तुर्कीवरून आलेली चिनी, वेल्वेट, कटवर्क जायनमाज ठरतेय आकर्षण
By appasaheb.patil | Published: May 20, 2019 03:50 PM2019-05-20T15:50:31+5:302019-05-20T15:53:47+5:30
रमजान ईद विशेष : धार्मिक पुस्तकांना मागणी वाढली, कुरआन शरीफ, पंचपारा, ३० पारे कुरआनला मागणी जास्त
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाला आहे़ या महिन्यात रोजा (उपवास) करण्याबरोबरच धर्मग्रंथांच्या वाचनाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते़ यावर्षी कुरआन शरीफ, पंचपारा कुरआन शरीफ, तीस पारे कुरआन शरीफ, पंचसुरा, जरुरियाते दिन, यासीन शरीफ, पारा सेट, अल्लाह की वजाह, मसनून दुआँए या धार्मिक पुस्तकांना मागणी अधिक प्रमाणात आहे़ याशिवाय तुर्कीवरून आलेली चिनी, वेल्वेट, कटवर्क जायनमाजही मुस्लीम बांधवांचे आकर्षण ठरत असल्याची माहिती विजापूर वेसमधील पुस्तक विक्रेते मुमताज हुसेन चौधरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
हिंदी, अरबी, इंग्रजी, मराठी कुरआन, कुरआनचे ३० पाºयाचे सेट, हदिस बुखारी शरीफ, तफसीर, तफसीर इब्ने कसीर आदींची विक्री या महिन्यात मोठ्या प्रमाणावर होते. कुरआनमधील ३० अध्याय यांचे स्वतंत्र पुस्तक उपलब्ध आहे. कुरआन शरीफची किंमत साधारण: २०० रुपयांपासून १३०० रुपयांपर्यंत तर पारा सेटची किंमत ५०० ते १७०० रुपयांपर्यंत आहे.
कुरआनचा विविध भाषांमधील अनुवादही लोक मोठ्या प्रमाणावर वाचतात. त्याशिवाय प्रार्थनेसंदर्भातील पुस्तकेही उपलब्ध आहेत. डीलक्स स्वरूपाचे कुरआनही बाजारात आले आहे. वाचताना कुरआन ठेवण्यासाठी रिहालही विक्रीस वापरले जाते.
६५ रुपये ते १२५ रुपयांपर्यंत याची किंमत आहे. हिंदी भाषेतील कुरआन ५५० रुपयांपर्यंत, अरबी भाषेतील कुरआन ५५० रुपयांपर्यंत तर इंग्रजी भाषेतील कुरआन ४०० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत.
महिला वर्गाकडून धार्मिक पुस्तकांना मागणी
- रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लीम बांधव धार्मिक कार्यक्रमात व्यस्त असतात. महिलाही दिवसभर रोजा (उपवास) करून घरात नमाज, कुरआन पठण करतात. त्यामुळे या महिन्यात कुरआनसहित अन्य धार्मिक पुस्तकांना मोठी मागणी असते. या महिन्यात रिकाम्या वेळेत अल्लाहचा जप व्हावा, यासाठी मुस्लीम बांधव खूप परिश्रम घेत असतात़ धार्मिक पुस्तके भेट देण्यासाठी मदरसा, मस्जिदमध्ये वाचण्यासाठीही नेली जातात. लग्नात आपल्या मुलीला कुरआन भेट देण्याचीही प्रथा आहे.
यंदा नमाज कशी पडावी, दुआँ कशी करावी यासह लहान-लहान पुस्तके रमजान महिन्यात विक्रीस आली आहेत़ याशिवाय काबा कुरआन पेटी हे सर्वांचे लक्ष वेधत आहे़ कुरआन आयतों से इलाज, मसनुन दुआँए, हिसनुल मुस्लीम, जरुरियाते दिन, बरकाते रमजान, दुआ की किताब या धार्मिक पुस्तक व ग्रंथांना चांगली मागणी आहे़ मागील वर्षीपेक्षा यंदा पुस्तक व धार्मिक ग्रंथ खरेदीला चांगला प्रतिसाद आहे़ रमजान महिन्याबरोबरच इतर काळातही मुस्लीम बांधव धार्मिक पुस्तके खरेदी करून वाचन करतात़
-जिशान इसुब शेख, धार्मिक पुस्तक विक्रेते, विजापूर वेस, सोलापूर
दहा ते पंधरा हजार धार्मिक ग्रंथ, पुस्तकांची होतेय विक्री
- रमजान महिन्यात दहा ते पंधरा हजारांहून अधिक धार्मिक ग्रंथांची विक्री होत असते़ शहरातील विविध ठिकाणी असे २० ते २५ धार्मिक ग्रंथ, पुस्तकांची दुकाने आहेत़ या महिन्यात सरासरी दहा ते पंधरा हजार धार्मिक ग्रंथ-पुस्तकांची विक्री होते. हे धार्मिक ग्रंथ विविध भाषेमध्ये प्रकाशित होत असल्याने सर्वधर्मीय बांधव विश्लेषणात्मक कुरआन घेऊन वाचतात, अशी माहिती समीउल्लाह शेख, महंमद इसुब शेख व जिशान शेख यांनी दिली.
रमजान महिन्यात धार्मिक ग्रंथांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते़ शिवाय लग्नात आपल्या मुलीला कुरआन भेट देण्याची परंपरा मुस्लीम समाजात आहे़ त्यामुळे लग्नसराई काळातही कुरआनची विक्री मोठ्या प्रमाणात होते़ रमजान महिना पवित्र मानला जातो. त्यामुळे या महिन्यात धार्मिक ग्रंथांचे वाचन सर्वच स्तरातील बांधव करतात़ यंदा कुरआनच्या किमती २०० रुपयांपासून ५५० रुपयांपर्यंत तर पारा पेटीच्या किंमत ३५० रुपयांपासून १२५० रुपयांपर्यंत आहेत़
- मुमताज हुसेन चौधरी,
धर्मग्रंथ विक्रेते, विजापूर वेस, सोलापूर