मालमत्तेसाठी मुलाकडून आईचा छळ; गुन्हा दाखल
By Admin | Published: March 3, 2017 01:27 AM2017-03-03T01:27:48+5:302017-03-03T01:27:48+5:30
जिल्ह्यात पहिलाच गुन्हा : सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातील प्रकार
अकोला, दि.२ : आईचा सांभाळ न करता, तिला संपत्तीमध्ये वाटा मागण्यासाठी मोठा मुलगा आईचा मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार गुरुवारी सायंकाळी खदान पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी मोठ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ नागरिक व पालक संरक्षण कायद्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा जिल्ह्यातील पहिला असल्याची माहिती ठाणेदार गजानन शेळके यांनी दिली.
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस खात्यात सेवानिवृत्त झालेले एक अधिकारी राहतात. गुरुवारी त्यांच्या पत्नीने खदान पोलीस ठाण्यात मोठ्या मुलाविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीमध्ये त्यांचा मोठा मुलगा हा संपत्तीमध्ये वाट मागत असून, त्यासाठी आईला मारहाण करतो. आईचा सांभाळ करण्याची जबाबदारी असतानाही तिचा सांभाळ करीत नाही. तसेच आईचा मानसिक व शारीरिक छळ करतो. मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली तर समाज आपल्याला काय म्हणेल, आपले पती पोलीस खात्यातून अधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्यांची प्रतिष्ठा, रुबाब बघता, आईने मुलाविरुद्ध तक्रार केली नाही; परंतु मोठ्या मुलाचा अत्याचार असह्य झाल्यामुळे अखेर आईने गुरुवारी सायंकाळी खदान पोलीस ठाणे गाठले आणि मुलाविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीमध्ये आपल्याला दोन मुले, एक मुलगी आहे. लहान मुलगा व मुलगी पुण्याला राहतात. मोठा मुलगा त्यांच्याकडे राहतो. तो कोणताही कामधंदा करीत नाही. उलट संपत्तीमध्ये वाटा मागण्यासाठी भांडतो आणि प्रसंगी मारहाण करतो, असे म्हटले आहे. आईच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी मोठ्या मुलाविरुद्ध ज्येष्ठ नागरिक व पालक यांच्या मालमत्तेचे व जीविताचे संरक्षण करणारा कायदा कलम २४(२00७) नुसार गुन्हा दाखल केला.
शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी कायदा केलेला आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मुलांकडून काही त्रास असल्यास पोलिसांसोबत संपर्क साधावा.
- गजानन शेळके, ठाणेदार
खदान पोलीस स्टेशन