पोलीस तपासाबाबत नागरिकांमध्ये साशंकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2016 01:22 AM2016-05-16T01:22:11+5:302016-05-16T01:22:11+5:30
बांधकामाच्या ठिकाणी खड्ड्यात पडून दोघा भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दहा ते बारा दिवस उलटूनही ठेकेदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही
भोसरी : बांधकामाच्या ठिकाणी खड्ड्यात पडून दोघा भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दहा ते बारा दिवस उलटूनही ठेकेदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ठेकेदार व तेथील सुपरवायझरचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलीस फौजदार नीलेश जगदाळे यांनी सांगितले. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अटकेसंदर्भात पोलिसांना
विचारले असता, पोलिसांनी कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी ठेकेदाराला अटक केली
नसल्याचे सांगितले होते. मात्र, आता ठेकेदार पसार असल्याचे सांगण्यात येत असल्याने पोलिसांच्या तपासावर साशंकता असल्याचे बोलले जात आहे.
मागील आठवड्यात भोसरीतील अयप्पा मंदिराजवळ इमारतीच्या बांधकामाच्या खड्ड्यात वैष्णवी किस्त्या राठोड (वय ५) आणि विराट किस्त्या राठोड (वय ३) या बहीण-भावांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी किस्त्या राठोडच्या फिर्यादीनुसार, इमारतीचे बांधकाम करणारा ठेकेदार हनुमंत राठोड व तेथील सुपरवायझर भोजू जाधव यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ठेकेदाराच्या अटकेसंदर्भात बांधकाम कंपनी व ठेकेदार यांच्यात झालेल्या बांधकामाच्या करारासंदर्भात कागदपत्रांची तपासणी सुरू असून, कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ठेकेदाराला अटक करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, रविवारी (दि. १५) पुन्हा तपासाधिकारी जगदाळे यांना ठेकेदाराच्या अटकेसंदर्भात विचारले असता, त्यांनी ठेकेदार फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे सांगितल्याने पोलिसांच्या तपासावर साशंकता असल्याचे दिसून येत आहे.
अशा प्रकारे विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित
होत आहेत. पोलीसच
ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत की काय, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. (वार्ताहर)