चिंब पावसानं रान झालं आबादानी...

By admin | Published: August 19, 2015 10:23 PM2015-08-19T22:23:29+5:302015-08-19T22:23:29+5:30

कारण-राजकारण

Chimba pasanan rah zala populate ... | चिंब पावसानं रान झालं आबादानी...

चिंब पावसानं रान झालं आबादानी...

Next

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून महाराष्ट्रप्रांती वाद पेटला असताना सांगलीत मात्र राजकारणाच्या श्रावणधारा कोसळू लागल्यात. प्रत्यक्षात आभाळातून पाण्याचा टिपूसही येत नाहीय, पण अखंड जिल्हा राजकीय सरींमुळं चिंब भिजायला लागलाय.
सांगलीच्या बाजार समितीत ‘पतंग’ नक्षत्रानं रात्रीत पाऊस पाडल्यानं काँग्रेसच्या पॅनेलवर मतांचा वर्षाव झाला. परिणामी ‘पतंग’ नक्षत्राच्या आशा पल्लवीत झाल्या. जिल्हाभरातलं रान आता आपलंच म्हणून या नक्षत्रानं पुढचं ‘टार्गेट’ खानापूर-विटा असल्याचं सांगून टाकलं. त्यामुळं टोपी आणि गोपी दोघंही बुचकळ्यात पडले. ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा...’ अशी हाक देणाऱ्या या दोघांनाही आता ‘पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा’ असं म्हणावं लागतंय. खानापूरच्या बाजार समितीत मोहनशेठ-अनिलभाऊंची सर धावून आल्यानं टोपीचं मडकं वाहून गेलं, तर आटपाडीत राजेंद्रअण्णांच्या लाटेत गोपी भुईसपाट झाला. संजयकाकांची प्रेमळ रिमझिम अंगावर झेलल्याचा हा परिणाम! एवढं होऊनही गोपी म्हणतोय,सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय,काकांमुळं एखादं महामंडळ मिळेल काय?दुसरीकडं ‘पतंग’ नक्षत्राच्या भयानं टोपीही हलायला लागलीय. विटा नगरपालिकेत या नक्षत्राचा कोप झाला तर काय, या भीतीनं टोपीखाली सुरू असलेली कुजबूज ऐकायला मिळतेय, ती अशी :
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय,पतंगाची दोरी विट्यात तरी कटेल काय? तिकडं पार पूर्वेला जतमध्ये पावसाचा थेंब नाही, पण जगतापसाहेब आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा झिम्माड पाऊस कोसळू लागलाय. ‘पतंग’ नक्षत्राच्या पावसामुळं सावंत कंपनी-शिंदे सावकारांचा हुरूप वाढलाय. जतमध्ये म्हैसाळ योजनेच्या पाण्याला भरती आल्याची स्वप्नं त्यांना भरदिवसा पडू लागलीत.श्रावणात घन निळा बरसला...हे मंगेश पाडगावकरांचं गाणं गुणगुणत ते ‘पतंग’ नक्षत्राभोवती फेर धरू लागलेत. या नक्षत्रानं असंच कायम बरसावं, यासाठी त्यांनी जगतापसाहेबांवर आरोपांच्या कृत्रिम पावसाची रॉकेट सोडायला सुरुवात केलीय. त्यामुळं जगतापांचे सवंगडी,ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना...असा सूर आळवत तालुक्याला साद घालताहेत. (अर्थात जतचा पाऊस असा थोडाच येतोय! ‘जयंत नक्षत्र’ही तिथं कुचकामी ठरतंय.)शेजारच्या कवठेमहांकाळमध्ये आबांच्या गटाला नेतृत्वाच्या दुष्काळी झळा जाणवताहेत. कुठल्या कृत्रिम नक्षत्रावर नव्हे तर मनगटाच्या जोरावर पाऊस पाडणारी ही माणसं. सांगली बाजार समितीत त्यांनी तिथं आयात केलेलं ‘सुरेशभाऊ नक्षत्र’ बाद ठरवत ‘जयंत-काका’ नावाच्या नव्या नक्षत्रालाही कवठ्याचं पाणी दाखवलं... पण त्यांना आबांसारखा पाऊस आणणारा ‘बारीशकर’ काही दिसेना झालाय. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत सौभद्र’मधलं पद ही मंडळी आळवताहेत...नभ मेघांनी आक्रमिले, तारांगण सर्वहि झाकुनि गेले...
परवा कवठ्यात सुमनतार्इंच्या उपस्थितीत बैठक झाली. माजी सभापती अनिल पाटील, पिंटू कोळेकर, चंदूबापू हाक्के तिथं होते. बाजार समिती निवडणुकीत आबांच्या घरची माणसं कवठ्यात प्रचाराला आली नसल्याचा जाब विचारला गेला. काहीतरी सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला, पण कवठेकरांनी ‘सुरेशभाऊ नक्षत्र’ किती फोल ठरतंय, हे ठासून सांगितलं. मिरजेच्या गेस्ट हाऊसवर झालेल्या बैठकीत ‘पतंग’ नक्षत्राच्या पावसात चिंब झाल्यानंतर ‘सुरेशभाऊ नक्षत्र’ कसं तिकडं वळलं गेलं, याचा पाढाच वाचला गेला.
भेट तुझी माझी स्मरते, अजुनी त्या दिसाची,
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची...
हे मंगेश पाडगावकरांचं गीत मनातल्या मनात म्हणणाऱ्या ‘सुरेशभाऊ’ नक्षत्राच्या कर्तुत्वामुळं आता आम्ही दुसरं नक्षत्र बघतो, असे इशारे चिडलेल्या मंडळींनी दिले. हे सगळं इस्लामपूरला कळवलं गेलं. मग लगेच तिकडून नाकदुऱ्या काढल्या गेल्या म्हणे! या राजकीय सरींमध्ये घोरपडे सरकार मात्र मालामाल झाले. त्यांच्या गटाच्या करपलेल्या कोंबांना ‘पतंग’ नक्षत्रानं जीवदान दिलं...
नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं,
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात...
असं म्हणत घोरपडे सरकार आता संजयकाका आणि आबा गटालाही वाकुल्या दाखवू लागलेत. आबा असताना तासगावात त्यांचा गट मनभावन श्रावणातल्या सरी अनुभवत होता.
श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे
असं तेव्हाचं चित्र होतं. आता खमकं नेतृत्व नाही. ‘जयंत’ नक्षत्राचं विमान बारामतीकरांच्या आदेशामुळं खेळपट्टीवरच थांबून आहे. (या नक्षत्राची करामत बारामतीकरांना ठाऊक आहे. त्याच्या बरसण्यानं तासगावच्या पाटात ‘कमळ’ उद्यान फुलायला वेळ लागणार नाही, हे जाणून असल्यानं त्याला त्यांनी जास्त हालचाल करू दिलेली नाही.) एकमुखी नेतृत्व नाही आणि त्यामुळं ‘अजेंडा’ही नाही. परिणामी...
वादळवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गोऽऽ
अशी अवस्था तिथल्या आबा गटाची झालीय.
फुल्ल फॉर्मात असलेलं ‘पतंग नक्षत्र’ सांगली महापालिकेत बरसणार, असं वाटत असतानाच पाऊस पाडणाऱ्या विमानानं ‘यू टर्न’ घेऊन मदनभाऊंना बाय दिला. त्यामुळं किशोरदादा, इद्रिसभाई वगैरे मंडळी हिरमुसली. (अर्थात ही मंडळी कधी कुणाला जवळ करतील आणि कधी कुणाला तोंडावर पाडतील, हे सांगता येत नाही, याचा अंदाज असल्यानंच ‘पतंग नक्षत्र’ मागं फिरलं असावं!)
जाता-जाता : यंदा वसंतदादा कारखान्यावर श्रावणातली हिरवी-पोपटी पानं जादाच दिसायला लागलीत. डीसीसी बँकेत विशालदादा निवडून आले. पाठोपाठ बाजार समिती हातात आली. त्यामुळं ‘पतंग’ नक्षत्राच्या साथीनं तिथं नव्यानं पालवी फुटायला लागलीय. शांताबाई शेळकेंची भावगीतं तिथं ऐकायला येताहेत...
आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे
जशी अचानक या धरतीवर गर्जत आली
वळवाची सर, तसे तयाने गावे...
ताजा कलम : ‘एका लुगड्यानं बाई म्हातारी होत नसते’, अशी प्रतिक्रिया एकेकाळी विरोधकांचा गुलाल बघून ‘अस्मिता’ बंगल्यावरून उमटली होती. ‘मोदींच्या गोमूत्रानं अनेकजण पवित्र झालेत,’ असा टोमणाही मारला गेला होता. आता आपल्या चमत्कारामुळं धुँवाधार पाऊस पडू शकतोय, हे स्पष्ट झाल्यानं ‘पतंग’ नक्षत्रानं जिल्हाभरात पाऊस पाडण्याची तयारी केलीय. त्यामुळं बंगल्यावर शांता शेळके-श्रीधर फडके-आशा भोसले या त्रयींची गाणी वाजू लागलीत...
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रूजवा
युग विरही हृदयांवर, सरसरतो मधु शिरवा...
- श्रीनिवास नागे

Web Title: Chimba pasanan rah zala populate ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.