'नेटीझन्सकडून चित्रा वाघ ट्रोल, राष्ट्रवादीनंही वाजवला त्यांच्या 'तत्व'निष्ठेचा ढोल'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 11:21 AM2019-11-11T11:21:24+5:302019-11-11T11:24:40+5:30
राष्ट्रवादीच्या पूर्वाश्रमीच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांनीही भाजपाच्या विरोधी पक्षात
मुंबई - विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्यामुळे सत्तास्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. परंतु, हा पेच आता सुटताना दिसत आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपाचा विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय अभिमानास्पद असल्याचे म्हटले. त्यानंतर, राष्ट्रवादीकडून चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.
सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे....
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 10, 2019
अभिमानास्पद निर्णय !!! @Dev_Fadnavis@SMungantiwar@PrasadLadInd@bjp4mumbai@BJP4Indiahttps://t.co/HnKioiZz8x
राष्ट्रवादीच्या पूर्वाश्रमीच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांनीही भाजपाच्या विरोधी पक्षात बसण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चित्रा वाघ यांनी अभिमानास्पद निर्णय, सत्तेपेक्षा तत्व महत्त्वाचे, असे वाघ यांनी म्हटले आहे. 'ऐन निवडणुकीच्या काळात चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात मेगा भरती झाली होती. त्याच मेगाभरतीत चित्रा वाघ देखील होत्या. त्यावेळी वाघ यांच्याकडे राष्ट्रवादीमध्ये महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती.
युती करून लढलेल्या भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. मात्र, 50-50 च्या फॉर्म्युल्यावरून भाजपने भूमिका बदलल्यामुळे अखेर शिवसेनेने युतीसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिला. तर शिवसेना सोबत येणार नसल्यामुळे भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपच्या भूमिकेवर चित्रा वाघ म्हणाल्या की, भाजपने घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे. सत्तेपेक्षा तत्व महत्त्वाचे असंही वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांच्या या ट्विटला नेटीझन्सने चांगलंच ट्रोल केलंय. वाघ, यांच्या ट्विटवर उलट प्रतिक्रिया देताना, तुम्हाला तत्व आणि निष्ठा ही भाषा शोभत नसल्याचे म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही चित्रा वाघ यांना टोला लगावला. “ज्या पक्षाने मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा दिली, तो पक्ष सोडताना काहींना तत्व आठवली नाही, जी आता आठवायला लागली आहेत,” असा सवाल चाकणकर यांनी नाव न घेता वाघ यांना विचारला आहे.