कष्टी झालो. पिलांचे काय झाले हे मला माहीत नाही. आई रोज शेतात जायची. आईने घरी राहावे असा आग्रह मी धरायचो. आज रविवार आहे, जाऊ नको म्हणायचो. कधी रडून पाहायचो; पण तिला घरी थांबणे शक्य झाले नाही. गावच्या यात्रेत छायाचित्र काढण्यासाठी खूपदा हट्ट केला. अनेकवेळा मागणी केल्यानंतर तो पूर्ण झाला. तेव्हा मी सहा वर्षांचा होतो.
बालपणी खरी मजा बैलांच्या नावांच्या वेळी येई. आमच्या बैलजोडीचे नाव राजा आणि प्रधान्या. योगायागाने मलाही घरात व गावात राजाच म्हणत. या बैलजोडीचे नाव बदलण्याचा माझा हट्ट असे. खूप रडायचो. असे अनेक हट्ट करायचो. घरातच उपोषणाला बसत असे. जेवत नसे. शेवटी वडील बहीण-भावंडांना सांगून मला जेवणासाठी गळ घालत. आश्वासन देत. भूक अनावर झाल्यावर मग मीही जेवत असे. 
 
शब्दांकन- गजेंद्र देशमुख

Web Title: Children's Day Special: Tales of Honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.