नागरिकांनी रोखल्या कचरा गाडया
By admin | Published: November 3, 2016 02:55 AM2016-11-03T02:55:09+5:302016-11-03T02:55:09+5:30
धूर व दुर्गधीमुळे शेजारच्या गावांमध्ये श्वसनाचे विकार उद्भवू लागल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज कचऱ्याच्या गाड्या रोखून धरल्या
पालघर : पालघर नगरपरिषदेच्या मोरेकुरंण येथील डम्पिंग ग्राउंड मधील कचरा पेटवला जात असल्याने निर्माण झालेला धूर व दुर्गधीमुळे शेजारच्या गावांमध्ये श्वसनाचे विकार उद्भवू लागल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज कचऱ्याच्या गाड्या रोखून धरल्या. त्यामुळे पालघर शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरु लागले आहे.
नगरपरिषदेने मोरेकुरंण येथील महसूल विभागाची सर्व्हे नंबर १३१ मधील सुमारे पाच हेक्टर जागा आठ वर्षा पूर्वी डम्पिंग ग्राउंड साठी मिळवली होती. येथे गांडूळखत प्रकल्प, व्हर्मी कंपोझिंग, बायोमिथेनेट प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात येईल असे ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला घेतांना नगरपरिषदेने लिहून दिले होते. मात्र नगरपरिषद प्रशासनाने आपला शब्द न पाळल्याने ग्रामपंचायतीने ६ डिसेंबर २०१३ रोजी नगरपरिषदेला पत्र लिहून आपण खतनिर्मिती प्रकल्प उभारीत नसल्यामुळे व कचरा पेटवला जात असल्याने निर्माण झालेल्या धुरामुळे परिसरातील मोरेकुरंन, विकासनगर, खारलपाडा इ. भागातील नागरिकांना श्वसनाचे विकार व दम्याचा त्रास होत आहे. तर डास, माशांमुळे अनेक आजारांना आमंत्रणही मिळत असल्याची तक्र ार केली होती. मात्र तरीही या समस्ये कडे पालघर नगरपरिषदेने डोळेझाक केल्यानंतर या सर्व समस्यांनी अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या मोरेकुरंण सरपंच कु. रा. वरठा व शिवसेना शाखाप्रमुख महेश संखे यांच्या सह नागरिकांनी मंगळवारी रात्रीपासून कचऱ्याच्या गाड्या रस्त्यावरच रोखून धरल्या.
पालघर नगरपरिषद हद्दी अंतर्गत शहरातील कचरा उचलण्याचा तीन वर्षा चा ठेका दिनेश बी संखे यांना १६ लाख ७६ हजार ७८ हजार रुपयात देण्यात आला आहे. या ठेक्या अंतर्गत ठेकेदाराने ओला, सुका कचरा वेगळा करणे, त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे इ. शर्ती, अटी घालून दिल्या होत्या. शहरातील कचरा, रासायनिक कंपन्यांमधील घन कचरा, औषध कंपन्यांतील टाकाऊ औषधांचा साठा इ. कचऱ्यासह मृत जनावरे, मलमूत्र इ. चे वर्गीकरण न करता ते डम्पिंग ग्राउंड वर टाकण्यात येते व ढिगाऱ्यांना आगी लावल्या जात आहेत. त्यामुळे त्या आगीतून निर्माण झालेला धूर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या शरीरात जात असल्याने या समस्येच्या सहनशीलतेचा अंत झाला काल भाऊबीज असूनही शेकडो महिलां, मुले, पुरुषांनी काल पासून कचऱ्याच्या गाड्या रोखून धरल्या. हा सर्व कचरा डम्पिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाली करून नागरिकांनी रस्ता बंद केला. त्यामुळे शहरात सकाळी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पसरलेले दिसून येत होते. (प्रतिनिधी)
>कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज
डम्पिंग ग्राउंडवर नागरिकांचा वाढता रोष आणि कचऱ्याचे ढीग पाहता नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, उपनगराध्यक्ष रईस खान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुर्गंधी आणि धुराचा होणारा त्रास ही गंभीर बाब असल्याचे मान्य करून सर्व जळणाऱ्या कचऱ्यावर पाणी फवारणी करणे, सर्व कचरा एकत्र करून त्यावर औषध फवारणी करणे, गावात औषध फवारणी करणे इ. गोष्टी तात्काळ करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
या डम्पिंग ग्राउंडवर खत निर्मिती प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने निरी या संस्थेच्या तज्ज्ञ मंडळींनी पाहणीचे काम सुरु केले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर तात्काळ या कामाला सुरु वात करण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्ष पिंपळे यांनी दिले.
नगरपरिषदे कडून योजना आखल्या जात असल्या तरी या तात्पुरत्या आहेत त्याने हा प्रश्न सुटणार नाही नागरिकांनी दिलेल्या मुदतीत हा प्रश्न सुटला नाही तर दररोज शहरातून निर्माण होणारा २५ ते ३० टन कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या समस्येला सामोरे जाण्याची आपत्ती प्रशासनावर ओढवू शकते.