चोरमंडळाचा उल्लेख फुटीर गटापुरता - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:22 AM2023-03-21T06:22:35+5:302023-03-21T06:22:42+5:30
Sanjay Raut : राऊत म्हणाले, ज्यांनी माझ्याबाबत तक्रार केली ते तक्रारदारच हक्कभंग समितीत नियुक्त केले आहेत. तक्रारदारालाच न्यायप्रक्रियेत सहभागी करून घेणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे, असे माझे तसेच तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबई : विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल असे कोणतेच विधान मी केले नाही. ‘आम्हाला सर्व पदे माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. त्यांनी शिवसेना निर्माण केली. त्यामुळे सध्याचे डुप्लिकेट शिवसेनेचे मंडळ हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे,’ असे माझे विधान कोल्हापुरातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले आहे. म्हणजेच मी विधान मंडळास चोरमंडळ म्हटले नसून एका फुटीर गटापुरताच उल्लेख आहे, असे स्पष्टीकरण करणारे उत्तर विधिमंडळाकडून पाठविण्यात आलेल्या नोटिशीला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
राऊत म्हणाले, ज्यांनी माझ्याबाबत तक्रार केली ते तक्रारदारच हक्कभंग समितीत नियुक्त केले आहेत. तक्रारदारालाच न्यायप्रक्रियेत सहभागी करून घेणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे, असे माझे तसेच तज्ज्ञांचे मत आहे. हक्कभंग कारवाईबाबत गठित केलेली समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते. पण या समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांनाच जाणीवपूर्वक स्थान दिल्याचे दिसते. हे संसदीय लोकशाही परंपरेस धरून नाही. माझे विधान नेमके काय होते ते पाहा.
मी विधान मंडळास चोरमंडळ म्हटले नसून एका फुटीर गटापुरताच तो उल्लेख आहे. या चोरमंडळातील सदस्यांवर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. यापैकीच काहीजण हक्कभंग समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर हक्कभंग समिती उद्या घटनाबाह्य ठरू शकते. विधिमंडळाचे हसे होऊ नये, म्हणूनच मी हे परखड सत्य मांडले, असे संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.