सेमीकंडक्टर फॅबसाठी नाशिकची निवड करा; सत्यजित तांबेंचे पीयूष गोयल यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:07 PM2021-09-29T18:07:24+5:302021-09-29T18:08:29+5:30

Satyajit Tambe : नाशिकमध्ये वाहन आणि संलग्न उद्योगाचे जाळे उत्तम असल्याचे आपण केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Choose Nashik for Semiconductor Fab; Letter from Satyajit Tambe to Piyush Goyal | सेमीकंडक्टर फॅबसाठी नाशिकची निवड करा; सत्यजित तांबेंचे पीयूष गोयल यांना पत्र

सेमीकंडक्टर फॅबसाठी नाशिकची निवड करा; सत्यजित तांबेंचे पीयूष गोयल यांना पत्र

Next

जगभरात मायक्रोचिपच्या तुटवड्यामुळे वाहन तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.  वाहन उत्पादकांना आपले उत्पादन कमी करावे लागले असून, कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे सेमीकंडक्टर फॅबचे प्लांट नाशिकमध्ये उभारणी करण्यात यावी, अशी मागणी  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचे अध्यक्ष  सत्यजित तांबे यांनी केंदीय वाणिज्य मंत्री  पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

याबाबत सत्यजित तांबे म्हणाले, 'सेमीकंडक्टर फॅबकरिता नाशिक हे सर्वोत्तम ठिकाण आहे. मुबलक पाणी, कुशल मनुष्यबळ याच सोबत मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद या औद्योगिक पट्ट्याला असलेल्या सुलभ असल्यामुळे नाशिक हे सुयोग्य ठिकाण ठरते. तसेच नाशिकमध्ये वाहन आणि संलग्न उद्योगाचे जाळे उत्तम असल्याचे आपण केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

नव्याने होत असलेला समृद्धी मार्ग, तसेच पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे या सगळ्या प्रकल्पांमुळे नाशिकचे या सेमीकंडक्टरच्या कारखान्यासाठी योग्य ठिकाण असल्याचे व त्या माध्यमातून नाशिक व उत्तर महाराष्ट्राला अपेक्षित रोजगार निर्मिती व प्रगती शक्य असल्याचेही सत्यजित तांबे यांनी सांगितले.

पत्राची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री भारती पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी डॉ. पी. अनबलगन यांनाही पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Choose Nashik for Semiconductor Fab; Letter from Satyajit Tambe to Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.