डंपरच्या धडकेत चिमुकला ठार
By admin | Published: October 24, 2016 05:24 PM2016-10-24T17:24:55+5:302016-10-24T22:16:05+5:30
दुपारची दीड पावणेदोनची वेळ... रंगभवनजवळील ईदगाह मैदानाजवळच्या रोडवरून अचानक वाळू वाहतुकीचा डंपर येतो अन् क्षणातच समोरच्या दुचाकीला उडवतो
Next
>विलास जळकोटकर / ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 24 - दुपारची दीड पावणेदोनची वेळ... रंगभवनजवळील ईदगाह मैदानाजवळच्या रोडवरून अचानक वाळू वाहतुकीचा डंपर येतो अन् क्षणातच समोरच्या दुचाकीला उडवतो... जोरदार धडकेने चिमुकला थेट डंपरच्या पुढच्या चाकाखाली जाऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. या हृदयद्रावक घटनेने एकच हल्लकल्लोळ उडाला. चिमुकल्याची आई अन् मावशीही यात जखमी झाली. माहेरी दिवाळी सणासाठी आलेल्या नातवावर ओढावलेल्या अनपेक्षित धक्क्याने आजी पार्वतीबाईने एकच हंबरडा फोडला. ह्यराजा आता काय सांगू रे तुज्या बापालाह्ण या आक्रोशाने रुग्णालय परिसरही हळहळला.
नेहमीच रहदारीने गजबजलेल्या रंगभवन चौकातून सिव्हिल रोडकडे जाणाºया मार्गावर हा दुदैर्वी अपघात झाला. अपघातातील जखमी पूनम अनिल काटकर या आपल्या चिमुकल्या अपूर्वसोबत सोलापुरातील मोदीतल्या मुजाउद्दीन सोसायटीत दिवाळी सण साजरा करण्यासाठी आल्या होत्या. अपूर्वचे वडील अनिल सहदेव काटकर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभवडी (ता. कुडाळ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अपूर्वची आईही पेशाने शिक्षिका आहे. प्रा. अनिल काटकर यांनीच दोन दिवसांपूर्वी मायलेकरांना सोलापुरात आणून सोडले होते. महाविद्यालयाच्या कामानिमित्त ते नागपूरला गेले होते.
सोमवारी दुपारी पूनम काटकर अपूर्वला घेऊन बहीण पल्लवी दगडू गवळी हिच्यासमवेत एम. एच. १३ एपी ७२६६ या दुचाकीवरुन दिवाळीच्या खरेदीनिमित्ताने घरातून निघाल्या होत्या. रंगभवन चौकाला वळसा घेऊन सिव्हिल रोडकडे जात असतानाच काळ धावून आला आणि पाठीमागून आलेल्या डंपरने धडक दिली. छोटा अपूर्व रक्ताच्या थारोळ्यात सापडला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या फळ विक्रेत्यांनी प्रसंगावधानता राखत जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. अपूर्वची मात्र जागीच प्राणज्योत मालवली होती. रक्ताच्या थारोळ्यातील पूनम आणि तिची बहीण पल्लवीला सर्वांच्या मदतीने तातडीने हलवण्यात आले.
या घटनेने रंगभवन परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली. शासकीय रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. एव्हाना मोदी, नरसिंह नगर परिसरातील जखमींच्या नातलगांनी एकच गर्दी केली. अपूर्वची आजी पार्वतीबाई कोळी यांना नेमके काय झाले आहे याबद्दल काही कळत नव्हते. घाबरेल म्हणून कुणीच काही सांगायला तयार नव्हते. मुलगी पल्लवी आणि नातलगांकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होत्या. अपूर्वची मावशी पल्लवीच्या हुंदक्याने आजीचा बांध फुटला आणि तिच्या आक्रोशाला पारावार उरला नाही. दिवाळीसाठी चार दिवस आनंदात जावे म्हणून आलेल्या काटकर कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने सर्वांनाच ही गोष्ट चुटपूट लागून राहिल्याची भावना अपूर्वचे काका (मावशीचे पती) आनंद घोडके यांनी व्यक्त केली.
काटकर कुटुंबीयांची पार्श्वभूमी....
तुळजापुरातील वेताळनगरमध्ये राहणारे दगडू काटकर कुटुंबाचा लाँड्रीचा व्यवसाय. त्यांना तीन मुले आणि एक बहीण असा परिवार आहे. दोन मुलांचे शिवाजी चौकातून जाणाºया उतारावर दुकान आहे. अपूर्वचे वडील अनिल कोकणातील जांभवडी (जि. सिंधुदुर्ग) येथे कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. आई पूनमही शिक्षिका आहे. त्यांना सहा वर्षांचा अनंत आणि साडेतीन वर्षांचा अपूर्व ही दोन मुले आहेत. गुण्यागोविंदाने राहणाºया कुटुंबाची प्रापंचिक स्थिती बºयापैकी आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबीयांवर मानसिक आघात झाला आहे.
पित्याची ठरली अखेरची भेट...
दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि अपूर्वला आजोळी सोडून अनिल नागपूरला गेले होते. परत आल्यानंतर आपला लाडका आपल्याला भेटणार नाही याची पुसटशी शंकाही त्यांना आली नाही. पण काळापुढे कोणाचे चालते. दोन मुलांसमवेतच्या सुखी संसाराला दृष्ट लागली आणि अपूर्वची आणि त्याच्या वडिलांची अखेरची भेट ठरली. ही चुटपूट आयुष्यभर चटका लावणारी ठरली.
आठवड्यात चटका लावणा-या तीन घटना-
रस्ता अपघातात चटका लावून जाणाºया तीन घटना या आठवड्यात घडल्या. बुधवारी विव्हको प्रोसेसजवळ अमन सैफुद्दीन शेख या तंत्रनिकेतनच्या विद्याथ्यार्ला खासगी बसने ठोकरल्याने त्याचा मृत्यू होण्याची ताजी घटना असतानाच रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तुळजापूर रोडवरील पसारे वस्ती येथे दुचाकीवर निघालेल्या प्रतीक व्यंकटेश सपार या तरुणाला टँकर उडवले आणि त्याला प्राण गमवावा लागला. अ?ॅनिमेशन आर्टिस्ट पदवी मिळवलेला या तरुणावर काळाने झडप घातली. या घटनेनंतर आज पुन्हा चिमुरड्या अपूर्वला आपला जीव गमवावा लागला. तिन्ही घटना रस्ते अपघातात घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून जड वाहतुकीला परवानगी देऊ नये अशी मागणी होत आहे. याकडे पोलीस, आरटीओ, जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी घटनास्थळावर अनेकांनी केली.