‘तुरागोंदी’त अनागोंदी!
By admin | Published: May 2, 2015 12:56 AM2015-05-02T00:56:40+5:302015-05-02T00:56:40+5:30
तुरागोंदी लघुप्रकल्पाचे काम एप्रिल २०१४पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता पाटबंधारे प्रकल्प विभागातर्फे वर्तविण्यात आली होती. त्यासंबंधीचे
नागपूर : तुरागोंदी लघुप्रकल्पाचे काम एप्रिल २०१४पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता पाटबंधारे प्रकल्प विभागातर्फे वर्तविण्यात आली होती. त्यासंबंधीचे प्रतिज्ञापत्रही २०१२मध्ये न्यायालयात सादर केले होते. परंतु या प्रकल्पाचे काम अजूनही प्राथमिक स्तरावर असून, केवळ ३० टक्के काम पूर्ण झाल्याची वस्तुस्थिती विदर्भ सिंचन शोधयात्रेदरम्यान दिसून आली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने एक प्रकारे न्यायालयाची धूळफेक केल्याचे चित्र आहे.
जनमंच, लोकनायक बापुजी अणे स्मारक समिती आणि वेद (विदर्भ इकोनॉमिकल डेव्हलपमेंट कौन्सिल) या संघटनेतर्फे विदर्भातील सिंचन प्रकल्पासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेदरम्यान राज्य शासनाने विदर्भ सिंचन मंडळांतर्गत असलेल्या प्रकल्पांची माहिती २० डिसेंबर २०१२ रोजी एका प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली होती. प्रतिज्ञापत्रात देण्यात आलेली माहिती खरी आहे का? की वस्तुस्थिती वेगळीच आहे. हे जाणून घेण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने विदर्भ सिंचन शोधयात्रा काढण्यात आली आहे. या शोधयात्रेची सुरुवात गुरुवारी हिंगणा तालुक्यातील तुरागोंदी या लघुप्रकल्पापासून करण्यात आली. (प्रतिनिधी)