चिनी मालाच्या विक्रीत ६० टक्क्यांनी घसरण
By Admin | Published: November 2, 2016 02:12 AM2016-11-02T02:12:12+5:302016-11-02T02:12:12+5:30
उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने केलेले पाकिस्तानचे समर्थन चीनला चांगलेच भोवले आहे.
मुंबई : उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने केलेले पाकिस्तानचे समर्थन चीनला चांगलेच भोवले आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या सोशल मीडियावरील अभियानामुळे चिनी मालाची खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्क्यांनी घसरली आहे. या वेळी ग्राहकांबरोबरच व्यापाऱ्यांनी चिनी मालाकडे कानाडोळा केल्याने चिनी बाजारपेठा चांगल्याच गडगडल्या आहेत. शिवाय, या चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे ‘स्वदेशी’ची भावनाही वाढल्याचे दिसून येत आहे.
देशभरातील ग्राहकांनी चिनी बाजारातील वस्तूंऐवजी भारतीय माती, प्लास्टिक आणि कागदांपासून बनविलेल्या सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या. चिनी मालावरील बहिष्काराच्या अभियानामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जोडले गेल्याने व्यापाऱ्यांनी यंदा चिनी मालाच्या आयातीसाठी उत्साह दाखविला नाही. याउलट, व्यापाऱ्यांनी यंदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वदेशीचा नारा स्वीकारून दुकानांमध्ये ‘मेक इन इंडिया’चे बोर्ड्सही लावले होते.
देशातील २० शहरांमधील म्हणजेच दिल्ली, मुंबई, नागपूर, जयपूर, कानपूर, अहमदाबाद, भोपाळ हे चिनी मालाच्या विक्रीसाठी मुख्य केंद्रे मानली जातात. या शहरांतील व्यापारी संघटनांशी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स संघटनेने संवाद साधत केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
याविषयी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी सांगितले की, चिनी मालावरील बहिष्कार अभियान सोशल मीडियामुळे घराघरांत पोहोचले. यामुळे भारतीय कागद आणि मातीपासून बनविलेल्या सजावटीच्या वस्तू आणि भारतीय चॉकलेट्स, मिठाई, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि गॅझेट्सची खरेदी अधिकाधिक वाढली.
फटाक्यांच्या बाबतीतही ‘मेड इन चायना’पेक्षा तामिळनाडू येथील शिवकाशी शहरातील फटाक्यांना अधिक पसंती मिळाली आहे. तसेच, चिनी मालाला पर्याय म्हणून घरगुती वस्तू, व्यापारी पेठा आणि छोट्या उद्योजकांची अधिकाधिक निर्मिती व्हायला हवी, असे मत भरतिया यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)