भूखंड घोटाळाप्रकरणी सिडकोच्या दोघांना अटक
By admin | Published: May 14, 2017 02:00 AM2017-05-14T02:00:59+5:302017-05-14T02:00:59+5:30
साडेबारा टक्केअंतर्गत वाटपासाठी राखीव असलेला भूखंड लाटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : साडेबारा टक्केअंतर्गत वाटपासाठी राखीव असलेला भूखंड लाटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये सिडकोच्या भूमापन विभागातील दोघा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांनी संबंधितांना बेकायदेशीररीत्या भूखंडाचे सीमांकन करून देऊन भूखंड हडपण्यास मदत केली होती.
ऐरोली, सेक्टर २० येथील भूखंड क्रमांक ५३/५ हा सिडकोने साडेबारा टक्के अंतर्गत वाटपासाठी आरक्षित ठेवला होता. मात्र, हा भूखंड कोणाला वितरीत झालेला नसतानाही त्यावर इमारत बांधून घरांची विक्री सुरू होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सिडकोच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कृष्णा डेव्हलपर्सचे बांधकाम व्यावसायिक राजू चौधरी व नमुर पटेल या दोघांना अटक केली होती; परंतु सिडकोचे भूखंड हडपणारे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता होती. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणासह अशा अनेक गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा कक्ष-दोनकडे सोपवला आहे. यानुसार उपआयुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजू सोनवणे यांचे पथक तपास करत होते. तपासांती सोनवणे यांच्या पथकाने सिडकोचे वितरीत न झालेले भूखंड हडपणारे रॅकेट उघड करून त्यांना मदत करणाऱ्या सिडकोच्या दोघा अधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांना अटक केली आहे. प्रभाकर आत्माराम म्हात्रे (५१), सुनील अनंत फडके (४०), लवेश रघुनाथ जाधव (३७), नझीर शेख व दत्तात्रेय मुकादम अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी शेख हा सिडकोच्या भूमापन विभागातील मुख्य भूमापक अधिकारी, तर मुकादम हा भूमापन सेवक आहे. त्यांनी प्रभाकर, सुनील व लवेश यांना ऐरोली सेक्टर २० येथील ५३/५ क्रमांकाचा भूखंड हडप करण्यास मदत केली होती. सदर भूखंड अद्याप कोणाला वितरीत झालेला नसल्याची माहिती शेख व मुकादम यांना होती. यानुसार त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बेकायदेशीररीत्या भूखंडाचे सीमांकन करून दिले होते. यानंतर प्रभाकर व त्याच्या साथीदारांनी भूखंड वितरीत झाल्याची बनावट कागदपत्रे तयार करून तो भूखंड कृष्णा डेव्हलपर्सला विकला होता. याच कागदपत्रांच्या आधारे कृष्णा डेव्हलपर्सचे राजू चौधरी व नमुर पटेल यांनी महापालिकेकडून बांधकामासाठी सीसी घेऊन इमारत उभारल्यानंतर ओसीही घेतली आहे. मात्र, भूखंडावर इमारत उभी राहिल्यानंतर जागे झालेल्या सिडको अधिकाऱ्यांनी संबंधितांविरोधात भूखंड लाटल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. हा गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग झाल्यानंतर सिडकोचे भूखंड हडपणारे हे रॅकेट उघड झाले आहे. यानुसार प्रभाकर म्हात्रे, सुनील फडके, लवेश जाधव, नझीर शेख व दत्तात्रेय मुकादम यांना अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांनी सांगितले.
>बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड हडपल्याचे उघड झाल्यानंतर त्या ठिकाणी उभारलेल्या इमारतीची पालिकेने सीसी व ओसी रद्द केली आहे. यामुळे तिथल्या रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या वेळी अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय असे गुन्हे करणे संबंधितांना शक्य नसल्याचा ठपका ठेवत सखोल चौकशीच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्यामार्फत सिडकोच्या सर्वच भूखंड घोटाळ्यांचा तपास सुरू आहे.