मुलाच्या नादाने बापही बिघडला
By admin | Published: June 22, 2016 02:14 AM2016-06-22T02:14:56+5:302016-06-22T02:14:56+5:30
पायाला झालेल्या दुखापतीमुळे नोकरी सोडल्यानंतर मुलाच्या संगतीने गुन्हेगार बनलेल्या माथाडी कामगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई : पायाला झालेल्या दुखापतीमुळे नोकरी सोडल्यानंतर मुलाच्या संगतीने गुन्हेगार बनलेल्या माथाडी कामगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या कुटुंबासह इतर एका टोळीला पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून घरफोडीच्या ४८ गुन्ह्यांची उकल केली असून ३९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचा तपास सुरू असताना दोन सराईत टोळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे निरीक्षक अशोक राजपूत व युनिट ३ चे निरीक्षक नंदकुमार पिंजण यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. त्यापैकी युनिट ३ च्या पथकाने अटक केलेल्या टोळीमध्ये बाप-लेकांचाच समावेश आहे.
महादेव व्हनकोरे (४८) असे या माजी माथाडी कामगाराचे नाव असुन किसन (२०) व सचिन (२२) दोघे त्याची मुले आहेत. त्यांना घणसोली दर्ग्यासमोरून अटक करण्यात आली असून ते पनवेलचे राहणारे आहेत. महादेव याने एपीएमसी मार्केटमध्ये १६ वर्षे माथाडी कामगाराची नोकरी केल्यानंतर १५ वर्षांपूर्वी पायाला दुखापत झाल्यामुळे नोकरी सोडली. यानंतर काही वर्षांनी कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवल्यामुळे त्याचा मुलगा किसन हा गुन्हेगारीकडे वळला होता. कालांतराने वडिलासह मोठ्या भावाने देखील त्याला साथ दिली. त्यानुसार मुलांनी चोरुन आणलेल्या दागिन्यांची तो विल्हेवाट लावायचा. त्याने चोरीचे दागिने स्वत:चे भासवून स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँक तसेच पनवेलचे पटेल ज्वेलर्स, सोलापूरचे कालिका ज्वेलर्स व कोपरखैरणेतील महादेव ज्वेलर्स याठिकाणी विकले अथवा गहाण ठेवले होते. त्यांनी केलेल्या २३ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
युनिट १ च्या पथकाने दुसऱ्या टोळीकडून २५ गुन्ह्यांची उकल करुन १९ लाख ८८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्यांमध्ये राजकुमार पांचाळ (३४), मेहमुद अन्सारी ऊर्फ पप्पू (४६), मनोज केशरवाणी (३२), अनिल केशरवाणी (३०) व नरसिंग चौहाण (२८) यांचा समावेश आहे. सर्व जण कल्याण व भिवंडी परिसरातील राहणारे असून दिवसा घरफोडी करायचे, तसेच चोरीचे दागिने मुत्थुट किंवा मन्नपुरम फायनान्समध्ये अथवा सोनाराकडे गहाण ठेवायचे. ही टोळी दिवसा घरफोड्या करण्यात सराईत आहे.
दोन्ही पथकांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून एकूण ४८ गुन्ह्यांची उकल करून ३९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्यासह दोन्ही पथकाचे तपास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.