मुलांच्या प्रश्नांचाही जाहीरनामा हवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:25 AM2019-04-08T06:25:34+5:302019-04-08T06:25:36+5:30
सेवाभावी संस्थेची अपेक्षा : संवाद साधून संकलित केल्या गरजा
मुंबई : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के प्रमाण मुलांचे असल्याने, यंदाच्या निवडणुकीत मुलांचे प्रश्न आणि त्यांच्या गरजा उमेदवारांनी विचारात घेण्याचे आवाहन ‘क्राय’ या सेवाभावी संस्थेने केले आहे. त्यासाठी त्यांनी काही बालकांचे सर्वेक्षण केले. डिजिटल क्लासरूम, कार्यान्वित असणारी शौचालये, मुलींसाठी वेगळी स्वछतागृहे, संगणक शिक्षण या बालकांच्या मुख्य गरजा असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
‘क्राय’ या लहान मुलांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेकडून ‘#चिल्ड्रेनमॅटर’ हा सर्व्हे हाती घेण्यात आला. यात संस्थेने यंदाच्या निवडणुकीत बालकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा आणि त्यांच्या अपेक्षाही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. क्राय व सोबतच्या काही सेवाभावी संस्थांनी क्रायच्या विविध प्रकल्प क्षेत्रांमध्ये १००० हून अधिक बालकांशी शिक्षण, आरोग्य व पोषण, संरक्षण व सुरक्षा, राहणीमानाचा दर्जा व अस्तित्व यांच्याशी संबंधित दैनंदिन आव्हान ठरणाऱ्या निरनिराळ्या समस्यांबाबत संवाद साधला. या संवादादरम्यान आढळलेले निष्कर्ष क्रायने ‘आमच्या सरकारकडून आमच्या अपेक्षा : भारतातील बालकांचा आवाज’ या अहवालाच्या स्वरूपात जाहीर केल्या आहेत.
शाळेतील पिण्याच्या पाण्यासोबत, निरोगी आरोग्य, त्यासाठी आवश्यक सोईसुविधा, पोषक आहार अशा अपेक्षाही मुलांनी अहवालात आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. २०१६-१७च्या युडायस डेटाप्रमाणे देशातील केवळ ५ टक्के शाळा या मुलांना १ ते १२वी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण देतात, त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी अद्याप तरी कठीणच आहे.
याशिवाय देशातील एक तृतीयांशपेक्षाही कमी शाळांत संगणक शिक्षण दिले जाते. त्यामुळे ही परिस्थिती समोर ठेवून मुलांच्या या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि त्यांचे जीवन अधिक उत्तम करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दर्शविण्याची जबाबदारी आता आपली असल्याचे मत, क्राय संस्थेचे (पश्चिम) प्रादेशिक संचालक क्रीयान रबाडी यांनी व्यक्त केले.
बालकांसाठी मॉक मतदानाचा कार्यक्रम
बालकांना केंद्रस्थानी ठेवून विचार करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याच्या वरील प्रयत्नाचा भाग म्हणून क्रायचे स्वयंसेवक ६ एप्रिल रोजी फिनिक्स मार्केट सिटी, कुर्ला येथे आणि १३ एप्रिल रोजी रघुलीला मॉल, वाशी येथे मॉक बुथ उभारणार आहेत. येथे लोकांना बालकांबद्दलची स्वप्ने पिवळ्या चिठ्ठीवर लिहिण्याचे आणि आपले मत बालकांसाठी नोंदविण्याचे आवाहन करणार आहेत. त्या बदल्यात, क्रायचे स्वयंसेवक लोकांच्या बोटावर पिवळा ठिपका (मतदानानंतर लावल्या जाणाºया निळ्या शाईऐवजी) लावणार आहेत.