चिंतन उपाध्यायची जामिनावर सुटका नाही

By admin | Published: February 3, 2017 01:11 AM2017-02-03T01:11:00+5:302017-02-03T01:11:00+5:30

पत्नी व तिचा वकील, अशी दुहेरी हत्या करणाऱ्या चिंतन उपाध्यायविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत, असे निरीक्षण नोंदवत गुरुवारी उच्च न्यायालयाने

Chintan Upadhyay is not free on bail | चिंतन उपाध्यायची जामिनावर सुटका नाही

चिंतन उपाध्यायची जामिनावर सुटका नाही

Next

मुंबई : पत्नी व तिचा वकील, अशी दुहेरी हत्या करणाऱ्या चिंतन उपाध्यायविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत, असे निरीक्षण नोंदवत गुरुवारी उच्च न्यायालयाने चिंतन उपाध्यायची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.
‘चिंतनविरुद्ध तपास यंत्रणेकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. त्याने हेमाविषयी आकस बाळगला होता आणि त्याने तिला हटवण्याबाबत डायरीमध्ये नमूद केले आहे. घटस्फोट अर्ज प्रलंबित असताना व घटस्फोट झाल्यानंतरही चिंतन हेमाबरोबर फ्लॅटमध्ये राहिला नाही. मात्र तिची हत्या होण्याच्या काही दिवस आधी तो तिच्याबरोबर फ्लॅटमध्ये राहिला आणि घटनेनंतर निघून गेला,’ असे न्या. साधना जाधव यांनी म्हटले.
‘अर्जदाराची (चिंतन) वर्तणूक पाहून त्याला आता जामीन मंजूर करणे योग्य नाही, असे न्यायालयाला वाटते,’ असे न्या. जाधव यांनी म्हटले.
तसेच न्या. जाधव यांनी या हत्या प्रकरणातील फरारी आरोपी विद्याधर राजभर याला अटक करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले. ‘तुम्ही (पोलीस) लूक आऊट नोटीस का जारी करत नाही? तुम्हाला प्रत्येक गोष्ट का सांगावी लागते? प्रत्येक वेळी न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच तुम्ही कारवाई करणार का?’ असे न्यायालयाने संतप्त होत म्हटले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चिंतनने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. आपल्याला नाहक या केसमध्ये गोवण्यात आले आहे, असे चिंतनने जामीन अर्जात म्हटले आहे. चिंतनचे वकील राजा ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळले. ‘चिंतनने स्वत:हून घटस्फोटासाठी अर्ज केला. त्याला घटस्फोट मिळालाही. कुटुंब न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्याने हेमाला फ्लॅटचे १६ लाख रुपयेही तातडीने दिले. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हेमाला दरमहा ४० हजार रुपये पोटगी म्हणून देण्याचेही मान्य केले. त्यामुळे हेमाला मारण्यामागे वैवाहिक कलह हाच उद्देश असला पाहिजे, हा पोलिसांचा तर्क निरर्थक आहे. चिंतनने सर्व मान्य केले, त्यामुळे कलह होण्याचा प्रश्नच नाही. त्याशिवाय घटनेच्या काही दिवस आधी तो हेमाबरोबर राहिला. परंतु, ते दोघेही वेगवेगळ्या बेडरूममध्ये राहात होते. या दरम्यान त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले नाही,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. ठाकरे यांनी केला. अशा केसमध्ये आरोपीचा उद्देश पाहिला जाऊ शकत नाही, असे म्हणत न्या. जाधव यांनी चिंतनची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)

हरेश भंबानीच्या मुलीचा अर्ज
हेमा व तिचा वकील हरेश भंबानी यांची हत्या ११ डिसेंबर २०१५ रोजी करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे एका कार्डबॉक्समध्ये भरण्यात आले. हे बॉक्स कांदिवली येथे सापडले. पोलिसांना चिंतनचा संशय आल्याने त्याला अटक केली. त्याच्याबरोबर प्रदीप राजभर, आझाद राजभर आणि शिवकुमार राजभर यांनाही अटक करण्यात आली. चिंतनच्या जामिनाला विरोध करण्यासाठी भंबानीची मुलगी अनिता हिने उच्च न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला होता.

Web Title: Chintan Upadhyay is not free on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.