शतकी आयुष्याला गवसणी घालणारे सिनेमॅटोग्राफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 03:53 AM2017-12-10T03:53:41+5:302017-12-10T03:53:52+5:30
१९४२मध्ये कृष्णा घाणेकर यांनी ‘प्रभात फिल्म्स’मधून सिनेमॅटोग्राफर म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत कामाला सुरुवात केली. चित्रपती व्ही. शांताराम, फत्तेलाल, के. धयावार आदी ज्येष्ठ दिग्दर्शकांच्या सोबत त्यांनी काम केले आहे.
- राज चिंचणकर
कला, चित्रपट, नाटक ही क्षेत्रे गाजवणारी अनेक रत्ने गोव्याच्या भूमीत जन्माला आली आणि गोयंकरांनी त्यांच्या कलेची निष्ठेने जपणूक केली. कलेचा अखंड ध्यास घेतलेले प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कृष्णा घाणेकर हे त्यापैकीच एक ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व! या बुजुर्ग व्यक्तिमत्त्वाने २७ नोव्हेंबर रोजी वयाच्या १००व्या वर्षात पदार्पण केले आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास म्हणता येईल असे कृष्णा घाणेकर, हे वयाची नाबाद शंभरी गाठून सध्या मुंबईत समाधानाने जीवन व्यतित करीत आहेत.
तब्बल ७५ वर्षांपूर्वी, म्हणजे १९४२ मध्ये कृष्णा घाणेकर यांनी ‘प्रभात फिल्म्स’मधून सिनेमॅटोग्राफर म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या कार्याला प्रारंभ केला. ‘गळ्याची शपथ’, ‘देवयानी’, ‘भल्याची दुनिया’, ‘प्रपंच’ असे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीच्या प्रारंभी त्यांना करायला मिळाले. यातील ‘प्रपंच’ हा चित्रपट बराच गाजला. ग्रामीण भागाचे प्रतिबिंब असलेला आणि अभिनेत्री सुलोचना, सीमा यांच्यासह शाहीर अमरशेख यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाची कृष्णा घाणेकर यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी लक्षवेधी ठरली. या चित्रपटाने त्यांना राज्य पातळीवरील पुरस्कारही प्राप्त झाले. १९६२ मध्ये ‘प्रपंच’ हा चित्रपट भारतातर्फे ‘व्हेंकोवर’ चित्रपट महोत्सवासाठी पाठविण्यात आला होता.
कृष्णा घाणेकर यांनी केवळ मराठी चित्रपटांसाठी काम केले नाही; तर त्यांच्या सिनेमॅटोग्राफीचे प्रतिबिंब हिंदी चित्रपटसृष्टीतही पडले. ‘तारा’, ‘जालियनवाला बाग’, ‘देवयानी’ अशा अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. या सगळ्यावर कळस चढवला तो दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या गाजलेल्या चित्रपटांनी! ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘भूमिका’, ‘मंथन’, ‘मंडी’ हे चित्रपट रुपेरी पडद्यावर लोकप्रिय झाले आणि त्यांनी त्यांचा खास असा ठसा हिंदी चित्रपटसृष्टीत उमटविला. श्याम बेनेगल यांच्याशी त्यांचे उत्तम सूर जुळले. या सर्व चित्रपटांसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून कृष्णा घाणेकर यांनी बहुमोल कामगिरी बजावली आहे. ‘कलयुग’ या बंगाली चित्रपटासाठीही त्यांनी काम केले आहे.
दूरचित्रवाणीवर लोकप्रिय ठरलेल्या ‘भारत एक खोज’ या मालिकेचे ते तांत्रिक दिग्दर्शक होते. कृष्णा घाणेकर यांनी अनेक लघुपटांसाठीही काम केले आहे. ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड’, ‘हिमालयन तपस्वी’, ‘जळगाव - अ व्हिलेज इन महाराष्ट्र’ आदी लघुपटांचा यात समावेश असून, म्युनिकच्या डच कंडोर फिल्म्सतर्फे ‘जळगाव’वरील लघुपटासाठी त्यांना मानाचे सुवर्णपदक मिळाले आहे.
केवळ चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी करून कृष्णा घाणेकर थांबले नाहीत, तर १९६० मध्ये त्यांनी नवीन कंपनी स्थापन करून, या कंपनीद्वारे ५०० हून अधिक जाहिरातपटांची निर्मिती केली. या प्रवासात ज्येष्ठ निर्माते व दिग्दर्शक श्याम बेनेगल, तसेच गोविंद घाणेकर आदींची त्यांना साथ मिळाली. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन वेस्टर्न इंडिया सिनेमॅटोग्राफर्स असोसिएशन (डब्ल्यू.आय.सी.ए.) या संस्थेतर्फे देण्यात येणाºया ‘जीवनगौरव’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. इंडियन अॅकॅडमी आॅफ अॅडव्हर्टायझिंग फिल्म आर्ट (आय.ए.ए.एफ.ए.) या संस्थेचा ‘हॉल आॅफ फेम पायोनियर कॅमेरामन’ हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला. २००६ मध्ये ‘चित्रकर्मी’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. सिनेमॅटोग्राफी आणि जाहिरातपटांतील भरीव कामगिरीबद्दल २०११ मध्ये कृष्णा घाणेकर यांना दादासाहेब फाळके ट्रस्टतर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. दादासाहेब फाळके यांच्या १४२ व्या जन्मशताब्दी दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते त्यांना मुंबईत देण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीतील कृष्णा घाणेकर यांचे सिनेमॅटोग्राफी व जाहिरातपट या क्षेत्रातील योगदान न विसरता येण्याजोगे आहे.