सांगलीमधील अनाथ बालकाला इटलीचे नागरिक त्व

By admin | Published: October 20, 2015 11:14 PM2015-10-20T23:14:58+5:302015-10-20T23:52:27+5:30

दत्तक विधान : भारतीय समाज सेवा केंद्राचा पुढाकार; संस्थेला परदेशात दत्तक प्रक्रिया राबविण्यास शासनाची मंजुरी

Citizens of Italian citizens of orphan in Sangli | सांगलीमधील अनाथ बालकाला इटलीचे नागरिक त्व

सांगलीमधील अनाथ बालकाला इटलीचे नागरिक त्व

Next

सांगली : चिमुकल्या अनाथ जिवांना मायेची सावली देणाऱ्या सांगलीच्या भारतीय समाज सेवा केंद्राने आता दत्तक प्रक्रियेत देशाच्या सीमा ओलांडून पुढे जाण्यास सुरुवात केली आहे. शासनाने दिलेल्या परवानगीच्या आधारे प्रथमच येथील एका सहा वर्षाच्या बालकास इटलीतील कुटुंबास दत्तक देण्यात आले आहे. संस्थेतील सहा वर्षाच्या ‘नभी’ या बालकाला इटली येथील शिवकुमार कॅपेर डोनी यांनी दत्तक घेतले आहे. यामुळे सांगलीतील हे बालक आता इटलीचा नागरिक बनणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी दत्तक विधानाचा हा कार्यक्रम झाला.या केंद्राकडून आजपर्यंत भारतामध्ये बालकांना दत्तक देण्याचे काम होत होते. यावर्षी या संस्थेला परदेशातील कुटुंबांसाठीही दत्तक प्रक्रिया करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सांगलीतून परदेशात दत्तक देण्याची पहिलीच घटना झाल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. सांगली येथील घनशामनगरमधील भारतीय समाज सेवा केंद्र ही संस्था ० ते ६ वयोगटातील अनाथ, दुर्लक्षित बालकांचे संगोपन करीत आहे. दत्तक देऊन त्यांच्या पुनर्वसनाचे महत्त्वपूर्ण काम करीत आहे. यावर्षीपासून शासनाने परदेशातील कुटुंबांसाठीही दत्तक देण्यासाठी संस्थेला परवानगी दिली आहे. शासनाच्या या निर्णयानुसार संस्थेतील पहिलेच बालक इटलीचे नागरिक बनणार आहे. यावेळी फुलारी म्हणाले की, अनाथ मुलांना सांभाळणे आणि त्यांच्यासाठी संस्था चालविणे कठीण काम आहे. तरीही या संस्थेतर्फे उत्तम पध्दतीने हे काम केले जात आहे. बालकांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचे खूप मोठे काम ही संस्था करीत आहे. त्यांना जिल्हा पोलिसांचे सर्व पाठबळ राहील.वास्तुविशारद प्रमोद चौगुले म्हणाले की, पूर्वी मुलांना दत्तक घेण्याकडे कुटुंबांचा कल फारसा दिसत नव्हता. परंतु, सध्या या मुलांना दत्तक घेण्यासाठी वेटिंग आहे, ही कौतुकाची बाब आहे.
यावेळी डॉ. सुहास भावे, डॉ. दिलीप करमरकर, रोहिणी तुकदेव, अ‍ॅड. हरिष प्रताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)


हक्काचे घर मिळाल्याचे समाधान
आमच्या संस्थेत मूल राहणे ही आमच्यादृष्टीने खूप चांगली गोष्ट नाही. त्या बालकास येथे दर्जेदार सुविधा मिळतात. पण त्यांनाही त्यांचे हक्काचे घर, आई-वडील असण्याची गरज आहे. ज्यावेळी त्या बालकास हक्काचे घर मिळते, त्यावेळी आम्हाला खूप आनंद होतो, असे केंद्राच्या संचालिका उज्ज्वला परांजपे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Citizens of Italian citizens of orphan in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.