राज्यापुढे मध्यावधी निवडणुकीचा पर्याय
By admin | Published: January 28, 2017 11:52 PM2017-01-28T23:52:11+5:302017-01-28T23:52:11+5:30
शरद पवार : शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल
कोल्हापूर : भाजपा-शिवसेना युती तुटल्यामुळे राज्यापुढे मध्यावधी निवडणुकीचा पर्याय असू शकतो, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. युती तुटल्यामुळे शिवसेना आता सरकारमध्ये राहील, असे वाटत नाही आणि राहिलीच तर मात्र, सत्तेसाठी हा पक्ष काहीही करतो असा समज जाईल, असाही चिमटा पवार यांनी घेतला.
दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना युती तुटल्यानंतर राज्यातील सरकार अस्थिर आहे असे आपणास वाटते का, असे विचारल्यावर ते म्हणाले की, सरकार चालविण्याचा भाजपा नक्कीच प्रयत्न करील, पण आम्ही एकत्रित बसून चर्चा करून निर्णय घेऊ. शांतपणे पक्षाच्या शिस्तीत बसेल, अशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल. यासाठी समविचारी पक्षांशीही आम्ही चर्चा करू.
भाजपाला राष्ट्रवादी पाठिंबा देणार का, अशी विचारणा केल्यावर ते म्हणाले, आमचा भाजपाला कधीही पाठिंबा राहणार नाही. दोन वर्षांपूर्वी राज्यातील निवडणुका झाल्यानंतर युती होत नसेल, तर आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी ठेवली होती. प्रत्यक्षात पाठिंबा दिलेला नव्हता.
राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी, ही काही देशाची किंवा राज्याची निवडणूक नाही, त्यामुळे
स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पक्षाने दिले आहे. त्याचा पक्षाच्या धोरणांशी काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. (प्रतिनिधी)
निरुपम हा मूर्ख माणूस...भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याचे कॉँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर पवार उसळून म्हणाले, निरुपम हा मूर्ख माणूस आहे.
या माणसाचे राज्यासाठी योगदान काय आहे? त्यांनी मुंबईला आणि कोल्हापूरला काय दिले? त्यांचा राज्याच्या राजकारणाशी कसलाही संबंध नाही. पदावरून गेल्यावर यांना कोणी ओळखतही नाही.
राष्ट्रपतीपदाबाबत अपेक्षा गैर...
शरद पवार राष्ट्रपती होणार अशी चर्चा नेहमी सुरू असते. याबाबत छेडले असता, पवार यांनी चर्चेत तारतम्य बाळगण्याची आवश्यकता बोलून दाखविली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारा खासदार आहेत. पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे भलतीच अपेक्षा करणे अयोग्य आहे. आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. अशा प्रकारची अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.