नागरिकांना सारे फुकट हवे!
By admin | Published: June 16, 2017 01:55 AM2017-06-16T01:55:39+5:302017-06-16T01:55:39+5:30
शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, तर दुसरीकडे नागरिकांना रस्ते चांगले हवेत, पण टोल भरायचा नाही. आता नेचर पार्क उभारले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, तर दुसरीकडे नागरिकांना रस्ते चांगले हवेत, पण टोल भरायचा नाही. आता नेचर पार्क उभारले जाणार आहे. त्याची देखभाल-दुरुस्ती कोण करणार, असा प्रश्न आहे. नागरिकांना सगळेच फुकट हवे आहे. राजकीय लोकांनी त्यांना फुकट देण्याची सवय लावली आहे, अशी टीका राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.
भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांच्या मतदारसंघात नेचर पार्क उभारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन तावडे यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते.
नंतर प्रवेशसोहळ््यात बोलताना शिक्षणमंत्र्यांनी आपण विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही. तर माहिती देतो आणि आपल्या परीक्षा पद्धतीत, अभ्यासक्रमात पाठांतरावर भर दिला जातो, यावर बोट ठेवले. शिक्षकांच्या क्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरवेळी एका प्रश्नाचे एकच उत्तर असू शकत नाही. वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खाली असाच का गृहीत धरला जातो? एका विद्यार्थिनीने वधू हा शब्द लिहिल्यावर तिला गुण दिले गेले नाहीत, हे त्यांनी दाखवून दिले. वस्तुनिष्ठऐवजी वर्णनात्मक उत्तरेही यायला हवीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यासाठी ओपन बुक पॅटर्न राबवावा लागेल, असे त्यांनी सुचवले.
सीबीएसई आणि आयसीएसई पॅटर्नमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा असते. एसएससी बोर्डात मात्र अर्ध्या अभ्यासावर असते. यातून पुढे पाठ मागचे सपाट असा प्रकार होत असल्याची टीका त्यांनी केली.
रॅन्चो व्हा, चतुर नको!
नापासांना पुन्हा परीक्षेची संधी मिळाली. एक लाख विद्यार्थ्यानी पुन्हा परीक्षा दिली. त्यातील ६० हजार विद्यार्थी दुसऱ्या प्रयत्नात पास झाले. यातून मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन करीत असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. पुन्हा संधी देऊनही विद्यार्थी नापास झाल्यास त्याचे वन टू वन समुपदेशन करुन त्याच्या कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे पास झालेले नीट व जेईई परीक्षा देऊन करियर करतील. पण कौशल्य विकास आत्मसात करणारा रॅन्चो होईल. विद्यार्थ्यांनी रॅन्चो व्हावे. चतुर रामलिंगम होऊ नये, असे आवाहन तावडे यांनी केले.
विद्यार्थी पाच तास ताटकळले : पालिका शाळेतील विद्यार्थी सकाळी दहा वाजल्यापासून ताडवे यांची प्रतीक्षा करत होते. पण तेथे तावडे यांचे दुपारी तीन वाजता पोचल्याने पाच तास विद्यार्थी ताटकळले.
शाळांचे तत्काळ हस्तांतर : २७ गावांतील शाळा जिल्हा परिषदेकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे हस्तांतरीत न केल्याने तेथील विद्यार्थ्याना शालेय साहित्य पुरविण्यात अडचणी येतात, याकडे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी लक्ष वेधताच तावडे यांनी उद्याच्या उद्याच शाळा हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. मात्र त्यासाठी राज्य सरकार अनुदान देणार नाही, असे सांगून टाकले.