‘त्या’ चीनी प्रवाशाचा ' कोरोना ' संदर्भातील अहवाल आला निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 04:56 PM2020-02-08T16:56:40+5:302020-02-08T17:24:51+5:30
राज्यासह पुणेकरांना सोडला सुटकेचा नि:श्वास
पुणे : कोरोना विषाणूने चीनमध्ये हाहाकार माजवलेला असतानाच दिल्लीहून पुण्याला येणारे विमानही शुक्रवारी (दि. ७ ) याच कारणामुळे हादरून गेले. निमित्त झाले ते विमानात उलटी झालेल्या प्रवाशाचे. पण, हा प्रवासी चीनी असल्यामुळे त्याच्या उलटीकडे ‘कोरोना’च्या संशयावरून पाहिले जात होते.त्यामुळेच विमान उतरल्यानंतर तातडीने उलटी करणाऱ्या चीनी प्रवाशाला तातडीने नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, आता त्या चीनी प्रवाशाचा ‘कोरोना ’संदर्भातील अहवाल हा निगेटिव्ह आला असल्याची माहिती वरिष्ठ वैद्यकीय आधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह संपूर्ण राज्यानेच सुटकेचा नि: श्वास सोडला आहे.
कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत पाचशेहून अधिक नागरिकांचा जीव घेतला आहे. चीनमधील वुहान प्रांतातून या विषाणूचा प्रसार झाला. भारतात हा विषाणू पसरू नये, यासाठी विमानतळावर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतून पुण्याला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका चिनी प्रवाशाला उलट्यांचा त्रास झाला. सकाळी सात वाजता पुण्यात येणारे विमान साडेसात वाजता पुण्यात पोहोचले. हे विमान पुन्हा लगेच दिल्लीकडे उड्डाण करणार होते; परंतु प्रवाशाने विमानातच उलटी केल्याने खबरदारी म्हणून जंतुनाशकाद्वारे विमानाची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे सकाळी पावणेआठच्या सुमारास दिल्लीकडे जाणारे हे विमान दुपारी २ वाजून २४ मिनिटांनी दिल्लीच्या दिशेने हवेत झेपावले. दरम्यान, चिनी प्रवाशाच्या अस्वस्थतेबाबात वैमानिकाने विमानतळ प्रशासनाला कळविले होते. त्यामुळे विमान पुण्यात उतरण्याआधीच डॉक्टरांची टीम लोहगाव विमानतळावर तैनात करण्यात आली होती. विमान उतरल्यानंतर त्या चीनी प्रवाशाला तात्काळ नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर, विमानातील इतर प्रवाशांना काही त्रास झाला नाही ना, याची खबरदारी घेण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.