चिकुनगुनियाने नागरिक बेजार
By Admin | Published: June 13, 2016 02:02 AM2016-06-13T02:02:14+5:302016-06-13T02:02:14+5:30
चऱ्होली परिसरात १५ दिवसांपासून चिकुनगुनियाची साथ सुरू आहे.
दिघी : चऱ्होली परिसरात १५ दिवसांपासून चिकुनगुनियाची साथ सुरू आहे. घरात एकतरी चिकुनगुनियाने बाधित झालेला रुग्ण आढळत आहे. दरम्यान, अशुद्ध पाणीपुरवठा व अनियमित साफसफाईमुळेच साथ पसरली असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, या आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे वायसीएम रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांनी सांगितले.
या परिसराची लोकसंख्या २० हजारांच्या वर आहे. गेल्या १५ दिवसांपासून चिकुनगुनियाच्या साथीने या परिसरात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. डोकेदुखी, अंगदुखी, ताप येणे या आजाराची मुख्य लक्षणे आहेत.
महापालिकेतर्फे या परिसरासाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र वाहिनी आहे. मात्र,गेल्या वर्षभरापासून जलवाहिनी गळत असून, अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे जलवाहिनीजवळ ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचून, तेथील गढूळ पाणी पुन्हा जलवाहिनीत जात असल्यामुळे रहिवाशांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. या अशुद्ध पाण्यामुळेच साथ आली असल्याची चर्चा आहे.
येथील महापालिकेच्या उपप्राथमिक केंद्रात परिसरातील नागरिक उपचार घेण्यासाठी येत असून, काही नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेताना दिसून येत आहेत. या आरोग्य केंद्रात कर्मचारी संख्या अपूर्ण असल्यामुळे रुग्णांवर उपचार करताना या कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण येत असून, लवकर उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांचीदेखील हेळसांड होत आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर येथील साफसफाई व पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन, त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांतर्फे करण्यात येत आहे. (वार्ताहर)
।चऱ्होलीत ताप, अंगदुखी, डोकेदुखी या आजाराची साथ आहे. मात्र, चिकुनगुनिया या आजाराचा एकही रुग्ण आतापर्यंत केलेल्या तपासणीत आढळलेला नाही. अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे अशा प्रकारच्या आजाराची प्राथमिक लक्षणे दिसून येत आहेत. तरी यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी प्रत्येक नागरिकाची तपासणी करून उपचार करीत आहेत. तसेच नागरिकांना पाणी उकळून पिणे, उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. या संदर्भातही प्रसिद्धिपत्रके वाटून परिसरात जनजागृती करण्यात येत आहे.
- डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय अधिकारी,
वायसीएम रुग्णालय, पिंपरी