गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना
By admin | Published: August 4, 2016 04:33 AM2016-08-04T04:33:33+5:302016-08-04T04:33:33+5:30
राज्यातील माता-बालमृत्यू दर कमी करण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली
मुंबई : राज्यातील माता-बालमृत्यू दर कमी करण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येतील. त्याचबरोबर सध्या सरकारी सेवेतील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात येईल, असेही सावंत यांनी सांगितले.
राज्यातील आरोग्य सेवेबाबत नीलम गोऱ्हे, प्रवीण दरेकर, रवींद्र फाटक आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना
सावंत म्हणाले, सरकारी रुग्णालयांतील खाटा व उपचार घेणाऱ्यांची संख्या विचारात घेता आवश्यक तेवढे डॉक्टर उपलब्ध होत नाही. सरकारी, पालिका व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी ६,५९५ एमबीबीएस डॉक्टर बाहेर पडतात. १,१३९ पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागा उपलब्ध आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे सर्वच डॉक्टर सरकारी सेवेत येत नाहीत. दरवर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या व सरकारी रुग्णालयांत आवश्यक असलेली डॉक्टरांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने खासगी-सहकारी भागीदारी तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजीव गांधी जीवनदायी योजनेतील त्रुटी दूर करून राज्यात महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत विशेषत: वृद्धापकाळात व ५० वर्षांनंतर होणारे आजार तसेच डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू यासारख्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या धर्तीवर बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
>माता बालमृत्यू, अर्भकमृत्यूू रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गुजरातच्या धर्तीवर चिरंजीव योजना राज्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असून गरोदर मातेची प्रसूती होईपर्यंत काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी १०० प्रसूतींच्या मागे डॉक्टरांना चार लाख रुपये देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.