लसीकरण नव्हे शिक्षा? नागरिक तासन्तास रांगेत; ज्येष्ठांची दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:27 AM2021-05-12T06:27:22+5:302021-05-12T06:30:57+5:30
दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माेठी दमछाक होत आहे.
मुंबई : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने नागरिक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. त्यातच लसींचा तुटवडा आणि लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने राज्यभर लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे. लोकांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे. कुठे इंटरनेट बंद पडल्याने लसीकरणात खोळंबा येत आहे तर कुठे लस संपल्याने लोकांना घरी परतावे लागत आहे. यात दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माेठी दमछाक होत आहे.
नाशिक : गर्दीला रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त -
नाशिकमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत असल्याने मंगळवारी सर्वच ठिकाणी गर्दी झाली होती. सातपूर, नाशिक रोड येथे वाद झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
रत्नागिरी : लस संपली तरी केंद्रावर गर्दी मात्र कायम
रत्नागिरीतील मेस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी सकाळपासून रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठांना लस न घेताच परतावे लागल्याने गाेंधळ उडाला. सातारा जिल्ह्यात लस संपली तरी केंद्रावर गर्दी असल्याचे पहायला मिळाले.
मराठवाडा : गोंधळात गोंधळ
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत लसीकरणासाठी नियोजनाचा अभाव असून, गोंधळाची स्थिती आहे. औरंगाबादमध्ये लसीकरणासाठीची नोंदणी अवघ्या ५ सेकंदामध्ये फुल होत असल्याने हजारो नागरिक लसीकरणाअभावी वंचित रहात आहेत.
परभणीत नागरिक पहाटेपासूनच रांगा लावत आहेत. केंद्रावर गोंधळ वाढत असल्याने दुपारी १२.३० च्या सुमारास पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. लसीचा साठा कमी असून, त्या तुलनेत लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.