पोलिसांनो नागरिकांशी गैरवर्तणूक सोडा!
By admin | Published: November 16, 2015 03:01 AM2015-11-16T03:01:12+5:302015-11-16T03:01:12+5:30
सर्वसामान्य नागरिकांशी गैरवर्तणूक, बेशिस्तपणा करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे
मुंबई: सर्वसामान्य नागरिकांशी गैरवर्तणूक, बेशिस्तपणा करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या, त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांशी वर्तणूक करताना पोलिसांनी कर्तव्याची जाणीव ठेवण्याची ताकीद पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिली आहे. काही लोकांच्या गैरकृत्यामुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत असून, अशा घटनांना आळा न घातल्यास बेशिस्त वागणाऱ्या पोलिसांबरोबरच संबंधित वरिष्ठ निरीक्षक व प्रभारी अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
गणेशोत्सवाच्या वेळी लालबाग येथे तरुणीला व महिला पत्रकाराला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती, त्यानंतर सर्वत्र टीकेची झोड उठली. आठवडाभरापूर्वी अंबोली पोलीस ठाण्यात तरुण-तरुणीला पोलिसांकडून मारहाणीची घटना समोर आली. या दोन्ही घटनांचे काहींनी मोबाइलवर चित्रण करून ते व्हिडीओ सर्वत्र व्हायरल केले. त्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली. त्यामुळे अशा प्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी परिपत्रक जारी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मुंबईत पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांशी आक्षेपार्ह वागणूक झाली आहे. त्याचबरोबर पदाचा गैरवापर करण्याच्या प्रकारात काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. काही नागरिकही पोलिसांकडून गैरकृत्य व्हावे, यासाठी चिथावण्यासारखे वर्तन करतात. पोलिसांनी त्याला बळी न पडता, नागरिकांशी जबाबदारीने व कायद्याच्या चौकटीत राहून वागले पाहिजे. गैरवर्तणूक करणाऱ्या पोलिसांचे व्हिडीओ शूटिंग करून त्याची क्लिप सर्वत्र पाठविल्या जातात. त्याचप्रमाणे, प्रसारमाध्यमांकडे पोहोचविल्या जातात. त्यामुळे काही पोलिसांच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होते. म्हणून प्रत्येक पोलीस ठाणे/शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक, प्रभारी अधिकाऱ्यांनी त्याबाबत काळजी घ्यावी, असे जावेद अहमद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)