सहनशीलतेअभावी मुलांच्या आत्महत्या

By admin | Published: August 8, 2016 01:17 AM2016-08-08T01:17:52+5:302016-08-08T01:17:52+5:30

मुलांमधील सहनशीलता कमी होत असल्याने आत्महत्येच्या घटनांचा आलेख वाढतच आहे. गेल्या वर्षभरात परीेक्षेत अपयश आल्याने व अन्य कारणाने आत्महत्या केलेल्या किशोरवययीन मुला-मुलींची संख्या ५ आहे

Children's suicides due to lack of patience | सहनशीलतेअभावी मुलांच्या आत्महत्या

सहनशीलतेअभावी मुलांच्या आत्महत्या

Next

पूनम पाटील, पिंपरी
मुलांमधील सहनशीलता कमी होत असल्याने आत्महत्येच्या घटनांचा आलेख वाढतच आहे. गेल्या वर्षभरात परीेक्षेत अपयश आल्याने व अन्य कारणाने आत्महत्या केलेल्या किशोरवययीन मुला-मुलींची संख्या ५ आहे. मुलांच्या आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता, मानसोपचार तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांनी नैैराश्यामुळे आणि सहनशिलता नसल्याने आत्महत्या होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
आत्महत्येमागे कौटुंबिक वातावरण, पालकांचा दबाव, ईर्षा, द्वेष, भांडण, मारामारी, सततचे अपयश यांमुळे येणारे नैराश्य, न्यूनगंड अशी कारणे आहेत. हीच कारणे वेळीच ओळखून योग्य ते मार्गदर्शन केले, तर आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते, असे मत मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक व बालरोगतज्ज्ञ यांनी व्यक्त केले.
बदलत्या मानसिकतेमुळे व चुकीच्या समाजीकरणामुळे मुले वाढत्या स्पर्धेत टिकू शकत नाहीत. पालकांच्या वाढत्या अपेक्षेमुळे मुले तणावाखाली जातात. मी कुणाचा नाही व कुणी माझे नाही. हे जगच आपल्या विरोधी आहे, असा चुकीचा समज करून घेतात व आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेऊन जीवन संपवितात. काही कडक निर्णय, काही समजुतीच्या गोष्टी, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ यांचा सल्ला आदी पालकांनी अमलात आणल्या, तर आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते.
मुलांमध्ये वाढणाऱ्या एकलकोंडेपणा, हट्टीपणा आणि संवादाची कमतरता याला पालक जबाबदार असतात.

कुटुंबातील एकेरी संवादामुळे मुलांना समजून घेतले जात नाही. त्यांची मनाची संभ्रमावस्था होते. त्यामुळे मुलांमध्ये आत्महत्येची भावना वाढत चालली आहे. मुलांमध्ये सकारात्मकता वाढविणे गरजेचे आहे. असे महिला दक्षता समितीच्या स्मिता कुलकर्णी यांनी सांगितले. याबाबत पालकांनीही मुलांना समजावून घेण्यासाठी समुपदेशन करुन घेणे गरजेचे आहे, असेही काहींनी मत व्यक्त केले.

मुलांचे वय विचारात न घेता त्यांना हवे ते दिले जाते. पालकांकडून पुरविले जाणारे हट्ट यांमुळे नकारात्मकता पचविण्याची त्यांची मानसिकता कमी होते. स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता खालावत चालली आहे. अपयशामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. हे रोखण्यासाठी पालकांनी मुलांना संस्कारक्षम बनिवणे गरजेचे आहे, असे समुपदेशक तनुजा खेर यांनी स्पष्ट केले.

वाढत्या वयाबरोबरच मुलांमध्ये होणारे अंतर्गत बदल, येणाऱ्या जबाबदाऱ्या, शिक्षण, नातेसंबंध, समवयस्क यातील समतोल साधता नाही आला, तर मुले निराशेच्या गर्तेत जातात. आत्महत्येचा पर्याय निवडतात. तसेच पालकांशी तुटत चाललेला संवाद, ताणतणाव, नैराश्य, नातेसंबंध या सर्व गोष्टी आत्महत्येसाठी प्रवृत्त करतात. आत्महत्या रोखण्यासाठी वयाच्या १२ त १३ वर्षांपासूनच मुलांना जिवन शैैली संबंधीचे शिक्षण देणे गरजेचे आहे, असे वायसीएम रुण्गालयाचे मनोविकृती चिकित्सक किशोर गुजर यांनी नमूद केले.


महिलांकडे तक्रार देण्याचे धाडस
नवनाथ शिंदे, पिंपरी
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कायद्यात अनेक बदल झाले असून महिलासुद्धा आता तक्रार देण्यास पुढे येण्याचे धाडस दाखवू लागल्या आहेत. अन्यायाविरुद्ध तक्रारी करणाऱ्या मुलींचे प्रमाण ६० ते ७० टक्के झाले असून स्वयंसंरक्षणासाठी कराटे व अन्य प्रशिक्षणास प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.
भगिनी हेल्पलाइनच्या संचालक अ‍ॅड़ सुप्रिया कोठारी म्हणाल्या, ‘‘शहरात गेल्या काही दिवसांपासून छेडछाडीसारख्या घडणाऱ्या घटनांना प्रखरतेने विरोध करणाऱ्या मुली आणि महिलांमध्ये वाढ होत चालली आहे़ त्यामुळे ही कौतुकास्पद बाब असल्याचे कोठारी यांनी स्पष्ट केले़ कामाच्या ठिकाणी किंवा महाविद्यालय परिसरासह सार्वजनिक ठिकाणच्या छेडछाडीच्या प्रकाराविरुद्ध महिला पुढे येऊन तक्रारी करू लागल्या आहेत़ कायद्यातील विविध बदलांमुळे अन्यायाविरुद्ध तक्रारी करणाऱ्या मुलींचे प्रमाण ६० ते ७० टक्के वाढले असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली़ टोळक्याकडून मुलींची छेडछाड होत असल्याने तिचा प्रतिकार कमी पडत असतो़ सजग नागरिकांनी बघ्याची भूमिका न घेता पुढे येऊन महिलांच्या मदतीसाठी धाव घेतली पाहिजे.’’
राज्यांमध्ये मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे़ विशेषत: अशा घटनांना सामोरे प्रसंग महाविद्यालयीन तरुणींवर अनेक वेळा आला आहे़ महिलांनी कराटेचे धडे घेण्याची गरज असल्याचे मत समपुदेशकांनी व्यक्त केले आहे.

मुली आणि महिलांमध्ये स्वसंरक्षणाची ताकद वाढत आहे़ महिला किंवा तरुणींनी कोणताही वाईट प्रसंग उद्भवल्यास न घाबरता पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी़ तुम्ही दिलेल्या तक्रारीची पोलिसांना दखल घ्यावी लागते़ त्यामुळे अनेक तरुणींना बळ मिळेल़
- अ‍ॅड़ सुप्रिया कोठारी,
संचालक, भगिनी हेल्पलाइन

Web Title: Children's suicides due to lack of patience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.