चिमुरड्यांनी साकारला तोरणा किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 02:46 AM2016-11-02T02:46:31+5:302016-11-02T02:46:31+5:30
आधुनिक युगात किल्ला आणि त्यांच्या इतिहासाचा विसर पडत चालला आहे.
कर्जत : आधुनिक युगात किल्ला आणि त्यांच्या इतिहासाचा विसर पडत चालला आहे. परंतु कर्जत येथील पाटील आळी मित्र मंडळ गेली कित्येक वर्षे किल्ल्याचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा यासाठी किल्ल्याची प्रतिकृती साकारत आहे. या वर्षी मंडळाने तोरणा किल्ल्याची प्रतिकृती साकारली असून, मंडळाचे हे दहावे वर्ष आहे.
मंडळाचे चिमुरडे सदस्य जो किल्ला बनवायचा आहे त्या किल्ल्यावर दिवाळी अगोदर जातात. त्या किल्ल्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती घेऊन दिवाळीत किल्ल्याची प्रतिकृती बनवतात. या उपक्र मामुळे मुलांना आपला इतिहास समजण्याबरोबरच प्रत्यक्ष किल्ला पाहता येतो. या वर्षी मंडळाने तोरणा किल्ल्याला भेट देऊन त्याची प्रतिकृती साकारली. किल्ल्यावर कोकण दरवाजा, बिनी दरवाजा, कोठी दरवाजा, झुंजार माची, बुदला माची, पाण्याच्या टाक्या, दारूगोळा कोठार, मेगाई मंदिर, महादेव मंदिर आदी ठिकाणे दाखवली आहेत. मंडळाने याआधी रायगड, प्रतापगड, सिंहगड किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविल्या आहेत. मंडळाचे चिमुरडे सदस्य चिन्मय शर्मा, दिव्या शर्मा, अनुज गुप्ता, वेदिका गुप्ता, तनिष्का गुरव, ओंकार हजारे, प्रणव दळवी, आर्यन गुरव, नंदिनी गुरव, साहिल हजारे, श्रावणी हजारे यांनी तोरणा किल्ल्याची प्रतिकृती साकारला आहे. (वार्ताहर)
>फळे-भाज्यांपासून किल्ला
बिरवाडी : दिवाळीत बच्चे कंपनीकडून मातीचे किल्ले बनविण्यात येतात. यासाठी माती, दगड, विटा गोळा करण्यासाठी त्यांची सुटी लागल्यापासून लगबग सुरू असते. यंदा बिरवाडीतील प्राजक्ता गोखले महाविद्यालयीन तरुणीने फळे-भाज्यांपासून तयार केलेला किल्ला बनवला असून तो पाहण्यासाठी गर्दी होत आहे. किल्ला बनविण्यासाठी भोपळा, कलिंगड, अननस, बटाटे, कांदे, केळी, बीट आदींचा यांचा वापर केला आहे. सिंहासन, पायऱ्या, तटबंदी, प्रवेशद्वारांसाठीही फळांचा वापर करण्यात आला असून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, हा संदेश देण्यात आला आहे.