चीन, पाकच्या रेडिओंचे भारतावर आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:18 AM2019-04-11T06:18:19+5:302019-04-11T06:18:35+5:30
कर्मचाऱ्यांचे मत : प्रादेशिक केंद्रे बंद करण्याचा परिणाम
चंद्रकांत कित्तुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकार एका बाजूला दूरदर्शन आणि आकाशवाणीची प्रादेशिक सहक्षेपण केंद्रे बंद करीत आहे. याचवेळी चीन आणि पाकिस्तानमधील रेडिओ केंद्रे भारतातील अधिकाधिक भूभागावर कार्यक्रम प्रसारित करून त्यांचा अजेंडा पुढे रेटत आहेत. देशातील संस्कृती आणि नैतिक मूल्यांच्या दृष्टीने ते धोकादायक असल्याचे मत आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.
आकाशवाणी एमडब्ल्यू आणि एसडब्ल्यू या प्रक्षेपण केंद्रावरून आपले कार्यक्रम सहक्षेपित करते, तर दूरदर्शन प्रादेशिक केंद्रावरून आपले कार्यक्रम प्रसारित करते. विशेषत: युद्ध किंवा आणीबाणीच्या प्रसंगांत ही केंद्रे खूप मोलाची भूमिका बजावतात. असे असूनही, केंद्र सरकार मात्र या दोन्ही माध्यमांचे पंख छाटण्याचे काम करीत आहे. दूरदर्शनची सुमारे ६०० प्रादेशिक सहक्षेपण केंद्रे बंद करण्यात आली असून, आकाशवाणी केंद्रांवरही अशाच प्रकारचे गंडातर आले आहे. यामुळेच देशहितासाठी पंतप्रधान मोदी यांनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी असोसिएशन आॅफ आकाशवाणी आणि दूरदर्शन इंजिनिअरिंग एम्पालॉईज या संघटेनेने निवेदनाद्वारे केली आहे.
‘भारतासाठी ठरू शकते घातक’
चीनची ३२, तर पाकची १२ रेडिओ केंद्रे भारतात आहेत. दूरचित्रवाणीचे कार्यक्रम एखाद्या वेळेस रोखता येतात; पण रेडिओचे कार्यक्रम रोखता येत नाहीत. त्यामुळेच भारतासाठी हे घातक ठरू शकते, असेही या निवेदनात म्हटले आहे.