हुंडा मागणाऱ्या वराला मिळाला चोप
By admin | Published: April 20, 2016 12:32 AM2016-04-20T00:32:48+5:302016-04-20T00:32:48+5:30
देवाणघेवाणीबाबत ठरल्यानुसार विवाह सोहळ्यात काही वस्तू, रक्कम मिळाली नाही, म्हणून नवरदेवाच्या नातेवाइकांनी वधू पक्षाच्या नातेवाइकांबरोबर हुज्जत घातली
काळेवाडी : देवाणघेवाणीबाबत ठरल्यानुसार विवाह सोहळ्यात काही वस्तू, रक्कम मिळाली नाही, म्हणून नवरदेवाच्या नातेवाइकांनी वधू पक्षाच्या नातेवाइकांबरोबर हुज्जत घातली. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. केवळ वधू-वर पक्षाकडील मंडळींतच भांडण झाले नाही, तर हुंड्याच्या रकमेसाठी आग्रही राहिलेल्या वराला वधूने चोप दिला. काळेवाडीतील मंगल कार्यालयात घडलेल्या या हाणामारीच्या घटनेची दखल पोलिसांनी घेतली. वधू-वर पक्षातील मंडळींना थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. योग्य ती समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले. त्यांच्यात समझोता होऊन अखेर सायंकाळी विवाह सोहळा पार पडला.
मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. नवरी मुलगी पुण्यातील, तर नवरदेव बाहेरगावचा. वाजतगाजत वधू आणि वर पक्षाकडील मंडळी मंगल कार्यालयात दाखल झाली. बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाच्या नातेवाइकांनी वधू पक्षाकडे हुंड्याच्या रकमेची मागणी केली. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने वर पक्षाकडील मंडळी संतापली. त्यांच्यातील वादाला तोंड फुटले.
वधू आणि वर पक्षाकडील मंडळी एकमेकांवर धावून गेली. सनई,चौघड्याचे सूर कानी पडण्याऐवजी धक्काबुक्की, हमरातुमरी, शिवीगाळ असे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणात मंगल कार्यालयातील वातावरण बदलून गेले. (वार्ताहर)
> पोलिसांकडून समझोता
कोणी तरी याबाबत पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वधू आणि वर पक्षाकडील प्रमुख नातेवाईक आणि भांडणात सहभागी असलेल्यांना पोलीस ठाण्यात नेले. नटूनथटून आलेल्या वऱ्हाडी मंडळीला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. मंगल कार्यालयातून त्यांची वरात पोलीस ठाण्यात गेली. त्यामुळे त्या सर्वांची तारांबळ उडाली.ऐन विवाह सोहळ्यात हुंडा मागणे किती महागात पडू शकते, याची जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी नमते घेतले.