स्वीकृत सदस्यांची निवड भाजपाने ढकलली पुढे
By admin | Published: April 5, 2017 12:40 AM2017-04-05T00:40:08+5:302017-04-05T00:40:08+5:30
भारतीय जनता पार्टीने महापालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड पुढे ढकलली आहे. २० एप्रिलला ही निवड होईल.
पुणे : पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ लागल्याने भारतीय जनता पार्टीने महापालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड पुढे ढकलली आहे. २० एप्रिलला ही निवड होईल. चुरस वाढल्यामुळे तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करायचे, की राजकीय सोय पाहायची याचाही निर्णय होत नसल्याने पक्षश्रेष्ठींचा सल्ला घेण्याचे ठरले असल्याचे समजते.
महापालिकेत भाजपाकडे ९८ सदस्यांचे बळ आहे. एकूण नगरसेवक संख्या १६२ आहे. ५ सदस्य स्वीकृत म्हणून निवडता येतात. १६२ भागीले ५ याप्रमाणे प्रत्येकी ३२ नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य याप्रमाणे ५ नगरसेवक निवडता येतील. भाजपाच्या वाट्याला ३ नगरसेवक येतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ व शिवसेना किंवा भाजपा यांची सदस्यसंख्या सारखी (प्रत्येकी १०) असल्यामुळे दोघांपैकी एका पक्षाला (याची निवड चिठ्ठी काढून केली जाणार आहे.) १ सदस्य याप्रमाणे ५ जागा आहेत.
या पदांवर डॉक्टर, वकील, प्राध्यापक, अभियंते अशा एखाद्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचीच निवड करावी, असा नियम सरकारने केला आहे. त्याचा दाखला देत काही स्वयंसेवी संस्था, संघटनांनी भाजपा तसेच अन्य राजकीय पक्षांवरही अशाच व्यक्तींचीच निवड करावी, असा आग्रह धरला आहे. तशी लेखी मागणीच त्यांनी या पक्षांच्या प्रमुखांकडे केली आहे. सदस्य संख्येमुळे सर्वाधिक स्वीकृत सदस्य मिळणाऱ्या भाजपावर त्याचाही दबाव आला आहे.
दरम्यान या पदासाठी भाजपाकडून प्रमोद कोंढरे, जगन्नाथ कुलकर्णी, उज्ज्वल केसकर, गोपाळ चिंतल, गणेश घोष तसेच पक्षसंघटनेत गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या अन्य काही निष्ठावान कार्यकर्त्यांची नावे घेतली जात आहेत. निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांचेही नाव आहे. मात्र काही जणांनी पराभूतांना संधी का द्यायची, असा सवाल करीत त्यांना विरोध केला असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला एकच जागा मिळणार असली तरी त्यासाठीही बरीच नावे आहेत. महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, निवडणुकीत पराभव झालेले माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांची नावे त्यात आघाडीवर आहे.
राष्ट्रवादीचा निर्णयही पक्षश्रेष्ठी स्तरावरच होण्याची शक्यता आहे. शिवसेना व काँग्रेस यांच्यापैकी एकालाच संधी मिळणार आहे. ती आपल्यालाच मिळावी, यासाठी काँग्रेसने एमआयएमच्या एकमेव नगरसेविकेबरोबर हातमिळवणी करीत संख्या वाढवून घेण्याचा प्रयत्न चालवला होता, मात्र त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे चिठ्ठीनेच हा निर्णय होईल.
(प्रतिनिधी)
>निवडीचे अधिकार पक्षश्रेष्ठींना
पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपाने असाच स्वीकृत सदस्यांची निवड पुढे ढकलून २० एप्रिल रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित करण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींनाच देण्यात येतील, असे दिसते आहे. स्थानिक स्तरावर नेत्यांनी आपापल्या समर्थकांची नावे पुढे केल्यामुळे वाद होऊ नयेत, यासाठी भाजपाकडून सावधगिरी बाळगली जात आहे. त्यातच स्वयंसेवी संस्थांनी सरकारने नियम केला, मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली, त्याप्रमाणेच निवड करावी असा दबाव टाकला आहे.