Chipi Airport: चिपी विमानतळाची निमंत्रण पत्रिका आली; उद्धव ठाकरे नंबर १, नारायण राणेंचे नाव कितवे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 07:42 PM2021-10-07T19:42:23+5:302021-10-07T19:44:26+5:30
chipi airport invitation card, Shiv sena vs Narayan Rane: नारायण राणे मंत्री नसताना त्यांना बोलविणार की नाही ते उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असून बोलविणार की नाही असा दोन्ही बाजुंनी वाद सुरु होता. यावर आज आयआरबीने पडदा टाकला आहे.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याची निमंत्रण पत्रिका (chipi airport invitation card) प्रसिद्ध झाली असून यामुळे आजवर शिवसेना (Shisena) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील क्षेयवाद संपण्याची चिन्हे आहेत. नारायण राणे मंत्री नसताना त्यांना बोलविणार की नाही ते उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असून बोलविणार की नाही असा दोन्ही बाजुंनी वाद सुरु होता. यावर आज आयआरबीने पडदा टाकला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर पहिले आहे. ठाकरेंच्या हस्तेच लोकार्पण केले जाणार आहे. तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदे हे या सोहळ्याचे अध्यक्ष असतील. तर केंद्रीय लघू, सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंह व राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आहे.
सिंधुदुर्गात जवळपास एक दशकापासून चिपी विमानतळाचे काम सुरु होते. नारायण राणे काँग्रेसमध्ये मंत्री असताना या विमानतळाचे काम सुरु करण्यात आले होते. भूमीपूजन झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात हे काम रेंगाळले होते. त्यानंतर शिवसेनेच्या काळात हे काम पूर्णत्वास गेले. यामुळे विमानतळाचा विकास कोणी केला यावरून नारायण राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये श्रेयवाद सुरु होता. नारायण राणेंना यायचे असेल तर ते दिल्लीत पहिल्या विमानात बसून येऊ शकतात, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लगावला होता. यानंतर उद्धव ठाकरेंना उद्घाटनाला बोलविणार की नाही यावरून देखील मध्यंतरी वाद रंगला होता. निमंत्रण पत्रिकेत कोणाचे नाव असणार आणि कोणाचे नसणार यावरून राणेपूत्र आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, खासदार राऊत यांच्यात जुंपली होती. आज अखेर चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याची पत्रिका जाहीर झाली आहे.
येत्या 9 ऑक्टोबरला दुपारी १ वाजता हा लोकार्पण सोहळा होणार असून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे गेल्या महिन्यातील वादंगानंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.