मंत्रालयावर ‘चिल्लर फेको’ आंदोलन
By admin | Published: August 25, 2016 05:58 AM2016-08-25T05:58:20+5:302016-08-25T05:58:20+5:30
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी भारती या विद्यार्थी संघटनेने मंत्रालयासमोर बुधवारी चिल्लर फेको आंदोलन केले.
मुंबई : रहेजा स्कूल आॅफ आर्टमधील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी भारती या विद्यार्थी संघटनेने मंत्रालयासमोर बुधवारी चिल्लर फेको आंदोलन केले. मात्र, आंदोलनात सामील झालेल्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी उपस्थित पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याने आंदोलनाला गालबोट लागले आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा विविध संघटनांकडून निषेध केला जात आहे.
शिक्षणाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या गैरप्रकाराची दहीहंडी फोडून विद्यार्थी भारती संघटनेने संताप व्यक्त केला. दरम्यान, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थी आक्रमक झाले होते. मात्र, त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दुखापती झाल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी ८०हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून रहेजा स्कूल आॅफ आर्टमधील विद्यार्थ्यांचा प्रशासनाविरोधात लढा सुरू आहे. शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट होत असून, विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.
मात्र, वारंवार तक्रारी केल्यानंतरही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पूर्व सूचना देत, संघटनेने आंदोलन पुकारले होते. मात्र, तरीही विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्याऐवजी सरकारने पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचे विद्यार्थी भारतीचे विजेता भोनकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)