'नागरिकांना ‘अच्छे दिन’ दिसलेच नाहीत, मोरारजी देसाई यांचा कित्ता गिरवणार नाही' - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:50 PM2022-08-30T12:50:27+5:302022-08-30T12:53:48+5:30
Sharad Pawar: केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’ची घोषणा केली होती. पण ‘अच्छे दिन’ देशातील नागरिकांना आजपर्यंत दिसले नाहीत. त्यानंतरच्या २०२२ ला ‘अच्छे दिन’चे विस्मरण होऊन सत्ताधाऱ्यांनी ‘न्यू इंडिया २०२२’ चे आश्वासन दिले.
ठाणे : केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’ची घोषणा केली होती. पण ‘अच्छे दिन’ देशातील नागरिकांना आजपर्यंत दिसले नाहीत. त्यानंतरच्या २०२२ ला ‘अच्छे दिन’चे विस्मरण होऊन सत्ताधाऱ्यांनी ‘न्यू इंडिया २०२२’ चे आश्वासन दिले. २०२४ च्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी ‘फाइव्ह ट्रिलीन इकॉनॉमी’च्या दिशेने वाटचाल करण्याचे आश्वासन दिले. पण जे सांगितले ते १०० टक्के केंद्र सरकार करू शकलेले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीसाठी पवार ठाण्यात आले होते. त्यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आपले नाव पुढे येण्याची शक्यता असल्याकडे पवार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘पंतप्रधानपदाची जबाबदार मी आता घेणार नाही. माझे वय आता ८२ वर्षे आहे. मोरारजी देसाई भाग्यवान होते. ते ८४ व्या वर्षी पंतप्रधान झाले.
‘त्यांना’ आधीच कळते
अनिल देशमुख, नवाब मलिक, खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवायांबाबत पवार यांनी नाराजी प्रकट केली.
राज्यात कधी कुणावर छापा पडणार, कोण कधी तुरुंगात जाणार हे माहीत असणारा एक वर्ग सत्ताधारी पक्षात निर्माण झाला आहे.
त्यांना हे अगोदरच कसे कळते, असा प्रतिसवाल पवार यांनी रोहित पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर केला.
अत्याचारींची सुटका चिंताजनक
गुजरातमधील बिल्कीस बानोवर बलात्कार करणाऱ्या आरोपींच्या मुक्ततेच्या निर्णयाबद्दल पवार म्हणाले की, खालच्या कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी होऊन या खटल्यातील आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती, पण पंतप्रधान मोदी ज्या राज्यातून येतात तेथील त्यांच्या विचाराच्या सरकारने सर्व आरोपींची सुटका केली.
एवढेच नाही तर त्यांचा सत्कार केला. लाल किल्ल्यावरील १५ ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधानांनी देशातील स्त्रियांच्या सन्मानाची भाषा केली आणि त्यांच्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी लाजिरवाण्या घटनेतील आरोपींचा सत्कार केला. हे विसंगत चित्र चिंताजनक आहे.
आझाद यांच्या पक्ष सोडण्याच्या कारणाबद्दल अनभिज्ञ
देशातील भाजप सरकारच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र करून जनमत एकत्र करण्याच्या काळात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडला हे चांगले झाले नाही. संसदेमधील ते माझे चांगले सहकारी आहेत. ते भाजपच्या भूमिकेविरोधात सतत आघाडीवर राहिले. पण पक्ष सोडून जाण्यासाठी त्यांच्यावर काय संकट आले ते माहीत नसल्याचे पवार म्हणाले.
....हा तर संसदीय लोकशाहीवरील हल्ला
लोकशाही मार्गाने निवडून सत्ता मिळवता येत नसल्याचे पाहून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा आदी राज्यांतील बिगर भाजप सरकारमधील लोकांना फोडून, त्यांना आमिष दाखवून अथवा सीबीआय, ईडी आदी यंत्रणांचा वापर करून सत्ता उलथवून टाकली जात आहे.
हा संसदीय लोकशाहीवरील हल्ला आहे, अशी टीका पवार यांनी केली. गुजरात, आसाम या दोन राज्यांतील सत्ता वगळता भाजपला लोकांनी सत्तेवर येऊ दिले नाही, असेही ते म्हणाले.
....हा तर संसदीय लोकशाहीवरील हल्ला
लोकशाही मार्गाने निवडून सत्ता मिळवता येत नसल्याचे पाहून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा आदी राज्यांतील बिगर भाजप सरकारमधील लोकांना फोडून, त्यांना आमिष दाखवून अथवा सीबीआय, ईडी आदी यंत्रणांचा वापर करून सत्ता उलथवून टाकली जात आहे.
हा संसदीय लोकशाहीवरील हल्ला आहे, अशी टीका पवार यांनी केली. गुजरात, आसाम या दोन राज्यांतील सत्ता वगळता भाजपला लोकांनी सत्तेवर येऊ दिले नाही, असेही ते म्हणाले.