राज्यातील शहरांना काविळीचा धोका
By admin | Published: July 28, 2015 12:41 AM2015-07-28T00:41:06+5:302015-07-28T00:41:06+5:30
वेगाने वाढणारी लोकसंख्या, दाटिवाटीने राहणारे नागरिक, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव, सांडपाण्याची नसलेली चोख व्यवस्था आदींमुळे राज्याच्या शहरी भागांमध्ये
- राहुल कलाल, पुणे
वेगाने वाढणारी लोकसंख्या, दाटिवाटीने राहणारे नागरिक, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव, सांडपाण्याची नसलेली चोख व्यवस्था आदींमुळे राज्याच्या शहरी भागांमध्ये काविळच्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. गेल्या ४ वर्षात राज्यात आढळलेले कावीळचे रुग्ण प्रामुख्याने शहरी व त्याच्या आजूबाजच्या उपनगरांमध्ये दिसून आले आहेत.
गेल्या ४ वर्षांच्या आकडेवारीवरून शहरी भागांमध्ये त्यातही प्रामुख्याने शहराच्या आजूबाजूला वेगाने विकसित होणाऱ्या भागांमध्ये काविळीचा उद्रेक होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत राज्य आरोग्य विभागाचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात राज्यात काविळीचे उद्रेक हे प्रामुख्याने शहरी व त्याच्या आजूबाजूला वेगाने विकसित होणाऱ्या भागांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. इचलकरंजी, अहमदनगर, जळगाव आदी याची उदाहरणे आहेत. शहरी भागात दाटीवाटीने राहणारे लोक, वाढती लोकसंख्या त्यामुळे स्वच्छ पिण्याचे पाणी न मिळणे, सांडपाण्याची व्यवस्था नसणे, १९६०-७० या दशकांमध्ये टाकलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सांडपाण्याच्या पाईपलाईन न बदलणे आदींमुळे दूषित पाणी नागरिक पितात. त्यातून काविळीची लागण होत असल्याचे दिसून आले आहे.
हिपॅटायटिस अर्थात काविळ या आजाराचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी ‘हिपॅटायटिस ए’ आणि ‘हिपॅटायटिस ई’ हे दोन प्रमुख प्रकार दूषित पाणी, दूषित अन्नाच्या सेवनामुळे होतात. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून काही भागांमध्ये काविळीचा उद्रेक होतो. यामध्ये प्रामुख्याने शहरी भाग त्यातही शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा आजूबाजूला उपनगराच्या रूपात पसरणाऱ्या भागात काविळीचा उद्रेक होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत राज्यात काविळीचे ९ उद्रेक झाले आहेत. यात २६६ जणांना काविळीची लागण झाली असून, २ जणांचा मृत्यू झाला आहे. यात यंदा जळगाव शहर व आजूबाजूच्या परिसरात काविळीचा उद्रेक झाला होता. त्यात तेथील दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याबरोबर यावर्षी सांगली, नागपूर, नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा या शहर व आजूबाजूंच्या परिसरामध्येही काविळीचे उद्रेक झाले आहेत. याअगोदर २०१४ मध्ये राज्यात काविळीचे १३ उद्रेक झाले आणि यात १ हजार ७७५ जणांना काविळीची लागण झाली होती. तीन जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षात अहमदनगर शहर व परिसरात काविळीचे भीषण उद्रेक पहायला मिळाले.
२०१३ मध्ये राज्यात काविळीची तीव्रता कमी झाल्याचे चित्र होते. राज्यात उद्रेक झाले तरी कमी रुग्णांना काविळीची लागण झाली होती. या वर्षात राज्यात काविळीचे १२ उद्रेक झाले. त्यात ३३३ जणांना काविळीची लागण झाली होती आणि ३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१२ हे वर्ष काविळीने हादरविले होते. यावर्षात इचलकरंजीमध्ये काविळीचा सर्वात मोठा उद्रेक झाला होता. या वर्षात काविळीची लागण झालेल्या तब्बल ६ हजार ३३७ रुग्णांपैकी ४२ जणांचा मृत्यू झाला. ३ हजार ५०० रूण एका इचलकरंजीमधून सापडले होते. यात ३२ जणांचा मृत्यू झाला होता.