चुरशीने शंभर टक्के मतदान
By Admin | Published: December 28, 2015 01:18 AM2015-12-28T01:18:04+5:302015-12-28T01:18:26+5:30
कोल्हापूर विधान परिषद : सतेज पाटील यांच्या विजयाची हवा; मात्र महादेवराव महाडिक यांचाही दावा; बुधवारी फैसला
कोल्हापूर : साऱ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेसाठी रविवारी जिल्ह्यातील बारा केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले. एकूण ३८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील व भाजपपुरस्कृत अपक्ष उमेदवार महादेवराव महाडिक यांच्यात ही लढत झाली. मतदानाचा कल पाहता, सतेज पाटील यांच्या विजयाची हवा तयार झाली आहे. मात्र, महाडिक यांनीही आपलाच विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात निकाल काय होणार हे बुधवारी (दि. ३०) मतमोजणीनंतर कळणार आहे.
या निवडणुकीत सतेज पाटील यांनी आपल्याला २५२ मते पडतील, असा दावा केला आहे; कारण तेवढे मतदार त्यांनी सहलीवर नेले होते. त्यांतील जास्तीत जास्त वीस मतांबद्दल त्यांनाही साशंकता आहे. आमदार महाडिक यांनी आम्ही १६२ मतदार आणल्याचे मतदान केंद्राबाहेर पत्रकारांना सांगितले; परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे एवढे सदस्य नव्हते. मला फक्त तीस मतांची गरज असून, ती कशी मिळतील ते बुधवारीच दिसेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सतेज यांना २२० ते २३०,
तर महाडिक यांना १६० ते १७० मते मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे सतेज यांचा सुमारे ५० ते ६० मतांनी विजय होईल, असा अंदाज मतदानानंतर जाणकारांतून व्यक्त झाला. सतेज पाटील हे ८० मतांनी विजयी होतील, असे गणित प्रा. जयंत पाटील यांनी मांडले आहे. उघडपणे एका उमेदवारास पाठिंबा व प्रत्यक्षात मतदान दुसऱ्यालाच, असेही काही पक्षांकडून झाले आहे.
हातकणंगले केंद्राबाहेर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला. हा अपवाद वगळता मतदान अत्यंत शांततेत झाले. कोल्हापुरात उद्योग भवन इमारतीतील केंद्रावर सर्व ९३ मतदारांनी मतदान केले. महाडिक गटाच्या ३७ मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदान केले. दुपारी दीड वाजता सतेज पाटील गटाच्या ५६ मतदारांनी भगवे लहरी फेटे बांधून येऊन शक्तिप्रदर्शन करीत मतदान केले.
या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य शक्ती पक्षाची आघाडी होती. त्यामुळे सतेज पाटील यांच्यासाठी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार विनय कोरे यांच्यासह माजी आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आदींनी जोरदार फिल्डिंग लावली होती. विरोधी महाडिक यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, स्वरूप महाडिक, आदींनी मोर्चेबांधणी केली. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काहींना फोन करून महाडिक यांना मतदान करण्याची गळ घातली होती. गेले पंधरा दिवस दोन्ही बाजूंचे बहुतांश मतदारांना सहलीवर पाठविण्यात आले होते. एकेका मतासाठी दहा-दहा लाख रुपयांचा दर निघाला होता. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी विजय खेचून आणण्यासाठी खोऱ्याने पैसा ओतला. मतदारांची सर्व पातळ्यांवर सरबराई करण्यात आली. त्यामुळे विजयाचा लंबक कुणाकडे झुकणार याबद्दल लोकांतही मोठी उत्सुकता राहिली. या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी (दि. ३०) येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणार आहे. दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता निवडणूक यंत्रणेने व्यक्त केली आहे.
कोल्हापूरच्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार यावरूनच मोठी रस्सीखेच झाली. या जागेवर महाडिक हे विद्यमान आमदार आहेत; परंतु महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपशी संधान बांधून काँग्रेसविरोधात ताराराणी आघाडी मैदानात उतरविली. त्याशिवाय त्यांचा मुलगा भाजपचा आमदार व सूनही भाजपचीच जिल्हा परिषदेची सदस्य आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी डावलून सतेज पाटील यांना संधी दिल्याने महाडिक यांनी बंडखोरी केली. त्यांनी १९९७ ला पहिली निवडणूकही अपक्ष म्हणूनच लढवून विजय मिळविला होता; त्यामुळे या वेळेलाही ते विजय खेचून आणणार का, ही लोकांत उत्सुकता राहिली; परंतु मतदानाचा कल पाहता, विजयाची माळ सतेज पाटील यांच्याच गळ्यात पडेल, असे चित्र दिसले.
एकूण मतदान३८२
पुरुष१९२
महिला१९०
झालेले मतदान ३८२
या निवडणुकीचा निकाल जाणून घेण्यासाठी बुधवारची वाट पाहण्याची गरज नाही. मतदारांची संख्या पाहूनच माझा विजय निश्चित झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य शक्ती या पक्षांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आम्ही चांगली लढत देऊ शकलो. - सतेज पाटील, काँग्रेसचे उमेदवार
तीस तारखेला गुलाल घेऊन मीच येणार आहे. मतदार कुणाबरोबर किती आले याचा हिशेब मतपेटीत चुकीचा ठरेल. कोल्हापूरचा मतदार सुज्ञ आहे. त्याला चांगल्या-वाईटाची पारख कळते; त्यामुळे माझ्या विजयात अडचण नाही.
- महादेवराव महाडिक, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार