‘चिनी ड्रॅगन’चा कर्करुग्णांना दिलासा
By admin | Published: September 15, 2014 04:24 AM2014-09-15T04:24:32+5:302014-09-15T08:49:25+5:30
चीन सर्व क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. लहान मुलांच्या खेळण्यांपासून थेट इलेक्ट्रॉनिक गॅझेटपर्यंत सगळीकडे संचार करणारा ‘चिनी ड्रॅगन’ आता आरोग्य क्षेत्रालाही गवसणी घालण्याच्या प्रयत्नात
मुंबई : चीन सर्व क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. लहान मुलांच्या खेळण्यांपासून थेट इलेक्ट्रॉनिक गॅझेटपर्यंत सगळीकडे संचार करणारा ‘चिनी ड्रॅगन’ आता आरोग्य क्षेत्रालाही गवसणी घालण्याच्या प्रयत्नात आहे. भारतामध्ये कर्करोगावर जे उपचार केले जातात, ते रुग्णांसाठी अत्यंत क्लेषदायी ठरतात, मात्र चीनमध्ये आता त्रासविरहित आणि लवकर दिलासा देणारे नवीन तंत्रज्ञान वापरून कर्करोगावर उपचार केले जातात, त्यामुळे कर्करोगावरील उपचारांमध्ये चीनने आघाडी घेतली आहे.
भारतामध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी तीन पद्धतींचा वापर केला जातो. कर्करोग झाला असेल तर शस्त्रक्रिया करणे, केमो थेरपी आणि रेडिएशन हेच उपचार दिले जातात. केमोथेरपी आणि रेडिएशन घेत असताना, रुग्णांचे केस जाणे, उलट्या होणे, खाण्याची इच्छा न होणे, इतर अवयवांवरदेखील परिणाम होणे असे परिणाम दिसतात. मात्र चीनमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार केले जात आहेत. यामध्ये रुग्णांना त्रास होत नाही आणि हे उपचार कमी दिवसांत होतात. या उपचारांचे वैशिष्ट्य म्हणजे याचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होत नाही, फक्त कर्करोगाच्या ट्युमरवर होतो. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणूनदेखील त्याच्यावर उपचार केले जातात, असे चीनमधील ‘फूडा कर्करोग रुग्णालया’चे उपाध्यक्ष डॉ. ली. हैबो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रुग्णाला त्रास न होता उपचारासाठी ‘क्रायोसर्जिकल अॅब्लेशन’ (सीएसए), ‘फोटोडायनॅमिक थेरपी’ (पीडीटी), ‘सीड नाईफ थेरपी’, ‘कम्बाईन इम्युनोथेरपी फॉर कॅन्सर’ (सीआयसी) या चार उपचार पद्धती चीनमध्ये वापरण्यात येत आहेत. या पद्धतींना यूएस अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यांचा शोध अमेरिकेमध्ये लागला आहे. मात्र चीनमध्ये या पद्धती वापरून अनेक कर्करुग्णांचा आजार बरा केला जात आहे. भारतातूही गेल्या दोन वर्षांत ५० रुग्ण चीनमध्ये येऊन उपचार घेऊन गेले आहेत. जगभरातील रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येत असतात, असे डॉ. हैबो यांनी सांगितले. (प्रतिनिधी)