पैसे उकळण्यासाठी घेतला चिमुरडीचा जीव
By admin | Published: July 6, 2017 03:21 AM2017-07-06T03:21:34+5:302017-07-06T03:21:34+5:30
केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिव, दमन येथून स्वस्तात मिळणारी दारू आणून ती गावी अकोल्यात विक्री करायची, त्यातून मिळणाऱ्या पैशांवर मजा
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिव, दमन येथून स्वस्तात मिळणारी दारू आणून ती गावी अकोल्यात विक्री करायची, त्यातून मिळणाऱ्या पैशांवर मजा करायची. उधारीवर पैसे घ्यायचे, परतफेड करता आली नाही तर भुरट्या चोऱ्या करायच्या, अशी कृत्य करणाऱ्या बेरोजगारांनी पैशासाठी तनिष्का अमोल आरुडे या चार वर्षाच्या बालिकेचा बळी घेतला. ज्यांच्या इमारतीत खोली भाड्याने घेऊन राहत होते, त्यांच्याच मुलीचे अपहरण करून खून केला. खुनानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. अशा दोन बेरोजगार आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
चऱ्होलीतील वडमुखवाडी येथून चार वर्षाची तनिष्का ही बालिका २८ जूनपासून बेपत्ता झाली होती. मात्र, तिचा खून करून मृतदेहाची अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर येथे विल्हेवाट लावणाऱ्या शुभम विनायक जामनिक (वय २१), प्रतीक साठले (वय २३ ) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. शुभमला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. तर प्रतीक साठले यास ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अमोल आरुडे यांच्याकडे शुभम जामनिक याची आई आणि बहीण भाड्याने राहाते. तो नेहमी अकोल्याहून चऱ्होलीत येत असे. दमन येथून दारू आणून अकोल्यात विक्री करण्यासाठी आरोपींनी एक मोटार भाड्याने घेतली होती. भाडे नियमितपणे देऊ न शकल्याने त्यांच्यावर कर्ज झाले होते. तनिष्काच्या वडिलांकडून पैसे मिळतील, या अपेक्षेने त्यांनी हे कृत्य केले. तनिष्काचे वडीलअमोल यांनी त्यांची पत्नी योगीता यांना किराणा दुकानात थांबवले. ते गाडी सर्व्हिसिंगसाठी चिंचवडला गेले. योगीता मोठ्या मुलीला घेण्यासाठी शाळेत गेल्या त्या वेळी तनिष्का घरात खेळत होती. खाऊचे आमिष दाखवून तनिष्काला एका खोलीत घेतले. वडमुखवाडी येथेच तिचा गळा दाबुन खून केला.
मोठ्या बॅगेत भरून मोटारीतून मृतदेह अकोल्यातील मूर्तिजापूरला नेला. विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जाळला,अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांनी पुरला. तनिष्का १२ च्या सुमारास गायब झाली. तर शुभम दुपारी ३ वाजता चऱ्होलीतून निघून गेला होता. हे संशयास्पद वाटल्याने दिघी पोलिसांनी त्याच्याशी फोनवरून संपर्क साधून त्याला बोलावून घेतले. चौकशी केली.
पोलिसांचे पथक मूर्तिजापूरला गेले. तेथून त्यांनी मृतदेह पुरल्याचे ठिकाण शोधले. अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, सहायक पोलीस आयुक्त वसंत तांबे, दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी भुजबळ, बाळासाहेब टोके, हरीष माने, शिवाजी भुजबळ, दिनेश डोंबळे, सुनील गवारी, बबन वन्ने, रवि नाडे, शेखर शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
बॅगेत भरलेल्या मृतदेहाचा मोटारीतून प्रवास
चऱ्होली ते अकोल्यातील मूर्तिजापूर हे सुमारे ६४० किलोमीटरचे अंतर आहे. आरोपींनी तोंडावर उशी ठेवून तनिष्काचा चऱ्होलीत खून केला. विल्हेवाट लावण्यासाठी तो मोटारीतून अकोला येथे नेला. पंचविशीतील या तरुणांनी अत्यंत शिस्तबद्धरीत्या हे कृत्य केले. मुलीचे अपहरण, खून, नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. तनिष्काचा मृतदेह जाळला. परंतु अर्धवट जळाल्याने त्यांनी तो पुरला. पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.