‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार होतो ‘सीआयडी’चा तपास -- डॉ. दीपाली काळे,

By admin | Published: April 10, 2015 12:55 AM2015-04-10T00:55:50+5:302015-04-10T00:58:52+5:30

कोल्हापूर परिक्षेत्रातील स्थिती : ३३ पैकी १० गुन्ह्यांच्या तपासात यश

CID investigates 'action plan' - Dr Deepali Kale, | ‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार होतो ‘सीआयडी’चा तपास -- डॉ. दीपाली काळे,

‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार होतो ‘सीआयडी’चा तपास -- डॉ. दीपाली काळे,

Next

एकनाथ पाटील- कोल्हापूर
राजकीय पार्श्वभूमी असलेले खुनासारखे गंभीर गुन्हे आणि ५० लाखांपेक्षा जास्त फसवणुकीच्या गुन्ह्यांचा वरिष्ठ पातळीवरून आदेश प्राप्त होताच सर्वप्रथम गुन्ह्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करून राज्य गुन्हे अन्वेषण (सी.आय.डी.) विभागाकडून तपासाला सुरुवात केली जाते. कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये या विभागाकडे असे सुमारे ३३ गुन्हे असून, त्यांपैकी १० गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सी. आय.डी.)च्या कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. कार्यक्षेत्राचा पदभार पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे आहे. डॉ. काळे यांनी आठ महिन्यांत प्रलंबित ३३ गुन्ह्यांपैकी १० गुन्ह्यांचा तपास कुशलतेने केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यात गाजलेल्या वडगाव (ता. हातकणंगले) येथील जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार मृत्यूप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. संजीव पाटील, हवालदार बबन शिंदे, पोलीस नाईक धनाजी पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा (कलम ३०२) दाखल केला. याचा तपास सी. आय. डी.ने करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. पोलिसांच्या मारहाणीतच सनी पोवार याचा मृत्यू झाल्याचे सी. आय. डी.च्या तपासात निष्पन्न झाले. पाचगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून अशोक पाटील यांचा दि. १३ डिसेंबर २०१२ रोजी गोळ्या घालून खून केला होता. याप्रकरणी दिलीप जाधव ऊर्फ डीजे याच्यासह चौघांना अटक केली होती. याचा तपास सी. आय. डी.च्या पथकाने केला.


राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास अतिशय बारकाईने केला जातो. प्रत्येक तपासाच्या टप्प्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे परीक्षण असते. त्यांच्या मंजुरीनंतरच पुढील तपास केला जातो. गेल्या आठ महिन्यांत १० गंभीर गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.
                                                                                                  - डॉ. दीपाली काळे,  -पोलीस अधीक्षक (सी.आय.डी.)


तपासाचा अ‍ॅक्शन प्लॅन
एखादा राजकीय पार्श्वभूमी असलेला गुन्हा तसेच आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात असेल तर राज्य शासन, उच्च न्यायालय व पोलीस महासंचालक या तीन स्तरांवरून अशा गुन्ह्याचा तपास पुणे राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला जातो. तेथून तो तपास परिक्षेत्रातील विभागाकडे दिला जातो. या पथकातील पोलीस जनसमुदायात उघडपणे कधीच फिरत नाहीत. त्यामुळे लोक त्यांना सहजासहजी ओळखत नाहीत. त्यामुळे ते लोकांच्या कायम नजरेआड असतात. प्रत्येक गुन्ह्याचा अ‍ॅक्शन प्लॅन केला जातो. त्यानंतर बारकाईने तपास होतो. हाती मिळालेल्या माहितीची खात्री करून ती पुराव्यासह अप्पर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, आदींच्या समोर ठेवली जाते. त्याच्यावर अभ्यासपूर्ण चर्चा करून त्यांच्या मंजुरीनुसार पुढील तपास केला जातो.

Web Title: CID investigates 'action plan' - Dr Deepali Kale,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.