‘काळू-बाळू’च्या तमाशात पैशाची सर्कस----लोकमत विशेष

By admin | Published: December 14, 2014 11:38 PM2014-12-14T23:38:13+5:302014-12-14T23:43:57+5:30

आर्थिक दुष्टचक्र : हंगाम सुरू होऊनही गावातच; कवलापूर ग्रामस्थांची लोकवर्गणीतून मदत

Circuit of money in the drama of 'Kallu-Balu' ---- Lokmat Special | ‘काळू-बाळू’च्या तमाशात पैशाची सर्कस----लोकमत विशेष

‘काळू-बाळू’च्या तमाशात पैशाची सर्कस----लोकमत विशेष

Next

सचिन लाड -- सांगली -एक तमाशा... उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारा... दिल्लीच्या तख्ताचीही वाहवा मिळविणारा... तब्बल ४० वर्षे या कलाप्रकारात हुकूमत गाजविणारा कवलापूर (ता. मिरज) येथील ‘काळू-बाळू’ तमाशा आता आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षीचा हंगाम सुरू करण्यासाठी पैसेच नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून ऐन हंगामात तमाशाचा हा फड कवलापूर मुक्कामीच आहे. गावाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणाऱ्या या तमाशाच्या मदतीसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून मदतीचा हातभार लावला आहे.
लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे व अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे या जोडीने तमाशातून साऱ्या महाराष्ट्राला खळखळून हसायला लावले. त्यांचे आजोबा सातू-हिरू यांनी तमाशाचा फड सुरू केला. त्यांची मुले शिवा- संभा यांनीही ही कला पुढे नेली. तमाशाची कला जोपासण्यासाठी ‘काळू-बाळू’च्या रूपाने चौथ्या पिढीने तमाशाचा फड गाजविला. ‘काळू-बाळू’ची पाचवी पिढीही यातच उतरली आहे. प्रकृतीअस्वास्थ्यामुळे २००२ मध्ये ‘काळू-बाळू’ जोडीने काम करणे बंद केले. यामुळे या दोघांच्या विनोदी भूमिका करण्याची जबाबदारी अनिल खाडे (काळूंचे पुत्र) पार पाडत आहेत. दोन वर्षाच्या अंतराने ‘काळू-बाळू’ची जोडी काळाच्या पडद्याआड गेली.
तब्बल ५५ वर्षे तमाशा हेच दैवत मानून सांगली जिल्हा आणि कवलापूरचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणारा त्यांचा तमाशा आर्थिक संकटात आहे. विजयादशमीला फड बाहेर पडतो. तेथून ते मे महिन्याअखेर संपूर्ण महाराष्ट्रभर सुमारे सव्वादोनशे प्रयोग केले जातात. तत्पूर्वी महिनाभर कलाकारांची जुळवाजुळव, त्यांचा पगार, वाहनांची दुरुस्ती, लाईट व्यवस्था याचे नियोजन करण्यासाठी किमान १५ लाख रुपये लागतात. ही रक्कम प्रत्येकवर्षी सांगोल्यातील एक सावकार चार टक्के व्याजाने द्यायचा. यावर्षी मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. एवढी रक्कम आणायची कोठून? असा प्रश्न पडला. पैशाची जमवाजमव करण्यासाठी गेले तीन महिने त्यांची पळापळ सुरू आहे. परंतु एवढी मोठी रक्कम जमलीच नाही. शेवटी कवलापूरचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदतीसाठी ग्रामस्थांना आवाहन केले. आतापर्यंत चार लाख वर्गणी जमा झाली असल्याचे अनिल खाडे यांनी सांगितले.

आज ‘श्रीगणेशा’!
विजयादशमीला बाहेर पडल्यानंतर ते डिसेंबरपर्यंत या फडाचा विदर्भ, मराठवाड्यात मुक्काम असतो. तीन महिने दररोज प्रयोग सुरु असतात. मात्र यंदा आर्थिक संकटामुळे ऐन हंगामात फड कवलापूर मुक्कामीच आहे. त्यामुळे त्यांना ५० लाखांचा फटका बसला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मदतीवर कलाकारांची जुळवाजुळव झाली आहे. उद्या (सोमवार) कवलापुरातच यल्लम्मादेवीच्या यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिराच्या पटांगणावर तिकीट विक्रीतून प्रयोग करून ‘श्रीगणेशा’ केला जाणार आहे. तसेच यात्रा कमिटी दहा हजार रुपये देणार आहे.


जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांकडे आर्थिक मदतीसाठी गेलो. पण कुणीच मदत केली नाही. शेवटी गावच मदतीसाठी धावले. सांगोल्याच्या सावकाराने फसविल्याने गेल्या ५५ वर्षात पहिल्यांदाच पैशासाठी दुसऱ्यांकडे हात पसरावे लागले आहेत.
- अनिल खाडे, अभिनेते, कवलापूर



‘जहरी प्याला’ पुन्हा रंगमंचावर
‘काळू-बाळू’ जोडीने पोलीस हवालदाराची भूमिका साकारलेले ‘जहरी प्याला’ हे वगनाट्य तुफान गाजले होते. या वगनाट्याची कॅसेटही निघाली होती. २००२ मध्ये ‘काळू-बाळू’ जोडीने काम करण्याचे बंद केल्यानंतर हे वगनाट्यही पडद्याआड गेले होते. मात्र आता पुन्हा ‘जहरी प्याला’ यावर्षी रंगमंचावर आणण्याची तयारी केली आहे. यामध्ये अनिल खाडे व फडातील नाशिकचे जुने कलाकार रामदास कदम हे दोघे पोलीस हवालदाराची भूमिका साकारत आहेत.


म्हणूनच कलाकार कौलारू घरात...
तमाशात सुरत्या, हलगी, ढोलकी, तुणतुणं, पेटीमास्तर, नर्तिका असे सत्तरहून अधिक कलाकार, वाहन चालक, क्लिनर, आचारी, व्यवस्थापक असा शंभरजणांचा लवाजमा आहे. लोखंडी स्टेज, तंबू, गेट, चार राहुट्या, जनरेटर, साऊंड सिस्टिम हे साहित्य व कलाकारांचा लवाजमा नेण्यासाठी चार ट्रक व एक जीप आहे. महाराष्ट्रभर फिरताना वाहनांचे डिझेल, फडातील शंभरजणांचे जेवण हा सर्व डोलारा सांभाळताना तोटाच सहन करावा लागत आहे. कलाकारांसह अन्य कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत. एक रुपया तिकीट असताना ११ हजार प्रेक्षक आल्यानंतर ११ हजाराचा गल्ला व्हायचा. आज साठ रुपये तिकीट आहे. पण दोन हजार प्रेक्षक येतील की नाही, याची खात्री नाही. केवळ कला जगविण्यासाठी त्यांची कसरत सुरु आहे. म्हणूनच आजही ‘काळू-बाळू’चे कवलापुरात शेतात कौलारू घर आहे.

Web Title: Circuit of money in the drama of 'Kallu-Balu' ---- Lokmat Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.