औरंगाबाद महापालिकेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांची ‘चिखलफेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 10:53 PM2017-07-24T22:53:12+5:302017-07-24T22:53:12+5:30
हर्सूल भागातील नागरिकांना सोमवारी सकाळी चिखलात पळताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा ज्येष्ठ, सर्वच चिखलाने
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.24 - हर्सूल भागातील नागरिकांना सोमवारी सकाळी चिखलात पळताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा ज्येष्ठ, सर्वच चिखलाने माखलेले. बघणा-यांना हे दृश्य मजेशीर वाटेल. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या चिखलाचे शिंतोडे अंगावर घेत चालणाºया नागरिकांच्या संतापाचा हा उद्रेक होता.
हर्सूलमध्ये बहुतांश भागांतील रस्त्यांची स्थिती न बघण्यासारखी आहे. येथील वॉर्ड क्र .२ मध्ये तर मागच्या चार वर्षांपासून रस्ताच बांधलेला नाही. रस्त्यावर काळीमाती जमा होऊन चिखल होतो. वेळोवेळी नगरसेवक आणि मनपाकडे तक्रार देऊनही पावले उचलली गेली नाही. अखेर वैतागून येथील नागरिकांनी झोपलेल्या मनपाला जागे करण्यासाठी सोमवारी (दि.२४) ‘मड रेसिंग’ ही अफलातून स्पर्धा आयोजित करून प्रतीकात्मक आंदोलन केले.
भगतसिंग गेट ते सारा रिद्धी सोसायटीदरम्यान आयोजित या स्पर्धेत परिसरातील नागरिक रस्त्यावर साचलेल्या चिखलातून धावले. ज्येष्ठ नागरिकांसाठी चिखलातून चालण्याची स्पर्धा होती. विजेत्यांना रोख बक्षिसे व पाठीचे व मानेचे बेल्ट वाटप करण्यात आले. ‘जागोजागी खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून गाडी चालविणे म्हणजे मोठी कसरत आहे. वाहन सोडा, पण या रस्त्यांवरून चालणेदेखील मुश्कील आहे. दररोज तीन-चार लोक गाडी घसरून पडतात. अशाच अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाच्या मणक्याला मार लागला असून, उपचार सुरू आहे. परिस्थिती एवढी गंभीर असूनही प्रशासनाने दखल घेतली नाही, असे शेखर काळे यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न पाहणा-या औरंगाबाद शहरातील नागरिकांवर खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ येते, यातच प्रशासनाची बेफिकीरी दिसून येते. बाळूसाहेब औताडे, वैजयंता मिसाळ, वंदना काळे, अश्विनी जंगले, राजेश धुरट, राजू तुपे, साई सुरे, वसंत गोसावी, अजय टाकळकर, जंगले साहेब, राहुल पाईकडे, सतीश इंगळे आदी नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला.
...नाही तर मुला-बाळांसह चिखलात बसू...
पुढील काही दिवसांत जर प्रशासनाने पावले उचलली नाही तर परिसरातील नागरिक आपल्या मुला-बाळांसह रस्त्यांवरील चिखलात बसून आंदोलन करतील, असा इशारा शेखर काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. ते म्हणाले, खेड्यातील पांदीप्रमाणे असलेल्या रस्त्यांमुळे शहरात राहतोय असे वाटतच नाही. शाळेच्या बसदेखील या भागात येत नाहीत. एवढेच नाही तर नातेवाईकदेखील ‘तुमच्याकडे खूप चिखल आहे’ असे सांगून घरी येण्याचे टाळतात. आता तरी महापालिके ला लाज वाटेल अशी अपेक्षा आहे.
नागरिकांना लवकरच रस्ता देणार
वॉर्डातील सिमेंट रस्त्यासाठी २० लाखांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तत्पूर्वी पुढील चार दिवसांमध्ये दोन लाख रुपये खर्च करून मुरुम व खडी टाकून नागरिकांना जाण्या-येण्या योग्य रस्ता करून देण्यात येईल.
- बन्सी जाधव, नगरसेवक, हर्सूल वॉर्ड क्र. २