चिमुरड्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
By admin | Published: May 24, 2017 01:54 AM2017-05-24T01:54:14+5:302017-05-24T01:54:14+5:30
हृदयाच्या चारही कप्प्याचे कार्य सामान्यपणे सुरु नसून त्यातच हृदय उजव्या बाजूला असल्याने सहा वर्षीय संकेत मोरेची प्रकृती खालावली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: हृदयाच्या चारही कप्प्याचे कार्य सामान्यपणे सुरु नसून त्यातच हृदय उजव्या बाजूला असल्याने सहा वर्षीय संकेत मोरेची प्रकृती खालावली होती. औरंगाबाद, पुण्यात उपचार करुनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला मुंबईला हलवण्यात आले. मुंबईच्या सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून त्याला जीवनदान मिळाले आहे.
संकेत हा मूळचा औरंगाबादचा असून त्याचे वडील शेतकरी आहेत. संकेतचे हृदय उजव्या बाजूला आहे. त्यातच त्याच्या हृदयाचे कार्य सामान्यपणे सुरु नव्हते. हृदयाला एकूण चार कप्पे असतात. प्रत्येक कप्प्याचे एक विशिष्ट कार्य आहे. त्याच्या हृदयाच्या कप्प्यांचे आणि धमण्यांचे कार्य परस्पर बदले होते. त्यामुळे त्याच्या हृदयात गुंतागुंत वाढली होती. यामुळे संकेतचा त्रास बळावला असल्याचे बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीपाल जैन यांनी सांगितले. पुण्याचे बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी संकेतला मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला.
संकेतच्या हृदयात छिद्र होते, त्यातच कप्प्यांचे आणि धमणीचे कार्य सुरळीत सुरु नव्हते. त्यामुळे गुंतागुंत वाढली होती. हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणारी धमणी छोटी होती. यामुळे सामान्यपणे अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाते. पण, संकेतच्या हृदय कार्यातील बिघाडामुळे अशुद्ध रक्त कमी प्रमाणात फुफ्फुसाकडे जात होते. या दोन अवयवांना जोडणाऱ्या भागात धमण्यांची गर्दी असल्याने संकेतचा त्रास वाढला होता.
संकेतच्या प्राथमिक तपासण्या पूर्ण झाल्यावर त्याला होणारा त्रास शोधून काढण्यासाठी त्याची इकोकार्डिओग्राफी करण्यात आली. तपासणीनंतर तीन टप्प्यांत शस्त्रक्रिया केली. पहिल्या टप्प्यात शस्त्रक्रियेत अशुद्ध रक्ताच्या शुद्धीकरणासाठी थेट फुफ्फुसांकडे वळवले. हृदयाचे छिद्र बंद करुन हृदयाच्या डाव्या कप्प्यात कृत्रिम ट्यूब लावली. शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीचा टप्पा म्हणजे कृत्रिमरित्या हृदयाची रक्ताभिसरण प्रक्रिया सुरु करणे हा होता.
पुढचे काही दिवस रक्तदाबाचे औषध सुरु राहील. आता संकेत खाऊ लागला असून थोड्याफार प्रमाणात फिरत आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले.