रजेनंतरची ‘चोरवाट’ होणार बंद!
By admin | Published: April 9, 2016 03:52 AM2016-04-09T03:52:04+5:302016-04-09T03:52:04+5:30
दीर्घ कारणामुळे रुग्णनिवेदन (सिक) रजा किंवा गैरहजेरीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर न होता परस्पर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याशी संगनमत करुन सोयीनुसार कर्तव्यावर हजर
मुंबई : दीर्घ कारणामुळे रुग्णनिवेदन (सिक) रजा किंवा गैरहजेरीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर न होता परस्पर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याशी संगनमत करुन सोयीनुसार कर्तव्यावर हजर होण्याची मुंबई पोलीस दलातील अधिकारी/अंमलदाराची ‘चोरवाट’आता लवकरच पूर्णपणे बंद होणार आहे. त्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्यासाठी पहिल्यांदा संबंधित पोलीस उपायुक्तांसमोर आवश्यक कागदपत्रानिशी उपस्थित रहावे लागणार आहे. त्यांच्या संमतीनंतरच त्यांना कर्तव्यावर हजर होता येणार आहे.
खोटी कारणे दर्शवित सुट्टी उपभोगणाऱ्या पोलिसांना चाप बसवण्यासाठी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी त्याबाबत सूचना दिल्या आहेत. परिमंडळ-१ चे उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आपल्या कार्यश्रेत्रात त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.
पोलीस दलात प्रामाणिक अधिकारी, अंमलदाराबरोबरच काही कामचुकार व पदाचा गैरफायदा घेणारेही आहेत. या गैरकृत्यांचा तसेच दांडी मारण्याचा फटका कर्तव्यदक्ष पोलिसांना बसतो. कसलाही आजार नसताना केवळ ड्युटी, महत्त्वाचा बंदोबस्त चुकविण्यासाठी काही जण ‘सिक’ रिपोर्ट करतात, किंवा वरिष्ठांच्या परवानगीशिवाय गैरहजर रहातात. त्यानंतर स्वत:च्या सोयीनुसार पुन्हा कर्तव्यावर हजर होतात. त्यासाठी डॉक्टरांशी संगनमत करुन प्रमाणपत्र मिळवितात, वास्तविक त्यांना पहिल्यादा संबंधित परिमंडळ/ शाखेतील पोलीस उपायुक्तांच्या समोर हजर होवून त्यांच्याकडून परवानगी घ्यावयाची असते. मात्र त्यांच्याकडून खरडपट्टी होण्याच्या भीतीने पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी /ड्यूटी कारकून किंवा सहाय्यक आयुक्ताशी ‘अर्थ’पूर्ण चर्चा करुन हजर होतात. संबंधित पोलीस उपायुक्ताची बदली झाल्यानंतर किंवा दीर्घ रजा अथवा प्रशिक्षणासाठी रवाना झाल्यानंतर त्याच्याऐवजी आलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यांसमोर कागदपत्रे सादर करुन त्यांची मंजुरी घेतली जाते. नवीन उपायुक्ताला त्याच्या गैरहजरीमुळे इतर पोलिसांवर पडलेला ताण किंवा निर्माण झालेल्या अडचणीची कल्पना नसते, त्यामुळे ते त्यांची मागील काळातील रजा नियमित करुन देतात.
असे प्रकार सर्रास घडत असल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी त्याला पायबंद घालण्यासाठी रुग्णनिवेदन किंवा गैरहजेरीनंतर कर्तव्यावर येण्यासाठी आधी उपायुक्तांची परवानगी घेणे सक्तीचे केले आहे. त्यांच्याकडून योग्य ती मिमांंसा होणार असल्याने इतर गरजू अधिकारी/कर्मचाऱ्यांना सुट्टी व बंदोबस्तामध्ये सवलत मिळू शकणार आहे. परिमंडळ-१चे उपायुक्त डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी त्याबाबत हद्दीतील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)