झोपडीत कार घुसून बालकाचा मृत्यू
By admin | Published: October 5, 2015 02:27 AM2015-10-05T02:27:38+5:302015-10-05T02:27:38+5:30
रस्त्याकडेला असलेल्या झोपडीमध्ये कार घुसून झालेल्या भीषण अपघातात ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या आईसह कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले.
शेंद्रे (जि. सातारा) : रस्त्याकडेला असलेल्या झोपडीमध्ये कार घुसून झालेल्या भीषण अपघातात ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या आईसह कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सातारा-आसनगाव रस्त्यावरील सोनगाव, ता. सातारा येथील बसथांब्याजवळ रविवारी सायंकाळी ७ वाजता झाला. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्लोक युवराज मदने (११ महिने) असे ठार झालेल्या बालकाचे नाव, तर सोनाली युवराज मदने (२२), नीता विनोद मदने (२५), पूर्वा विनोद मदने (३), उदय विनोद मदने (अडीच वर्षे) अशी जखमींची नावे आहेत.
सातारा-आसनगाव रस्त्याच्या कडेला सोनगाव येथे युवराज मदने आणि विनोद मदने यांची कुडाची झोपडी आहे. रविवारी सायंकाळी सोनाली, नीता या स्वयंपाक करत होत्या. याचवेळी भरधाव कार अचानक झोपडीत घुसली. सर्व जण कारखाली सापडले. जमलेल्या नागरिकांनी सुमारे २० मिनिटांच्या प्रयत्नानंतर चक्क कार उचलून जखमींना बाहेर काढले.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कारचालक मुकुंद परशुराम साळुंखे (रा. सोनगाव) व त्याची कार ताब्यात घेतली. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)