दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 01:29 AM2017-04-07T01:29:46+5:302017-04-07T01:29:46+5:30
पिंपरी-चिंचवड शहराला ज्या धरणातून पाणीपुरवठा होतो त्या धरणात पाण्याचा साठा काही प्रमाणात शिल्लक राहिला
रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहराला ज्या धरणातून पाणीपुरवठा होतो त्या धरणात पाण्याचा साठा काही प्रमाणात शिल्लक राहिला आहे़ त्या पाण्यात पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना गुजराण करावी लागणार असल्याने पालिका प्रशासन दिवसाआड पाणी सोडण्याचे धोरण ठरविणार आहे. त्यानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे़
मात्र, रहाटणी परिसरात मागील काही दिवसांपासून अघोषित पाणी कपात झाल्याचे दिसून येत आहे. जो पाणीपुरवठा होत आहे तोही दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकवेळा पालिकेच्या संबंधित विभागाशी तक्रार करूनही यात बदल होत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. रहाटणी परिसरातील दूषित पाणीपुरवठा थांबणार कधी, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
मागील काही दिवसांपासून रहाटणी परिसरात कमी दाबाने व रात्री उशिरापण दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना रात्र जागविण्याची वेळ येत आहे़ तर काहींना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. रहाटणी परिसरात दिवसातून एकदाच पाणीपुरवठा केला जातो़
मात्र, तोही मुबलक नसल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. जो पाणीपुरवठा होतो तोही दूषित व दुर्गंधीयुक्त होत असल्याने परिसरातील नागरिक पोटाच्या विकाराने हैराण झाले आहेत. काही नागरिकांना उलट्या, जुलाब, ताप, खोकला यासह अनेक आजाराने नागरिकांच्या रांगा रुग्णालयात आढळून येत आहेत.
रहाटणी, काळेवाडी परिसरात प्रामुख्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या परिसरात भाडेकरूंची संख्या लक्षणीय असल्याने अनेकांकडे पाणी साठविण्यासाठी म्हणावी तशी व्यवस्था नसल्याने अनेकांची पंचाईत होत आहे. राज्यातील व राज्याच्या बाहेरून अनेक कुटुंब शहरात कामाच्या निमित्ताने आले आहेत़ भाड्याने घर घेऊन वास्तव्य करीत आहेत. मात्र, अनेक कुटुंबाकडे पाणी साठविण्यासाठी कोणतीच साधने नसल्याने पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिक, महिला बिगारीकाम करतात तर काही महिला घर काम करतात़ यासाठी सर्वांनाच लवकर कामावर जावे लागते़ मात्र, सध्या पाण्यासाठी रात्र जागवावी लागत असल्याने काहीवेळा कामावर खाडे करून घरी थांबवावे लागत आहे.
नखातेवस्ती, रामनगर, शिवराजनगर, सिद्धार्थनगर, महात्मा फुले कॉलनी, सायली पार्क १, २ तसेच रहाटणी गावठाण या भागात कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठा सामना करावा लागत आहे. काही भागांत तर रात्री आठ, नऊनंतर उशिरा पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच काही भागांत तर रात्री साडेनऊ नंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना रात्र जागविण्याची वेळ येत आहे. पाण्यासाठीचा हा त्रास कधी संपेल असा, उद्विग्न सवाल रहाटणीकर करत आहेत.(वार्ताहर)
>विद्युतपंप बंद करण्याची मागणी
सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन विचार करीत आहे़ मात्र, रहाटणी परिसरात अघोषित कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली असल्याने, नागरिक हवालदिल झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांना कामावर दांडी मारून पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. अनेक नागरिक सध्या मोठ्या प्रमाणात पाणी घेण्यासाठी नळाला विद्युतपंप वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकाडे विद्युतपंप नाही त्यांना पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या घरातील विद्युतपंप जप्त करणे गरजेचे आहे़ जेणे करून सर्वांना समान पाणीपुरवठा होईल, आशी मागणी नागरिक करीत आहेत. एखाद्या वेळी पाणीपुरवठा काळात विद्युत पुरवठा खंडित झाला तर उच्च दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांच्या घरातील विद्युत मोटारी जप्त करणे काळाची गरज आहे. मात्र, पालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.