अखेर औरंगाबादला मिळाले पोलीस आयुक्त, चिरंजीव प्रसाद सांभाळणार धुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 03:51 PM2018-05-28T15:51:56+5:302018-05-28T15:59:52+5:30
नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबादचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
औरंगाबाद : नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबादचेपोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या शहराच्या पोलीस आयुक्तपदी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती झाली आहे. मागील आठवड्यापासूनच त्यांच्या नियुक्तीवर सोशल मीडियात चर्चा सुरू होती. आज त्यांना नियुक्ती पत्र मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे परिस्थिती काहीशी बिघडत चालली होती. 11 मे रोजी औरंगाबादेत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला तात्काळ पोलीस आयुक्त द्या, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. अखेर मुख्यमंत्री आज चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबाद पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
मनपा आयुक्त मिळाले, पोलीस आयुक्त कधी ?
कचऱ्याच्या प्रश्नांवरून मिटमिटा येथे मार्च महिन्यात झालेल्या दंगलीनंतर तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले होते. तेव्हापासून शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे काम पाहत आहेत. अत्यंत संवेदनशील औरंगाबाद शहरात जानेवारीपासून आतापर्यंत चार दंगली झाल्या. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यांवरील लुटमार, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांत वाढ झाली. ‘मनपा आयुक्त मिळाले, पोलीस आयुक्त कधी’? या मथळ्याखाली लोकमतने १८ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन शासनाने पोलीस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती केली.
औरंगाबादमध्ये कामाचा आहे अनुभव
प्रसाद हे १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी २००२ मध्ये काम केले, नंतर त्यांची बदली जालना पोलीस अधीक्षकपदी, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, केंद्रीय पोलीस दलातही त्यांनी विशेष कामगिरी केली. बिहार आणि छत्तीसगडमध्ये राबविण्यात आलेल्या अॅन्टी नक्षल आॅपरेशनचे ते प्रमुख होते. दोन वर्षांपासून ते नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी कार्यरत होते.