दहावीनंतरच्या प्रवेशांसाठी चुरस रंगणार; निकषांबाबत उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 05:19 AM2021-04-24T05:19:52+5:302021-04-24T05:20:34+5:30
पालक, विद्यार्थ्यांसह प्रवेश प्राधिकरणांची लागणार कसोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्याने यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या साहाय्याने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे अकरावीसह डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची गुणवत्तेची कसोटी कशी लावली जाणार, प्रवेशाच्या स्पर्धेसाठी काय निकष असणार, तसेच प्रवेशाच्या निकषांतही यंदा बदल केले जाणार का, याबद्दल विद्यार्थी पालकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
दहावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी ही चुरस कमी करण्यासह विद्यार्थ्यांचे योग्य आणि अचूक मूल्यांकन व्हावे, तसेच प्रवेशाचे निकष ठरविताना सरकारने पुढील शैक्षणिक वर्षांचा आणि प्रवेशाच्या जागा वाढविण्याचा विचार करावा, अशी मागणी होत
आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल लावला जाणार आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पाहून पुढील प्रवेशाची दिशा ठरवावी लागणार आहे.
पुढील शिक्षणाबाबत कृती आराखडा हवा
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे राज्याच्या शैक्षणिक इतिहासात सर्वात कमकुवत ठरले आहे; पण आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना कसे उत्तम शिक्षण देता येईल, त्यासाठी आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण कसे द्यावे, मागे राहिलेला अभ्यासक्रम भरून कसा काढायचा, याबाबत विचार विनियम व कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे.’’
- प्रा. मुकुंद आंधळकर, समन्वयक, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ