अभिनय आणि दिग्दर्शनात चुरस
By admin | Published: March 28, 2016 02:10 AM2016-03-28T02:10:26+5:302016-03-28T02:10:26+5:30
अलीकडील काळात चांगले आणि आशयघन मराठी चित्रपट पाहायला मिळत आहेत. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराच्या नामांकनासाठी यंदा भाऊराव खऱ्हाडे, महेश मांजरेकर,
चला निवड करू या...
मुंबई : अलीकडील काळात चांगले आणि आशयघन मराठी चित्रपट पाहायला मिळत आहेत. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराच्या नामांकनासाठी यंदा भाऊराव खऱ्हाडे, महेश मांजरेकर, नाना पाटेकर, सुबोध भावे, स्वप्निल जोशी अशा ताकदीच्या दिग्दर्शक, अभिनेत्यांची निवड झाली आहे. ज्युरी आणि लोकमतच्या वाचकांनीच यातून एकाची निवड करायची आहे.
१) भाऊराव खऱ्हाडे, ख्वाडा चित्रपट दिग्दर्शक आणि हीरो, पुणे
आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जाताना अनेक उंबरठे झिजविले़. अखेर जमीन विकून त्यांनी चित्रपट बनविला़ तो राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या स्पर्धेत पोहोचला़ २०१४ या वर्षीचे राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाले आणि ‘ख्वाडा’ची चर्चा देशभर पसरली. ‘ख्वाडा’चा अर्थ अडथळा. अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आलेले दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या वाटचालीतही अनेक अडथळे येऊन सुद्धा त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चित्रपटाची दखल घेण्यास ज्युरींना देखील भाग पाडले. ‘ख्याडा’ची गोष्ट लिहिल्यानंतर ते तीन वर्षे निर्मात्यांकडे फिरले, पण सगळ्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखविला. तरीही हार न मानता त्यांनी स्वत:च चित्रपट करण्याचे ठरविले. नव्या कलाकारांना आपल्या चित्रपटात संधी दिली. चित्रपट पूर्ण करण्यासाठी भाऊसाहेबांना मित्रांनी, परिवाराने साथ दिली. आता त्यांचा ‘बबन’ही रूपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे.
२) महेश मांजेरकर, नटसम्राट दिग्दर्शक, मुंबई
अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे नाव! ‘आई’ चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनाचा श्रीगणेशा केला. कांटे, मुसाफिर अशा हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आणि ‘मातीच्या चुली’ चित्रपटाद्वारे निर्मितीमध्ये पदार्पण केले. ‘दे धक्का’चीही निर्मिती केली. मग त्यांनी दिग्दर्शनाकडे मोर्चा वळवला. ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘कोकणस्थ’, ‘काकस्पर्श’ हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले, पण अभिनयाकडे पाठ वळवली नाही. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका ठसक्यात रंगवली. ‘वास्तव’ चित्रपटाद्वारे आणि हिंदीत दबदबा निर्माण केला. ‘कुरुक्षेत्र’, २०१५ मध्ये ‘नटसम्राट’ या मराठीतील महत्त्वाकांक्षी चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनाचे त्यांचे नाणे खणखणीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.
३) नाना पाटेकर, अभियन, नटसम्राट
जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्समधून अॅप्लाइड आर्टचा अभ्यासक्रम पूर्ण केला, तेव्हा त्यालाही आपण पुढे काय करणार आहोत, हे माहीत नसावे. तो नाटकाकडे वळला आणि पॉप्युलर झाला. त्याचे पुरुष हे नाटक पाहणारे त्याचे फॅनच बनले. नेमबाजीमध्ये रस होता, म्हणून तो ती शिकला, त्यात प्रावीण्य मिळवले. मग शेतीही करू लागला. जंगलबुकमध्ये त्याने शेरखानसाठी आवाज दिला. प्रहार चित्रपट दिग्दर्शित केला. बॉलीवूडमध्ये अडकूनही त्याने मराठीकडे लक्ष केंद्रित केले. मिळणाऱ्या पैशातून जमेल तिथे आणि तितकी मदत तो करीत राहिला. अनेक संस्थांना देणग्या दिल्या. गाजावाजा न करता. आजही ‘नाम’ फाउंडेशनतर्फे तो मकरंद अनासपुरेसह दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदत करीत फिरतो आहे, पण त्याच्यातील अभिनेता जागाच आहे. गणपतराव बेलवरकरांची भूमिका त्याने नटसम्राट चित्रपटात साकारली आणि ती पाहून अनुपम खेरसारखा अभिनेताही त्याच्या पाया पडला. नानाची ही भूमिका खरोखरच एका नटसम्राटाची म्हणायला हवी.
४) सुबोध भावे, कट्यार..., दिग्दर्शक, मुंबई
मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील नव्या पिढीचा एक आश्वासक अभिनेता म्हणजे सुबोध भावे. पुण्यातील सिम्बॉयसिसमधून पदवी घेऊन आयटी कंपनीत नोकरी करीत असतानाच त्याला अभिनय क्षेत्रात मोठी संधी मिळाली. स्थळ : स्नेहमंदिर, मैतर, येळकोट, कळा या लागल्या जीवा, लेकुरे जाहली उदंड, आता दे टाळी आदी नाटकांतून सुबोधच्या भूमिका गाजल्या तसेच मायलेक, मनाचिये गुंती, कुलवधू, वादळवाट, अभिलाषा, नंदादीप, दामिनी, बंधन आदी मराठी टीव्ही मालिकांमधूनही त्याने अभिनय केला. झी मराठी वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या सध्याच्या मालिकेतही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली. लाडीगोडी, ती रात्र, हापूस, त्या रात्री पाऊस होता, आई शप्पथ, क्षण, सखी, कवडसे आदी चित्रपटांमधून त्याने अभिनयाची छाप पाडली. बालगंधर्व आणि लोकमान्य टिळक या त्याच्या भूमिका विशेष गाजल्या, तसेच ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाचे त्याने दिग्दर्शित केलेले सिनेरूपांतर आणि त्यातील त्याची भूमिकाही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. ‘रानभूल’ या चित्रपटासाठी २०११ साली त्याला सर्वोत्कृष्ट गायक आणि अभिनेता असे दोन झी गौरव पुरस्कार मिळाले होते, तसेच याच वर्षी बालगंधर्वमधील अभिनयासाठी त्याला मिफ्टा पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
५) स्वप्निल जोशी, अभिनेता, मुंबई-पुणे-मुंबई पार्ट २
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट हीरो अशी ओळख असलेला, ज्याच्या नावावर सिनेमाचा गल्ला हमखास जमतो, असे आघाडीचे नाव म्हणजे स्वप्निल जोशी. रामानंद सागर यांच्या उत्तर रामायण या मालिकेत लहानग्या कुशाची भूमिका साकारत स्वप्निलने वयाच्या नवव्या वर्षी चंदेरी दुनियेत प्रवेश केला. दोन वर्षांपूर्वीच आलेल्या त्याच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले, तसेच अभिनेत्री मुक्ता बर्वेबरोबरचे ‘मुंबई-पुणे-मुंबई’ चित्रपटाचे दोन्ही भाग मराठी प्रेक्षकांना विशेष भावले. फ्रेंड्स, तू हि रे , वेलकम जिंदगी, मितवा, इंडियन प्रेमाचा लफडा, प्यारवाली लव्हस्टोरी, मंगलाष्टक वन्स मोअर, गोविंदा, एकुलती एक, ४ इडियट्स, टार्गेट, चेकमेट, आम्ही सातपुते, मानिनी आदी मराठी चित्रपटांमध्ये स्वप्निलने भूमिका साकारल्या आहेत. तसेच धमाल एक तास टाइमपास, एका लग्नाची दुसरी गोष्ट, फू बाई फू (पंच), अर्धांगिनी, अधुरी एक कहाणी आदी मराठी मालिकांमध्येही स्वप्निलने त्याचा ठसा उमटवला आहे, तसेच गेट वेल सून या नाटकातही तो अभिनय करीत आहे.