चिमुकल्यांचा राजस्थानमध्ये सौदा

By admin | Published: November 3, 2016 01:46 AM2016-11-03T01:46:14+5:302016-11-03T01:46:14+5:30

मुंबईसारख्या शहरातून नोकरीचे अमिष दाखवून तरुणींची राजस्थान, गुजरातच्या खेडेगावांमध्ये विक्री होत असल्याची प्रकरणे सुरु आहेत

Chimukkalea deal in Rajasthan | चिमुकल्यांचा राजस्थानमध्ये सौदा

चिमुकल्यांचा राजस्थानमध्ये सौदा

Next


मुंबई : मुंबईसारख्या शहरातून नोकरीचे अमिष दाखवून तरुणींची राजस्थान, गुजरातच्या खेडेगावांमध्ये विक्री होत असल्याची प्रकरणे सुरु आहेत. अशात मुंबईतून चोरी केलेल्या मुलींनाही अशा खेडेगावात लग्नासाठी विकले जात असल्याची खळबळजनक माहिती मुलुंड पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांत मुंबईतून बेपत्ता झालेल्या सुमारे ८०० मुलींमागेही हे रॅकेट आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
मुळात राजस्थान, गुजरात भागात मुलींचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे येथील पुरुष देशाच्या कानाकोपऱ्यातून पळवून आणलेल्या मुली खरेदी करुन त्यांच्याशी विवाह करत असल्याचेही उघडकीस आले. यापूर्वी पायधुनी पोलिसांनी अशाप्रकारे नोकरीचे अमिष दाखवून मुंबईतील तरुणींना येथे लग्नासाठी विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यापाठोपाठ मुलुंड पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला लग्नासाठी उभे केले जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
लग्न तसेच देहविक्री अथवा बारमध्ये काम करण्यासाठी या मुलींचा वापर केला जात असल्याचे समजते. मुलुंडच्या अशोक नगर परिसरातून गायब झालेल्या चिमुरडीच्या अपहरणानंतर मुलुंड पोलीस या टोळीपर्यंत पोहचले. पोलिसांनी मुंबई ठाणे परिसरात राहणाऱ्या या सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिलीप मनीराम धुरीया (३३), तुफान बिहारीलाल निशाद (३३), मोहम्मद शहाजाद शाह (३३), संगीता महादेव लगाडे (५०), मंगल शंकर चंदनशिवे (२६), ममता दिपक राज (२१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या तिघीही बारमध्ये काम करतात.
मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ४ वर्षाची चिमुरडी गायब झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. या टोळीतील दिलीप याने मुलीचे अपहरण करुन तिला मोहम्मदच्या स्वाधीन केले. त्यानंतर मोहम्मदने या मुलींना मुंब्रा येथे असलेल्या या तिघींकडे सोडले. त्यानंतर यामागे तिचा जवळचा नातेवाईक असलेला दिलीप असल्याचे समजताच त्याच्याही मुसक्या आवळल्या. या मुलीला राजस्थान येथे नेण्याच्या तयारीत असतानाच कल्याण येथून तिची सुटका केली. आणि आरोपींच्याही मुसक्या आवळल्या.
त्यांच्या चौकशीत या मुलीचा ५५ हजार रुपयांत सौदा झाल्याचे समजले. यातील १५ हजाररुपये हे दिलीप आणि तुफानला मिळणार होते. त्यानंतर राजस्थान येथील गावात या मुलीला लग्नासाठी विकले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या मुलींसारख्या मुंबईतून गेल्या दहा महिन्यात जवळपास ८०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. यापैकी गेल्या आठ महिन्यात ४९३ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. मात्र उर्वरीत चिमुरड्यांचा अद्याप ठावठिकाणा नाही. त्यामुळे या चिमुकल्यांच्या मागेही या राजस्थानी टोळीचे कनेक्शन आहे का? याचा शोध पोलीस घेत आहे.
मुलुंड पोलिसांचे पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. या टोळीच्या चौकशीत राजस्थान कनेक्शनच्या म्होरक्याचा शोध पोलीस घेत आहे. (प्रतिनिधी)
>तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी
मुलुंड पोलीस उपायुक्त राजेश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस आयुक्त अनिल वलझाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव कसार, रावसाहेब जाधव, लता सुतार, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पानसरे, महेंद्र पुरी, पोलीस उप निरीक्षक घाडगे, तपासे, निलवे, वाघमारे, बोरसे यांनी ही कारवाई केली आहे.
मुलांकडे लक्ष द्या..
अल्पवयीन मुलांच्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना चांगल्या वाईट स्पर्शाची जाणीव करून देणे. शिवाय ते कुठे जातात, कुणाशी बोलतात, याकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहेत.

Web Title: Chimukkalea deal in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.