स्मार्ट सिटीची निवड पारदर्शीपणेच
By admin | Published: December 12, 2015 02:38 AM2015-12-12T02:38:30+5:302015-12-12T02:38:30+5:30
स्मार्ट सिटी निवडीची संपूर्ण प्रक्रिया केंद्राचे निकष व मंत्रिमंडळाच्या पूर्वमान्यतेने पारदर्शीपणे करण्यात आली आहे. राज्य शासनाने पुणे-पिंपरी चिंचवड नागरी समूहाची शिफारस केंद्र सरकारला केली होती.
नागपूर : स्मार्ट सिटी निवडीची संपूर्ण प्रक्रिया केंद्राचे निकष व मंत्रिमंडळाच्या पूर्वमान्यतेने पारदर्शीपणे करण्यात आली आहे. राज्य शासनाने पुणे-पिंपरी चिंचवड नागरी समूहाची शिफारस केंद्र सरकारला केली होती. परंतु केंद्राने नागरी समूहाची निवड न करता फक्त पुणे शहराची निवड संभाव्य स्मार्ट शहरांच्या यादीत केली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराची निवड करण्याबाबत राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पुन्हा विनंती करण्यात आली आहे, असा खुलासा राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्मार्ट सिटीच्या निवडीवर आक्षेप घेतला. या नंतर नगर विकास विभागाने खुलासा जारी केला. यात विभागाने म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या निकषानुसार प्राप्त झालेले ६० पैकी गुण व राज्य शासनामार्फत निश्चित केलेले ४० गुण अशा एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक गुणांक प्राप्त केलेल्या राज्यातील १० शहरांची निवड राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीमार्फत करून या शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली. छाननी करूनच केंद्राने १० शहरांची संभाव्य स्मार्ट सिटी म्हणून निवड केली आहे, असेही नगर विकास विभागाने स्पष्ट केले आहे.